आयुष्यावरची चालती बोलती पुस्तके..

 

ओसरीवर नाहीतर पारावर बसलेली डोळे विझत चाललेली गावाकडची ही म्हातारी माणसं म्हणजे आयुष्यावरली चालती बोलती पुस्तकं असतात.

आयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला. सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली. ऊन पावसाच्या खेळाने डोळे खोल गेलेल्या विहिरीसारखे. गालावर सुरकुत्यांचे मखमली जाळे. कपाळावर थिजलेला आठ्यांचा गंध जोडीला अष्टगंध नाहीतर बुक्का. नांगर हाकून कमरेला आलेला बाक. नेसूचे जुनाट धोतर अन वर पांढरी छाटी नाहीतर सदरा. कपडे नेहमीच जुने पण स्वच्छ. डोईवर पांढरी टोपी. पायातल्या झिझलेल्या वहाणा दरिद्रीनारायणाची साथ सोबत दर्शवणारया अशाच. डोळ्यांवरचा चष्मा किमान दोन तीन ठिकाणी तरी जोडलेला वा दोरीने बांधलेला. गळ्यात तुळशीची माळ अन कंबरेला करदोडा हीच काय ती संपत्ती. हातात काठी अन ओठावर अनेक अनुच्चारित प्रश्न !

gavakadchi_manas

रानातल्या बैलाच्या खांद्याला झालेले दुखणे असो वा पांडुरंगाने ताणून धरलेला पाऊस! ह्यांची सोसायची तयारी…. आताच्या पिढीतल्या शेतकरयासारखे आत्महत्या करणारे हे नव्हेत. ओसरीत झोपायला लागते म्हणून कधी तक्रार नाही की शेतात अजूनही दारे धरायला लागतात म्हणून कंबर दुखते असे देखील म्हणणार नाहीत.

देवळात पांडुरंगासमोर तन्मयतेने वीणा धरून उभे राहतील अन घरी आल्यावर नातवाला घेऊन गावभर अभिमानाने मिरवतील. ताटात सुन काय वाढते अन कसे वाढते याचा चकार उल्लेख कधीही बाहेर करणार नाहीत. दात अजुन शाबूत; शिवारातल्या जुंधळ्याची गोड भाकरी जोडीला कोरड्यास संगतीला लालबुंद कांद्याच्या दोनचार पाकळ्या- लसणाच्या दोन तीन चण्या हेच अमृत जेवण. कोरभर भाकरी खाऊन रांजणातल्या पाण्याचा गोड घोट अन नंतर घडीभरची विश्रांती. मग पारावरच्या गप्पा.

एखादा बोलत असतो बाकीचे ऐकणार. गप्पांचे विषय अगदी साधे. माती अन नाती. ओलेते डोळे हळूच धोतराच्या सोग्याने कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने पुसतील. डोळ्यात पाणी का आले कधी वाच्यता करणार नाहीत.

मोबाईल, कॉम्प्यूटर, सोशल मिडीया, सिनियर सेकंड होम, लाफ्टर क्लब, मॉर्निंग वॉक, रेफ्रेशमेंट योगा, ध्यानधारणा असल्या कोणत्याही सोंगाची त्याना गरज नाही. स्वतःचे आयुष्य हेच तत्वज्ञान असल्याने कोणत्या साधू महाराज वा रिलीजीयस गुरूची तिळमात्र निकड नाही. दुःखाच्या सागरात राहून सुखाच्या गुरुकिल्लीवर ते अलगद तरंगत असतात. दुःखाच्या भवसागरात त्यांचे डोळे ओले होतील पण ते स्वतः ओले होत नाहीत की बुडूनही जात नाहीत.

म्हणूनच ही माणसं आयुष्यावरची चालती बोलती पुस्तके असतात. गावतल्या कुशीत आनंदाने जन्माला येऊन शिवारातल्या मातीत हसतमुखाने प्राण सोडतात. ना बीपी ना डायबेटीस न कोलेस्टेरॉल. नैसर्गिक जीवन अन नैसर्गिक मृत्यू. सुख दुखाच्या साध्या व्याख्या. जुजबी अपेक्षा अन माफक आवडी निवडी. कष्टालां नकार नाही अन सत्याला फाटा नाही. मायबाप हे कुलदैवत अन पांडुरंग हा देव. जत्रा हा उत्सव अन वारी हे उधाण! आनंद झाला तरी बेभान होणार नाहीत अन दुख झाले म्हणून गुडघ्यात मुंडके खुपसून बसणार नाहीत. नांगर अन टाळ मृदंग हेच काय ते ध्येय!

खूप हेवा वाटतो अशा लोकांचा. अशी माणसे पाहिली की डोळे नकळत भरून येतात अन काळजात कोलाहल होतो..!!

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक: समीर गायकवाड)

मूळ लेख: https://sameerbapu.blogspot.in/2015/07/blog-post_91.html?m=1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: