लाईफ

वाचा एकदा खूप मस्त आहे थोडा वेळ लागेल पण नक्कीच आवडेल तुम्हाला….

flowers-165a

एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला.
दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो.
काहीतरी दुसरे घेऊन बाहेर पडतो आपण.
परतताना मनात विचार येतो
‘तो ड्रेस घ्यायला हवा होता”

सिग्नलला गाडी थांबते,
चिमुरडी काच ठोठावते.
गोड हसते, पण भिक मागत आहे
हे लक्षात घेऊन त्या हसण्याकडे फार लक्ष देत नाही आपण.
२-३ रुपये द्यावे असे मनात येते.
रेंगाळत सुटे शोधता शोधता ‘देऊ का नको’ हा धावा मनात सुरू असतो.
तेवढ्यात सिग्नल सुटतो,
गाडी पुढे घ्यायची वेळ येते.
थोडे पुढे गेल्यावर मन म्हणते,
‘सुटे होते समोर, द्यायला हवे होते त्या चिमुरडीला’

जेवणाच्या सुट्टीत ऑफिसातला मित्र त्याच्या घरातला त्रास फार विश्वासाने सांगतो,
त्याच्या डोळ्यात व्यथांचे ढग दाटलेले दिसतात.
वाईट वाटते खूप, नशीब आपण त्या परिस्थितीत नाही असेही मनोमनी पुटपुटून आपण मोकळे होतो.
‘काही मदत हवी का?’ असे विचारायचे असूनही आपण गप्प राहतो.”
जेवणाची सुट्टी संपते.
तो त्याच्या आणि आपण आपल्या कामाला लागतो.
क्षणभर स्वत:वर राग येतो, ‘मदत तर विचारली नाही’
निदान खांद्यावर सहानुभूतीचा हात तरी ठेवायला हवा होता मी!’

असेच होते नेहमी,
छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात.
खरं तर या छोट्या गोष्टीच जगण्याचे कारण असतात.

गेलेले क्षण परत येत नाहीत,
राहतो तो ‘खेद’, करता येण्यासारख्या गोष्टी न केल्याचा.

जगण्याची साधने जमवताना जगणेच राहून जात नाहीये ना ते ‘चेक’ करा.
“आनंद झाला तर हसा, वाईट वाटले तर डोळ्यांना बांध घालू नका”

चांगल्या गोष्टीची दाद द्या,
आवडले नाही तर सांगा,
घुसमटू नका.”

त्या त्या क्षणी जे योग्य वाटते ते करा.
नंतर त्यावर विचार करून काहीच साध्य नाही.

आयुष्यातल्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्या,
त्या छोट्या क्षणांना जीवनाच्या धाग्यात गुंफणे म्हणजेच जगणे.”

आवडलेल्या गाण्यावर मान नाही डुलली तर ‘लाईफ’ कसले?
आपल्यांच्या दु:खात डोळे नाही भरले तर ‘लाईफ’ कसले?
मित्रांच्या फालतू विनोदांवर पोट दुखेस्तोवर हसलो नाही तर ‘लाईफ’ कसले?
आनंदात आनंद आणि दु:खात दु:ख नाही जाणवले तर ‘लाईफ’ कसले?

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

One thought on “लाईफ

  1. काय सुरेख लिहलंय हे. खुपच छान.मला खुपच आवडले. मी हे माझ्या संग्रहात ठेवणार आहे. असंच छान छान पोस्ट करत रहा.धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: