नेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर

5157081239745615041_Org

दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही,
कारण प्रत्येक पिणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही.

सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पेग पाशी गाडी अडते.
आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते…

पिण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
विचारवंतांची गोलमेज परीषदच भरते,
रात्री दिलेला शब्द प्रत्येक व्यक्ती
सकाळच्या आत विसरते.

मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो,
पेग बनवणारा त्यदिवशी
जग बनवणार्‍यापेक्षा मोठा असतो.

स्वत:च्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाची फेरी घडते.
आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते…

पिण्याचा कार्यक्रम म्हणजे पिणार्‍याला
दरवेळेस नवीन पर्व असते,
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पिण्याच्या क्षमतेवर श्रद्धा असते.

आपण हीच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात,
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान भागवतात.

शेवटी काय, दारु दारु असते
कोणतीही चढते…
पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते…

पिणार्‍यामध्ये प्रेम हा
चर्चेचा पहिला विषय आहे,
देवदासचे खरे प्रेम पारो, की दारु ?
याचा मला अजून संशय आहे.

प्रत्येक पेग मागे “ती”ची
आठवण दडली असते,
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते.

तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भिडते…
आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते…

चुकून कधीतरी गंभीर विषयावरही
चर्चा चालतात,
सगळे जण मग त्यावर
Ph. D केल्यासारखे बोलतात.

प्रत्येकाला वाटते की त्यालाच
यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनिवडणूकीकडे वळते.

जसा मुद्दा बदलतो
तशी आवाजाची पातळी वाढते
आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते…

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: