माझी भाजीवाली – सखी, शिक्षिका!
रोजचीच धावपळ, लगबग असते. परंतु आज मात्र निवांत वेळ होता आणि मुख्य म्हणजे मी उशीरा गेल्यामुळे आज तिच्याकडे गर्दी नव्हती. मला उशीर झाला की तिच्या कडची भाजी संपलेली असते. आज तशी बरीच शिल्लक होती. तेच खरे निमित झाले आजच्या संवादाला आणि उलगडला एकां कष्टकरी स्त्रीचा रोजचा दिवस.
माझ्यासाठी ती ‘ए ताई’ आणि तिच्यासाठी मी ‘अहो ताई’. दोघीनाही एकमेकींचे नाव माहीत नाही. अर्थात, त्यावाचून काही अडलेही नाही. गेल्या कित्येक दिवसांचा शुद्ध व्यवहार आमचा. भाजी घ्यायची आणि रोख पैसे द्यायचे. तेसुद्धा घासाघीस न करता. तरीही त्या व्यवहाराला देखील एक अदृश्य अशी भावनिक झालर असतेच. नकळत जोडलेली. भाजी घेता घेता ती मन मोकळे करणार आणि मी तिचे म्हणणे ऐकून घेणार.
अतिशय प्रसन्न, हसतमुख अशी ती माझी भाजीवाली, माझ्याशी मनमोकळा संवाद साधणारी एक प्रकारे सखीच नाही का माझी?
आजचा संवाद मात्र मला थक्क करून गेला.
मी : काय ग ताई, आज तुला उशीर झाला का? भाजी संपली नाही तुझी.
ती : हो ना! आज ट्रेन लेट होती.
मी : कुठून येतेस तू?
ती : ‘सफाळे’ माहित आहे का? तिथून आत माझे गाव आहे. ‘दातिवरे खार्डी’ ह्या नावाचे. स्टेशन पासून वाहनाने साधारण तासभर आत असेल. टमटम (मोठी रीक्षा) केली तर २५ रु रोजचे. आणि ती करावीच लागते. रिक्षातून उतरल्यावर पंधरा-वीस मिनीटे चालावे लागते.
मी : आणि आमच्या इथे येताना पण तुला रिक्षा करावी लागत असेल ना? त्याचे ३० रु. शिवाय ट्रेनचे भाडे. म्हणजे रोज तुझे दीडशे रुपये प्रवासात जात असणार. (हा माझा आगाऊपणा). किती वाजता निघतेस ग घरातून?
ती : मी सकाळी दोन वाजता उठते.
मी : सक्काळीss? अगं मध्यरात्री म्हण गं. सगळे गाढ झोपेत असतात तेव्हा तू उठून करतेस काय?
ती : सकाळी उठून मुलांसाठी डबा भरायचा, आंघोळ, कपडे-भांडी धुणे, पाणी भरणे ही रोजची कामं करून मी चार वाजता घर सोडते. पाच पर्यंत स्टेशनला पोहोचते. मग फाटक ओलांडून पलीकडे भाजी विकत घ्यायची. आणि ट्रेन पकडून इथे यायचे. वेळेत आले तर सकाळी फिरायला येणारे भाजी घेऊन जातात. भाजी लौकर संपली तर दोन वाजेपर्यंत घरी जाते नाही तर मग तीन चार पण वाजतात.
मी : झोपतेस किती वाजता?
ती : संध्याकाळचे जेवण आणि इतर कामं करून झोपायला साडेदहा अकरा वाजतात.
मी : धन्य आहे गं तुझी! खातेस काय मधल्या वेळेत?
ती : येताना घरून चहा, चपाती खाउन निघते आणि मग घरी गेल्यावर जेवते. कधीतरी उशीर झाला तर ट्रेन मध्ये विकायला आलेले पण खाते.
मी : बाप रे! किती कष्टाचा दिवस असतो तुझा आणि तोही गेली कित्येक वर्षे.
ती : ताई, मी पण कधी कधी विचार करते की कसे काय निभावले सगळे? मुलं लहान असताना… पण ह्या भाजीमुळे माझी दोन्ही मुलं शिकू शकली.
मी : मला तुझे खूप कौतुक वाटते आहे आज. इतके कष्ट करूनही रोज सगळ्यांशी हसून बोलतेस. दमत असलीस तरीही दाखवत नाहीस तू कधीही. मला तू कायम हसत असतेस ते खूप आवडतं.
ती : हो, माझ्या शेजारच्या बायका पण मला असंच सांगतात. (हे सांगताना गोड लाजली ती)
ही माझी भाजीवाली खंर तर अशा अनेक कष्टकरी स्त्रियांची प्रतीनिधी आहे. आपल्या सभोवताली ती रोजचा दिवस अमाप कष्टाने साजरा करत असते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख, समाधान शोधून आनंदाने रहात असते. एकार्थी ती शिक्षिका पण आहे.
कष्टाने, आनंदाने आणि स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मूलमंत्र शिकविणारी शिक्षिका!
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)