गणूची आई
एका गावात कोर्टाच्या इमारती जवळ एका माणसाचं घर होतं. पहिली बायको सतत आजारी त्यामुळे सोय म्हणून त्याने दुसरं लग्न केलं दुसरी बायको आपली खाली मान घालून वावरायची.
पहिली आपली बघावं तेंव्हा आढ्याकडे नजर लाऊन असायची, पहिलीला गणू नावाचा जरा व्रात्य खोडसाळ मुलगा होता आणि आता धाकटीलाही उलट्या जुलाभ साँरी साँरी उलट्या सुरू झाल्या होत्या लक्षणं सगळी मुलाचीच दिसत होती, मोठीच्या जिवाला घोर लागून राहिला. दोघी सवती असून दोघीत वाद नव्हते कारण आपण जाणार हे जसं मोठीला माहीत होतं तसं ही जाणार हे दुसरीलाही माहीत होतं रोज रात्री धाकटी आपली मोठीच्या नाकाशी सूत नेऊन बघायची.
एकदा मोठीनं धरलच म्हणाली, “काय हो बाई काय बघताय?”
धाकटी हुशार होती म्हणाली, “काही नाही बाई झोप लागली का बघत होते”
मोठी म्हणाली, “आता एकदाच झोपेन ती कायमची, गणूच्यात जिव अडकलाय ग माझा”!!
धाकटी माणूसकीला धरून म्हणाली काळजी करू नका अगदी माझ्या मुलासारखं सांभाळेन.
ती हासली म्हणाली, “ती खात्री आहेच पण तरी दोन गोष्टी सांगते तेव्हढ्या ऐक नाही म्हणू नको
हे बघ आपल्या शेजारीच कोर्टाची इमारत आहे केव्हढं मोठं पटांगण पण गणूला तिथे कधीही खेळायला पाठवू नको, घरात त्रास दिला तर अंगणातल्या शेवग्याला बांधून ठेव पण कोर्टात नको पाठवू आणि दुसरी गोष्ट गणूला भाताची ढेकळं वाढू नकोस, दुधी भोपळ्याची भाजी त्याला अजिबात आवडत नाही ती खायला घालू नकोस इतकं माझं ऐकलस ना तर मी अत्ताच मुक्त होईन”… धाकटी बरं बरं म्हणत म्हणाली गुमान पडा आता आणि खरच ती गुमान झाली ती कायमचीच..
किती नाही म्हंटलं तरी ती सवतच आणि गणू म्हणजे सवतीचा पोर. मोठीनी सांगितल्याच्या विरुद्ध वागायचा तिने सपाटाच लावला… शाळेतून आला की त्याला भाताची ढेकळं त्यावर कालवण आणि दुधीभोपळ्याची भाजी वाढायची तो जेवला रे जेवला की त्याला कोर्टाच्या पटांंगणात खेळायला पाठवायची आणि आपल्या मुलाला मात्र पोटाशी धरून बसायची. गण्या व्रात्य असला तरी लोभस होता कोणी सांगितलं तर चार गोष्टी ऐकणारा होता आईवीना पोर म्हणून तिथल्या माणसांची सहानभुती मिळतच होती आणि त्यांच्याच संगतीत राहून गण्याला कोर्टाची भाषा कळायला लागली तो कारकुन टंकलेखकाची छोटी मोठी कामं करायला लागला व्यवहारज्ञान मिळत गेल्याने तो जास्त तल्लख झाला. ढेकळांमुळे त्याने किती भात खाल्ला हे सावत्र आईला कळायचच नाही. शिवाय दुधीभोपळ्याची भाजी त्याला प्राणा पेक्षा प्रिय त्यामुळे ती ही तो हादडायचा.
कोर्टातल्या लोकानी गण्याच्या मागे लागून त्याचा अभ्यास करून घेतला तो दहावी झाला बारावी सुद्धा झाला मग याच लोकानी खटपट करून त्याला कोर्टात शिपाई म्हणून लाऊन घेतला मग तो पदवीधर झाला आणि कारकून झाला मग तिथल्याच एका मुलीची सोयरीक सांगून आली आणि सुस्वरूप सुशिक्षीत मुलगी त्याची पत्नी म्हणून या घरात आली.
सावत्र आईचा मुलगा मात्र आईच्या पदराआड राहून किरकिरा लाडावलेला राहिला ना शिकला ना सवरला
सगळे म्हणायचे सावत्र असून या बाईने गण्याचं सगळं चांगलच केलं. धाकटीला प्रश्न पडायचा बाईनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मी उलट्या आमलात आणल्या तरी या मुलाचं भलं कसं झालं
कारण ही मोठीकडे सवत म्हणून बघत होती. आणि ती गणूची आई म्हणून सांगत होती
आपण काय सांगितलं तर ही काय करेल याचा अंदाज तिला बरोबर होता म्हणूनच लेकराची जन्माची सोय करून ती माऊली गेली आणि चांगुलपणाचं बोचणारं दान आपल्या सवतीच्या पदरात टाकून गेली.
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)