बंद मूठ
भाच्यानं अभावितपणे प्रश्न केला, ”मामा, छोट्या छोट्या बाळांच्या मुठी गच्च वळलेल्या का रे असतात? काय लपवलेलं असतं त्यांनी आपल्या हातात?”
आतापर्यंत इतक्या जणांची कित्येक बाळं पहिली. त्या सर्वांच्या बाळमुठी वळलेल्या होत्या; पण हा प्रश्न मला कधीच पडलेला नव्हता. छोट्या रुचिरला मात्र मात्र तो पडला. बहीण म्हणाली, “कालपासनं मला विचारून भांडावलंय, म्हणून मी तुझ्याकडे पाठवलंय. दे आता उत्तर! शेजारच्या घरात नवं बाळ आलंय – स्वारीनं पाहिलं आणि हेच विचारतोय!”
भाच्यानं माझा चांगलाच ‘मामा’ केला होता; पण त्याला देण्यासाठी एका उत्तराचा विचार करताना नवाच विचार तरारून आला. म्हटलं, ”अरे, देवाच्या घरून जेंव्हा बाळ येतं ना पृथ्वीवर, तेंव्हा देव प्रत्येकाच्या हातात एकेक नवी गंमत देतो न् म्हणतो, याच्या साहाय्याने स्वतः आनंद घे आणि जगाला आनंद दे. बघ, कुणाच्या हातात सुरेल गळ्याचा खाऊ, कुणाला तबला वाजवण्याची कला, कुणाच्या हाती उत्तम भाषणाची कुवत, कुणाला खेळाचा छंद, कुणाला झाडंच लावण्याची आवड, कुणाला कवितेचे पंख! एक ना दोन! जितके हात, तितक्या प्रकारचा खाऊ देवाकडे आहे, बेटा! देव म्हणतो, ही कला देतोय – मूठ घट्ट कर व पृथ्वीवर जा. हळूच उघडून बघ नि ओळख, स्वतःकडे कुठली कला आहे ते!”
“म्हणजे सर्वांकडे एखादी कला असतेच?” ”परमेश्वर कुणालाच मोकळ्या हाताने पाठवीत नाही. शहाण्या मुलांना वेळीच कळतं न् ते त्या कलेच्या, छंदाच्या सोबतीनं सारं जग आनंदी करतात!”
“अस्सं! माझ्याही हातात कलेचा खाऊ दिला असणारच देवानं!”
“निश्चितच. चल आत्तापासून स्वतःत कुठली कला, कुठली क्षमता आहे हे शोधायला सुरुवात कर!”
आपल्याही भोवती असे पुतणे, भाचे असतीलच! त्यांच्या बंद मुठीतल्या क्षमतांचं भान देणारे मामा – काका – आई – बाबा होता येणं हीही कलाच! मूठ उघडून बघा तरी…
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)