I’m Right – आपलं तेच खरं कसं?
एक चोवीस- पंचवीस वर्षाचा मुलगा आणि त्याचे बाबा ट्रेननं जात असतात. ट्रेन पळू लागते तशी झाडं पळू लागतात.
मुलगा जोरात ओरडतो, ‘बाबा, झाडं. झाडं पळताहेत. बाबा डोंगर पाहा.’ बाबा हसतात. उत्सुकतेनं त्याच्याबरोबर ती पळती झाडं पाहतात.
थोडय़ा वेळानं मुलगा परत ओरडतो. ‘बाबा धबधबा. बाबा, मला जायचंय अशा धबधब्याजवळ’.
बाबा म्हणतात, ‘हो जाऊ. नक्की जाऊ.’
थोडय़ा वेळानं ट्रेनमधे प्लॅस्टिकची खेळणी विकणारा येतो. मुलगा सारी खेळणी उत्सुकतेनं पाहतो. ओरडतो. काही विकतही घेतो. शेजारी बसलेल्या एका माणसाला मात्र हा सारा प्रकार फार इरिटेट करतो. शेवटी न राहवून ते गृहस्थ या मुलाच्या बाबांना म्हणतातच, ‘तुम्ही एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे का नेत नाही या मुलाला. कसा वागतोय तो. एवढा तरणाताठा पोरगा. काळजी घ्या.’
बाबा हसतात. म्हणतात, ‘डॉक्टरकडूनच येतोय ना, नुकतंच डोळ्याचं ऑपरेशन झालं त्याचं, आता त्याला नीट दिसतंय. लहानपणापासून त्याला दृष्टी नव्हती, आता दिसायला लागलंय.’ एवढं ऐकून तो माणूस ओशाळतो आणि अधिक सवालजबाब न करता गप्पच होतो.
***
आपलंही अनेकदा असंच होतं.
इतरांविषयी काहीही माहिती नसताना किंवा काहीही विचार न करताही आपण सर्रास तोंड उघडतो आणि मतांची ¨पक टाकतो. आपल्या नजरेतून इतरांचं वागणं बेततो. असं केलं तर आपल्याला कशी कळतील खरीखुरी माणसं?
(साभार – दै. लोकमत, मूळ लेख – आपलं तेच खरं कसं?)