प्रामाणिक (ला)कोड तोड्या…

programmer_creattica_full

कलियुगातील गोष्ट आहे.

एका गावात दोन (ला)कोड तोडे म्हणजेच साहेबी भाषेत Software Engineers राहत होते. पोटाची खळगी भरण्यासाठी दोघेही कोडिंग करायचे. त्यांतील एक कोड तोड्या प्रामाणिक होता तर दुसरा लबाड होता. सकाळी उठायचे, न्याहरी करून ऑफिस मधे जायचे, Source Tree वर चढून कोड तोडायचे (cut copy paste), दुपारच्याला सब वे मधून बांधून आणलेले फुट लॉंग खायचे, अंमळ विश्रांती घ्यायची, आणि मग उशिरापर्यंत राब राब राबून अंधार पडला की घरी परतायचे असा त्यांचा दिनक्रम असे.
एके दिवशी काय झाले, प्रामाणिक कोड तोड्याचे कामात मन लागत नव्हते. म्हणून आपल्या खुराड्या(cube) मधे बसून कोड तोडण्या ऐवजी तो ऑफिसच्या आवारातल्या पोहण्याच्या तलावापाशी जाऊन बसला. तलावाकाठी बसून लॅपटॉप घेऊन कोड तोडू लागला. बघता बघता त्याला जराशी डुलकी लागली आणि त्याचा लॅपटॉप तलावात पडला. प्रामाणिक कोड तोड्याला खडबडून जाग आली आणि लॅपटॉप पाण्यात पडलेला पाहून तो रडू लागला. त्याला रडताना पाहून एक जलदेवता पाण्यातून बाहेर आली आणि तिने कोड तोड्याला विचारले,
“कोड तोड्या, तू का बरे रडत आहेस ?”
कोड तोड्याने रडत रडत तिला सांगितले
“माझा लॅपटॉप कोड तोडता तोडता पाण्यात पडला. माझ्याकडे दुसरा लॅपटॉप नाही. माझी उद्या डेडलाईन आहे. ती पूर्ण झाली नाही तर माझे कसे होणार ? घरी म्हातारे आई वडील आहेत. त्यांचे कसे होणार ?”
जलदेवता म्हणाली, “रडू नकोस. मी तुझा लॅपटॉप पाण्यातून बाहेर काढून देते.” इतके म्हणून जलदेवतेने पाण्यात बुडी मारली आणि ती एक लॅपटॉप घेऊन बाहेर आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले. हा लॅपटॉप 4 GB RAM चा होता. प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला, “हा लॅपटॉप माझा नव्हे. माझा लॅपटॉप तर 1 GB RAM चा होता.” जलदेवतेने पाण्यात पुन्हा बुडी मारली आणि ती अजून एक लॅपटॉप घेऊन बाहेर आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले. हा लॅपटॉप 2 GB RAM चा होता. प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला, “हा लॅपटॉप माझा नव्हे. माझा लॅपटॉप तर 1 GB RAM चा होता.”
जलदेवतेने पाण्यात तिस-यांदा बुडी मारली आणि ती एक लॅपटॉप घेऊन बाहेर आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले. हा लॅपटॉप 1 GB RAM चा होता. प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला,
“हाच माझा लॅपटॉप !!”

जलदेवता कोड तोड्याच्या प्रामाणिकपणावर खूश झाली आणि तिने ते तीनही लॅपटॉप प्रामाणिक कोड तोड्याला बक्षीस देऊन टाकले. दुस-या दिवशी प्रामाणिक कोड तोड्याच्या मित्राने त्याच्याकडे नवीन लॅपटॉप पाहिला. त्याने विचारले, “मित्रा, या इकॉनॉमी मधे तुझ्याकडे नवीन लॅपटॉप कुठून आला ?” प्रामाणिक कोड तोड्याने त्याला जलदेवतेबद्दल सांगितले. ते ऐकून लबाड कोड तोड्याच्या मनात लोभ निर्माण झाला.
दुस-या दिवशी लबाड कोड तोड्या पोहण्याच्या तलावापाशी जाऊन बसला. तलावाकाठी बसून लॅपटॉप घेऊन कोड तोडू लागला. थोड्या वेळाने त्याने आपला लॅपटॉप मुद्दाम तलावात टाकला आणि मोठ्याने रडू लागला. त्याला रडताना पाहून जलदेवता पाण्यातून बाहेर आली आणि तिने कोड तोड्याला विचारले,
“कोड तोड्या, तू का बरे रडत आहेस ?”
कोड तोड्याने रडत रडत तिला सांगितले, “माझा लॅपटॉप कोड तोडता तोडता पाण्यात पडला. माझ्याकडे दुसरा लॅपटॉप नाही. माझी उद्या डेडलाईन आहे. ती पूर्ण झाली नाही तर माझे कसे होणार ? घरी म्हातारे आई वडील आणि बायका पोरे – नाही नाही – बायको आणि पोरे आहेत. त्यांचे कसे होणार ?”
जलदेवता म्हणाली, “रडू नकोस. मी तुझा लॅपटॉप पाण्यातून बाहेर काढून देते.” इतके म्हणून जलदेवतेने पाण्यात बुडी मारली. या खेपेस थोडे Optimization करून ती तीन लॅपटॉप घेऊन बाहेर आली आणि कोड तोड्याला विचारले, “यातला कोणता लॅपटॉप तुझा होता ?” लबाड कोड तोड्याने कन्फिगरेशन्स पाहिली. तो म्हणाला, “माझा लॅपटॉप 4 GB RAM चा होता.” जलदेवतेला लबाड कोड तोड्याचा खोटेपणा आवडला नाही आणि ती लबाड कोड
तोड्याला कोणताच लॅपटॉप न देता अदृश्य झाली.
कलियुगाचा महिमा :
प्रामाणिक कोड तोड्या तीन लॅपटॉप घेऊन आयुष्यभर कोडिंगच करत राहिला. लबाड कोड तोड्याचा लॅपटॉप पाण्यात पडल्याने त्याला कोड लिहिता येईना. मग
कंपनीने त्याला मॅनेजर बनवून नवीन ब्लॅकबेरी घेऊन दिला 🙂

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: