Tag Archives: राजकारण

काश्मीरचे राजे: महाराज हरी सिंग

महाराज हरी सिंग हे जम्मू आणि काश्मीर संस्थानाचे शेवटचे राजा होते. त्यांच्या आधी ह्या संस्थानाचे राजेपद प्रताप सिंग नावाच्या त्यांच्या काकांकडे होते. पण त्यांना वारस नसल्यामुळे हरी सिंग हे जम्मू आणि काश्मीर संस्थानाचे १९२५ मध्ये राजे बनले.

हरी सिंग ह्यांचे शिक्षण

वयाच्या १३ व्या वर्षी त्यांना ‘मेयो कॉलेज ऑफ प्रिन्सेस’ मध्ये शिकण्यासाठी दाखल करण्यात आले. अवघ्या काही दिवसांत त्यांचे वडील अमर सिंग ह्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूपश्चात ब्रिटिश सरकारने त्यांचे शिक्षण आणि संगोपन ह्यामध्ये विशेष लक्ष घातले. हरी सिंग एक चांगले राजा म्हणून उदयास यावेत, तसेच त्यांना योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी सरकारने एका ब्रिटिश अधिकाऱ्याची त्यांचा सहाय्य्क म्हणून तेव्हा नेमणूक केली. मेयो कॉलेजमधील त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सैनिकी कला आणि युद्धकौशल्य ह्यामध्ये पारंगत होण्यासाठी डेहराडून येथील ‘इम्पीरियल कॅडेट कोर्प्स’ मध्ये भरती करण्यात आले.


हरी सिंग ह्यांनी जम्मू आणि काश्मीर संस्थानात काय बदल घडवून आणले?

 • इ.स. १९१५ मध्ये हरी सिंग २० वर्षांचे असताना त्यांना जम्मू आणि काश्मीर संस्थानाचे सरसेनापती बनविण्यात आले. सैन्याची कमान स्वीकारल्यानंतर त्यांनी सैनिकी प्रशिक्षण आणि सैनिकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा ह्यामध्ये चांगले बदल घडवून आणले. आधी सैनिकांना स्वतःचे अन्न स्वतः शिजवून खावे लागत असे हे बघून त्यांनी सैनिकांसाठी खाणावळींची सोय केली.
 • हरी सिंग ह्यांच्या आधीच्या काळामध्ये जम्मू आणि काश्मीर संस्थानामध्ये ब्रिटिशांचा झेंडा सगळीकडे फडकविला जायचा. त्यांनी ह्या झेंड्यावर बंदी आणली. ब्रिटिशव्हॉइसरॉयच्या विनंतीवरून त्यांनी काही मोजक्या इमारतींवर ब्रिटिश झेंडा लावायची परवानगी दिली.
 • अनेक ब्रिटिश इतिहासकारांनी राजा हरी सिंग ह्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये प्रशासन आणि न्यायव्यवस्था ह्या क्षेत्रांमध्ये घडवून आणलेल्या अनेक सुधारणांसाठी प्रशंसा केली आहे. त्यांनी नागरिकांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी तसेच राहणीमान सुधारण्यासाठी काही महत्वाची पाऊले उचलली.
 • संस्थानामध्ये त्यांनी प्रत्येक नागरिकासाठी (स्त्री आणि पुरुष दोघांसाठी) मूलभूत शिक्षण सक्तीचे केले.
 • बालविवाहांवर बंदी आणली.
 • धार्मिक स्थळे समाजातील सर्व घटकांसाठी खुली करण्यात आली.
 • शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अनेक शाळा आणि महाविद्यालये ह्यांची स्थापना करण्यात आली.
 • त्यांनी संस्थांनातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी, तसेच भ्रष्टाचाऱ्याना पकडून त्यांना शासन करण्यासाठी अनेक पद्धती राबविल्या. असे बोलले जाते कि त्यांच्या काळामध्ये कोणीच लाच घ्यायचा किंवा द्यायचा प्रयत्न करत नसे.
 • त्यांनी भीक मागण्यांवर बंदी आणली.

हरी सिंग ह्यांची राजकीय कारकीर्द

 • त्यांच्या काळामध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये राजकीय उलथापालथी खूपदा घडल्याचे दिसून येते. हरी सिंग ह्यांच्या शासनाविरुद्ध शेख अब्दुल्ला ह्यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये बंडखोरी करण्याचे खूपदा प्रयत्न झाले.
 • राजा हरी सिंग हे मुस्लिम लीग आणि मोहम्मद जिन्नाह ह्यांच्या धर्मानुसार देशाचे विभाजन करण्याच्या प्रस्तावाच्या कायम विरोधात असल्याचे दिसून येते.
 • पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला ह्यांचे घनिष्ट संबंध असल्यामुळे त्यांना राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या रोषाला कायम सामोरे जावे लागले.
 • भारत स्वतंत्र झाल्यानंतर आणि पाकिस्तान देशाच्या निर्मितीनंतर थोड्याच दिवसांत त्यांच्या संस्थानामध्ये भीषण जातीय दंगली वाढायला लागल्या.
 • थोड्याच दिवसांत पाकिस्तानी फौजांनी जम्मू आणि काश्मीर संस्थानामध्ये घुसखोरी केली. तेव्हा राजा हरी सिंग ह्यांनी भारताबरोबर करार करून त्यांचे संस्थान भारतामध्ये विलीन केले.
 • महाराज हरी सिंग हे दूरदृष्टी असलेले तसेच पुढारलेल्या विचारांचे होते. त्यामुळे भविष्यात समोर काय वाढून ठेवले आहे ह्याचा त्यांना आधीच अंदाज आला होता. भारत स्वतंत्र होण्याआधी लंडन मध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांनी आधीच स्पष्ट केले होते कि त्यांना भारताबरोबर राहणे जास्त पसंद आहे. ह्यामुळे त्यांना ब्रिटिशांच्या रोषाला पण सामोरे जावे लागले आणि तद्नंतर ब्रिटिश त्यांच्याकडे कायम संशयाने बघू लागले.
 • त्यांना आधीच समजून चुकले होते कि संस्थानाचे आणि संस्थानिकांचे दिवस भरलेत आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला भविष्यात लोकशाही विचारांशी जुळवून घेण्याचे शिक्षण दिले.
 • जुने १९४७ मध्ये लॉर्ड माउंटबॅटन ह्यांनी राजा हरी सिंग ह्यांची भेट घेतली आणि त्यांचे संस्थान पाकिस्तानला देण्याचा सल्ला (हुकूम?) दिला. पण हरी सिंग ह्यांनी त्याच्याकडे कानाडोळा केला. कारण त्यांना माहिती होते कि पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला ह्यांना पण जम्मू आणि काश्मीर संस्थान भारतामध्येच हवे होते.
 • भारत पाकिस्तान वेगळे झाल्यानंतर हरी सिंग ह्यांच्याकडे ३ पर्याय होते.
  1. जम्मू आणि काश्मीर वेगळे ठेवणे
  2. भारतात विलीन होणे
  3. पाकिस्तानबरोबर जाणे.
 • राजा हरी सिंग ह्यांना तिन्ही पर्यायांचे फायदे आणि तोटे माहिती होते. म्हणून त्यांनी भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांना स्टँडस्टील अग्रीमेंट (स्थिरता करार) करण्याचा प्रस्ताव दिला. पंडित नेहरू ह्यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला आणि त्याचा परिणाम कुठे ना कुठे पुढच्या पूर्ण इतिहासावर झाला. जर भारतने तो प्रस्ताव स्वीकारला असता तर विचार करण्यासाठी २ महिन्यांचा कालावधी मिळालाअसता आणि ह्या कालावधीमध्ये भारताला योजना बनविता आली असती. कदाचित पुढे पाकिस्तानने जो जम्मू आणि काश्मीर संस्थानांवर हल्ला केला त्यासाठी आधीच तयार राहता आले असते.
 • २६ ऑक्टोबर १९४७ ला राजा हरी सिंग ह्यांनी भारतबरोबर करार केला आणि काही अटी घालून जम्मू, काश्मीर, उत्तरी भाग, लडाख, ट्रान्स काराकोरम ट्रॅक्ट, सध्याचा पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आणि अक्साई चिन एवढे भाग भारताच्या स्वाधीन केले.

तळटीपा:

[1] Remembering Maharaja Hari Singh
[2] MAHARAJA HARI SINGH : THE LAST RULER OF JAMMU & KASHMIR By. Col. J.P. Singh (Retd).
[3] Hari Singh – Wikipedia

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)

नवी विश्वव्यापी वसाहतवादी ताकद:चीन

नवी विश्वव्यापी वसाहतवादी ताकद:चीन

चीनचे राष्ट्रपती झी झिनपिंग ह्यांनी २०१३ मध्ये ‘One Belt One Road’ ही घोषणा केली. सिल्क रोड इकोनोमिक बेल्ट SERB व मेरीटाइम सिल्क रोड MSR द्वारे संपूर्ण जग इंफ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून व्यापारासाठी जोडण्याचा विचार मांडला.SERB हा जूनी राजधानी Xi’an पासून जगाला जोडत व्हेनिसपर्यन्त (इटली)असुन MSR ने सागरामार्गे संपूर्ण पृथ्वीभोवती विळखा घालण्याची तयारी आहे. माओच्या ‘लीप फॉरवर्ड मार्च’ आणि 1970मध्ये सत्तेेत असलेल्या दंग झिओफंगची’गो वेस्ट पॉलीसी’; हयांचे एकत्रीकरण.


निर्यांत आधारित अर्थव्यवस्था असल्याने सतत नवे मार्केट शोधणे गरजेचे आहे.इंफ्रास्ट्रक्चर च्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात लागणारे बांधकाम साहित्य,अतिरिक्त उत्पादन वाढ़वलेले सीमेंट व स्टील, इतर कच्चा माल व कामगार हेही बहुतांशी चीनीच वापरून त्याच बाजारात चीनी माल विकायला लावणे व तिथल्या अर्थव्यवस्थेवर ताबा मिळवणे;हेही आलेच. पुढे लष्करी व आर्थिक ताकदीने तिबेट किंवा इंग्रजांनी भारताचा घेतला,तसा घास गीळायचा. दादाभाई नौरोजिंनी मांडल्याप्रमाणेच आर्थिक नि:सारणाचा हा सिद्धान्त असल्याने आर्थिक लाभ प्रचंड होणार.उदा:केनियात मोम्बासा-नैरोबी रेल्वे, मालाची वाहतूक करायला सुरु करतोय. देखरेखिचे कंत्राटामुळे अनेक वर्ष त्या जनतेचा पैसा लूटत राहणार.असाच ग्वादर बंदराचा 40 वर्षांचा करार असून,त्याचा नौदलासाठीही वापर करता येणार आहे.
सामान्य दर्जाच्या वस्तुपासुन,उच्च कोटीच्या तंत्रज्ञानापर्यन्त सर्वच निर्यात करण्यासाठी शेती, दळणवळण यांसारखे 10 क्षेत्र निवड़ले आहेत.हया रणनितिला’मेड ईन चायना 2025′ नाव असून; स्वतःची ओळख world factory ते world power अशी निर्माण करायची आहे,ज्यात manufacturing process सोबतच innovative products सुद्धा असतील. ‘माणसासोबत माणसाला जोड़णे’,हा चांगुलपणाचा मुखवटा दाखवतो कि सॉफ्टपॉवर चा महत्वाचा सहभाग राजकीय वातावरण तयार करण्यात राहील.हयाच प्रकारे हिन्दी-चीनी भाई-भाई चा नारा देत विश्वासघाताने केलेले आक्रमण देश अजूनही विसरला नाही.दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने अनेक देशांना प्रचंड पैसा दिला,पाठबळ दिले,विकास करून दिला व स्वतःच्या हातातील खेळणे करुन दादागीरी सुरु करणेे.सॉफ्ट पॉवर म्हणजे नेमके हेच.ड्रैगन ची धोरणे त्यापेक्षाही आक्रामक असून जगालाच वसाहत बनवणे ही मनीषा आहे. उदा:ल्हाओस मध्ये पहाड़ फोडून 6 बिलियन $ची, आशियातिल आठ देश जोडणारी 260 मैलाची रेल्वे असो किंवा पाकिस्तानमध्ये तयार करण्यात येत असलेले पॉवर प्लांट असो;पुढे यांचा वापर आज पेक्षाही जास्त होणार.

