“बापाला शहरात करमत नाही…”

आभाळानं भरगच्च कोसळल्यावर
पिकानं तरारून यावं
तसा भरभरून येतो बाप
मुलानं शहरात बांधलेल्या
टुमदार बंगल्यात शिरताना

हयातभर
राबूनही बांधता आल्या नाहीत
मातीच्या चार भिंती
आणि चार वर्षात बांधलं पोरानं
टोलेजंग घर !

जीव हरखून जातो त्याचा.
पीक कर्जासाठी शंभरदा फिरवणा-
या बँका
दहा लाख देतात दोन दिवसात घर
बांधायला
हे ऐकून अचंबीत होतो बाप !
‘व्याज खाणं हे पाप आहे ?
हे पक्क बसलेल्या त्यांच्या डोक्यात
शिरत नाही बँकांचं कौटिल्यीय
अर्थशास्त्र

शेण-माती तुडवून
तुटकी झालेली वहाण
कोठे काढावी ?या यक्ष प्रश्नासह
तो प्रवेशतो
चकचकीत संगमरवरी बैठकीत !

पोराच्या इस्टेटीत हक्क
मागणारा बाप
जन्माला आला नाही अद्याप
कदाचित म्हणून –
तो बसतो सर्वांग चोरून
सोफासेटच्या मऊशार कोप-यात.

संध्याकाळी
रंगीत युनिफ़ॉर्मला साजेसे बूट घालून,
स्कूलबसने ऐटीत परतणा-
या नातवांना
तो सांगू शकत नाही
फाटक्या चड्डीत अनवाणी पायानं
पोराला शाळेत
पाठवताना खाल्लेल्या खस्ता
आणि झालेली जीवाची घालमेल.

रात्री तो पाहू शकत नाही
टी.व्ही.च्या पडद्यावरचा
तारुण्याचा धुडगूस ,
‘अनवांटेड सेव्हन्टी टू ‘सारख्या
जाहिरातींची वरात
आणि अनैतिक संबंधाचं
उदात्तीकरण करणा-या मालिका.

मग ‘बेसिनमध्ये थुंकू नका ‘
ही समज आठवत ,
खोकल्याची उबळ दाबत
तो गुदमरत राहतो पहाटेपर्येंत
डनलपच्या गादीवर !

मात्र पिकाच्या वाढीसाठी
टिपूसभर पाण्याला तरसणारा बाप
धुडकावून लावतो सूचना
संडासमध्ये भरपूर
पाणी वापरण्याची .

सकाळी फुरके मारून चहा पिताना
सुटत नाही त्याच्या नजरेतून
नातवांनी दाबलेलं उपरोधिक हसू ,
सुनेच्या कपाळावरील आठ्या
आणि पोरानं लोकलाजेस्तव
चेह-यावर आणलेलं
बापप्रेमाचं उसनं अवधान !

मग सुरु होते त्याची लगबग
परतण्याची !
बाप आता थांबणारच नाही
अशी खात्री झाल्यावर
पोरगा आग्रहाने म्हणतो –
‘ आला आहात तर थांबा
दोन दिवस आरामात.’
तो मिस्किलपणे
हसतो आणि म्हणतो –
‘बेटा ,मला खेडयात रहायची सवय ‘
शहरात मला करमत नाही…’

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: