वाचण्यासारखे
मुलांच्या प्रगतीला पोषक गोष्टी करणं चूक आहे का डॉक्टर?’’ यापुढचे संवाद मला माहीत होते. ‘‘आम्हाला जे कष्ट करावे लागले, ज्या अडचणी आल्या, जे सुख मिळालं नाही, ते मुलांना मिळावं असं वाटणं चूक आहे का? तेव्हा आई-वडिलांजवळ पुरेसे पैसे नव्हते. त्यांची ऐपतही नव्हती; पण आज आमच्याजवळ मुलांना देण्यासाठी सगळं काही असताना ते कशासाठी अडवून ठेवायचं?’’
हा एक फसवा युक्तिवाद आहे! हा निसर्गविरोधी तर आहेच, पण मुलांचं यशच हवं असेल तर त्या उद्दिष्टाला हरताळ फासणाराही आहे. प्रतिकूलतेशिवाय प्रगती नाही! प्रगतीचा महत्त्वाचा घटक उद्दिष्टाचं अप्रूप, त्याची दुर्दम्य इच्छा आणि त्या इच्छेआड येणारे अडथळे पार करण्याची क्षमता. अशा अडथळ्यांविना आपसूक मिळणारं यश पचत नाही, पेलवत नाही. प्रतिकूलतेशिवाय प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही. मुलांना लशी का टोचाव्या लागतात? लस म्हणजे जंतूंचा अर्क! तो शरीरात शिरल्याशिवाय त्याची प्रतिकारशक्ती जागृत होत नाही. मूल जन्म का घेतं? ते जेव्हा पंधरा टक्क्यांच्या वर आईची ऊर्जा वापरू लागतं, तेव्हा निसर्गच त्याला उबदार गर्भाशयातून बाहेर काढतो. संत्र्याच्या झाडाला बहर यावा यासाठी त्याचं पाणी तोडावं लागतं. पाणी मिळेनासं झालं तरच ते झाड फुलतं, फळ धरू लागतं. गरज पुन्हा वंशसातत्याची अन् प्रेरणा प्रतिकूलतेची.
‘‘मग आता आम्ही काय करावं? आयुष्याची भलीसुरती वाट खड्डे करून खडतर कशी करायची? आणि का?’’ बाईंना माझं लॉजिक समजेना.
‘‘खडतर करू नका, पण त्याच्या पायानं तर चालू द्या ना! त्याला खांद्यावर उचलून पांगळं करू नका. मुलांची वाट मखमली पायघडय़ांची केल्यानं त्याचा वेग वाढत नाही, हरवून बसतो. आयुष्याचं अप्रूप, कुतूहल ओसरण्याइतकी समृद्धीची दुसरी वाईट बाजू नाही. बदल म्हणून का होईना, एकदा ट्रिपला विमानाने न जाता पॅसेंजरने जा. त्याला मित्रांसोबत सायकलवर पाठवा. त्याला तहान-भुकेची जाणीव होऊ द्या. तुम्ही त्याला भुकेची जाणीव होण्यापूर्वीच जेवू घालता. अशाने भूकही मरते आणि अन्नाचे अप्रूपही. कडकडून लागलेल्या भुकेनंतर प्रयासाने मिळणारे दोन घास आयुष्यातला अविस्मरणीय आनंदाचा ठेवा होतो. मागेल ते देणं हे प्रेम नव्हे. आवश्यक ते द्या, हवं ते देऊ नका. पिलांच्या पंखात बळ यावं म्हणून पक्षीण त्यांना भरवते, पाठीवर घेऊन उडत नाही. त्याला अपंग करीत नाही. फिक्स झालेल्या मॅचच्या यशापेक्षा परिश्रमाअंती झालेला पराभव परवडला, कारण तो जास्त आनंद देतो.
यशातून मिळणारा आनंद हा यशाकडे जाणाऱ्या प्रवासात आहे. तो प्रवास ज्याचा त्याने केला तरच त्याला आनंद मिळेल. असं यश थोडं असलं तरी त्यातून मिळणारा आनंद मोठा असतो. तोच अजून मोठे यश मिळवण्याची प्रेरणा देतो. या प्रवासात ‘जे न मिळे त्यासाठी जगणे’ हा ‘नाद मधुर-कटू’ जडण्यासारखी मजा नाही. मुलांचा तो आनंद हिरावून घेऊ नका.’’
सवयीने मी प्रिस्क्रिप्शन पॅड ओढलं. समीरचे नाव लिहून ‘आरएक्स’ची खूण केली. आता मी काय औषध लिहितो हे डॉक्टर दाम्पत्य कुतूहलाने पाहात असतानाच बर्टार्ड रसेलचे हे प्रसिद्ध वाक्य लिहिले – ‘आयुष्यातल्या खऱ्या आनंदासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे, हव्या असलेल्या गोष्टींपैकी काही गोष्टी न मिळणे!’
– डॉ. नंदू मुलमुले
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)