१  ट्रिलियन $ ची गुंतवणुक, पैसा कुठून उभारणार?
) Asian infrastructure investment bank.(100B$)
२ ) BRICS ची New development bank(capital 50 B$ पण वाढु ही शकते.
३ ) Silk route fund 40B$
आणखीहि स्त्रोत आहेतच…

युरोपबाबत:ब्रसेल्स ला जाउन चीनी राष्ट्रपतींनी OBOR मध्ये असणाऱ्या प्रकल्पात आम्ही युरोपात गुंतवणूक करायला तयार असल्याचे सांगितले.चीन-यूरोपीय महासंघात डिजिटल सहकार्य करार झाला. अमेरिकेच्या इंटरनेट मधिल वर्चस्वाला धक्का देण्यासाठी OBOR ला चीनी ब्रॉडबॅंडची जोड़ देणे,ट्रांस साइबेरियन लिंक वर हंगेरी ला लॉजिस्टिक हब च्या रुपात बघणे, ग्रीक च्या आर्थिक दिवाळ-खोरीचा फायदा उचलून स्वतः ला मोक्याच्या अश्या एथेंस पोर्टमध्ये प्रस्थापित करून रेड सी-एथेंस-मध्य पूर्व असा डाव आहे.मुख्यत्वे किनारीभागतिल ही ठिकाणे असून त्याद्वारे रॉटरडॅम चे डच पोर्ट, जर्मनीतील हैम्बर्ग ने यूरोपमध्ये पसरणे असेही मनसुबे आहेत. सांस्कृतिक संबंध व शैक्षणिक उपक्रम हया नावाखाली कम्युनिझमचा प्रसार करणे; ‘कम्युनिस्ट पार्टी च्या 9 कोटी सदस्यांनी लवकरात लवकर मानत असलेला धर्म सोडावा’,असा धमकीवजा सल्लाही झी झीनपिंग ह्यांनी नुकताच दिला आहे.

जगासाठी: 2008 च्या जागतिकमंदितुन अद्याप न सावरलेला अमेरिका,यूक्रेन प्रकरणानंतर आर्थिक बोज्यात असलेला रशिया,दहशत- दिवाळखोरी ने त्रस्त असलेला यूरोप हयांनी निर्माण केलेली पोकळी ड्रैगन व्यापत आहे.अमेरिका व सहयोगी देश OROB कडे सावध दृष्टिकोनातुन बघत आहेत.हया कम्युनिस्ट महत्वाकांक्षेला पायबंद म्हणून बघितल्या जाणाऱ्या ट्रांस पैसिफिक पार्टनरशिपमधुन अमेरिकेने काढ़ता घेतलेल्या पायामुळे चिनला आजतरी अटकाव करणारा,विश्व व्यापारावर इतका छाप सोडणारा दूसरा तुल्य पर्याय हा गरीब, अविकसित,महासत्तांच्या संघर्षात त्रस्त देशांच्या नजरेपुढ़े येत नाही.एकीकडे ‘अमेरिका फर्स्ट’ हा जप करणारा ट्रम्प तर दुसरीकडे मुक्त व्यापार क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्था,रोजगार,व्यापार व गुंतवणुक सगळ्यांना मदत करणारा चीन हया चित्रातिल फरकामुळे अनेक देश OBOR मध्ये शामील होत आहेत. ADB नुसार आशियात इंफ्रास्ट्रक्चर गरज व पुरवठा हयात वार्षिक तुट ही 800बिलियन$आहे;ही जागा व्यापण्यास चीन सक्षम आहे. चीनी धोरणाद्वारे मिळणाऱ्या कर्जार्ची प्रक्रियाही अतिशय सुलभ असून आर्थिक सुधारणा झाल्यास व्यवसाय व वाणिज्य वाढेल,रोजगार निर्मितितुन प्रादेशिक एकात्मता वाढ़ेल हा विचार सहभागी होणाऱ्या देशांचा आहे.

भारतासाठी:आशियात एकमेव आव्हान असणाऱ्या भारताला,हिन्दी व अरबी महासागरातुन घेरण्याची चिनची योजना आहे.इंडोनेशियामध्ये जकार्ता-बांडुंग हे 142 किमी वेगवान रेल्वेचे सुरु झालेले काम,ग्वादर पोर्ट तसेच श्रीलंकेतील महिंद्रा राजपक्षे पोर्ट त्याचेच प्रकार.MSR मध्ये कोलकाताही मांडलेला आहे,ज्यास भारताने अजुन मान्यता दिली नाही.
चीन पाकिस्तान आर्थिक महामार्ग (CPEC)भारताचा भाग असलेल्या पण पाकव्याप्त असलेल्या कश्मीरमधून जात असल्याने,भारत हया OBOR बैठकीतमध्ये सहभागी झाला नाही.भारताच्या पाचपट अर्थव्यवस्था असलेला चीन,’भारताचे सर्व शेजारी सहभागी होत असताना भारताने सहभागी न होणे म्हणजे एकाकी पडणे’,असे सांगतआहे.
OROB हा आशीयाची सुपर पॉवर बनण्यात,भारतापुढील सर्वात मोठा अडथळा. पाण्याप्रमाणेच चीन भारतास जमिनीवरही एकटा पाडण्यास उत्सुक आहे.तसे होणे भारतास परवडण्यासारखे नाही कारण त्याने चिनचा प्रभाव मध्य पूर्व व मध्य आशियातही वाढ़ेल. भारतास आणखी एका मुद्यावर सावध राहण्याची गरज आहे,ती म्हणजे चीन-रशिया मैत्रीने रशिया-भारत दरम्यान अंतर वाढु नये.

भारता पुढील काही पर्याय:
भारत व जापान ने संकल्पित केलेला आशिया आफ्रिका समुद्री मार्ग सुरु केला जाउ शकतो;जो आफ्रिका खंडासोबत भारताला,दक्षिण आशिया व व दक्षिण पूर्व आशियाला जोड़तो.OBOR मध्ये जोडलेले 60 देश सोडून इतर देशांचा समुह तयार करण्याचा प्रयत्न लोकशाहीवादी देशांनी करावा.भारत RCEP किंवा APEC पैकी एक समूहात सुद्धा सदस्य होउ शकतो;अनुषंगाने तडजोडी ह्या आल्याच….


निवृत्त IFS अधिकारी श्याम सरन म्हणतात,”मोठ्या बाजारपेठांत आपले संबंध वाढ़वणे व असलेले सुदृढ़ करणे तर अनिवार्य आहेच पण सोबतच अंडमान व निकोबार ला मालदीव,सिंगापुर सारखे दर्जेदार बनविणे, छाबहार बंदराचा वापर करून इराण मार्गे मध्य आशियाला जोडणारे रस्ते/रेल्वे मार्ग बांधणे,श्रीलंकेच्या पुर्वेला असणारे त्रीनकोमलाए हे बहुतांश तमिल भाषीक राहत असलेले बंदर एनर्जी व ट्रांसपोर्ट हब म्हणून विकसित करणे,मेकांग-गंगा तसेच सितवे-मिझोरम (कलादान प्रकल्प)सारखे आणखी महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेणे,प्रोजेक्ट मौसम सुरु करणे(हयास चिनही OBOR मध्ये समाविष्ट करुन घेण्यास तयार आहे);असे बरेच पर्याय भारतापुढ़े आहेत.
60 देश आपल्या कवेत घेऊन लाल साम्राज्यावरुन कधीच सूर्य मावळणार नाही;असा बंदोबस्त करायचे ठरवले आहे.पूर्वी यूरोपियन देशांनी आशिया व आफ्रीकेला आपली वसाहत करुन साम्राज्य विस्तार केला होता,आग ओकत प्रचंड वेगाने सगळे जग आपल्या ताब्यात घेण्याची ड्रैगनची महत्वाकांक्षा मात्र पिढ़यान पीढ़यांच्या गुलामीनंतर रक्त सांडवुन,बलिदाने देऊन काही दशकांपूर्वीच स्वातंत्र्य मिळवलेल्या अनेक देशांतील समाजमन हेलकावुन टाकणारी आहे. आर्थिक व व्यापारी संबंधांचे घनदाट जाळेच सुरक्षिततेची खात्री देते;हाच इशारा आजच्या युगातील सर्वात मोठी वसाहतवादी शक्ती असलेला चीन देत आहे.

जय हिन्द.
एक आशावादी.
केदार गोगरकर
gogarkarkedar@gmail.com
अमरावती.