बाप झालास ना…

बाप झालास ना आता
तर , बापाच्या इमानास जाग
बाळांना लाज वाटणार नाही
अस, आयुष्यभर वाग

वळवाच्या वादळी पावसागत
कोणावर आता कडाडू नको
ठासुन भरलेली जवानीची तोफ
उगीच तोंडावाटे धडाडू नको

बायको तुझी आता
फक्त बायको नाही राहिली
अरे तुझ्या काळजाच्या तुकड्यांनी
तीच्यात एक जबाबदार आई पाहिली
म्हणून , जे काही मागायचं ते
एक पायरी उतरूण माग
बाप झालास ना आता
तर, बापाच्या इमानास जाग

घरट्यातील पिलांची जाणीव
बेफाम लढणाऱ्या पक्षात असू दे
भांडणात शस्त्र चालवण्यापुर्वी
तू बाप आहे लक्षात असू दे

तुरुंगा पेक्षा तुझी गरज
तुझ्या बाळांना जास्त आहे
पण , शस्त्रा ऐवजी प्रेमाची भाषा
खरच , काय जबरदस्त आहे
म्हणून घरात असो नाहीतर बाहेर
आवरायला शिक तू राग
बाप झालास ना आता
तर ,बापाच्या इमानास जाग

भरधाव गाडी चालवताना
बाळाला आठवून दाब अँक्सीलेटर
लूळा पांगळा बाप झालातर
स्वतःच्या नशीबावर फोडतील ते खापर

चुकून व्यसनाची वाट धरली असेल तर
आता तरी सोडून दे बाबा
तुझ्या बाळाच्या बाळांनाही
धडधाकट मिळूदे आजोबा
उगीच घालू नको धोक्यात
तुझ्या कुटुंबाची नवीन बाग
बाप झालास ना आता
तर,बापाच्या इमानास जाग

भ्रष्ट कमईच्या तळतळाटावर
बाळांना मोठं व्हायचं नाही
लुबाडलेल्या प्रतिष्ठीत छताखाली
त्यांना कधीच रहायचं नाही

म्हणून हे साऱ संसारासाठी करतोय
हे सांगन्यात काही अर्थ नाही
स्वाभिमानी बाप होण्यास
ते समजतील तू समर्थ नाही

म्हणून त्याच्या आयुष्यावर पाडू नको
तुझ्या पापाचा डाग
बाप झालास ना आता
तर, बापाच्या इमानास जाग
तुझ्या बाळांना लाज वाटणार नाही
असच आयुष्यभर वाग

कवी – भालचंद्र कोळपकर, (९९२२७६०१२५)

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: