I, मी आणि Myself…
माझा मूड, माझी आवड, माझ्या फिलिंग्ज, मला आत्ता काय वाटतं, माझ्या डोक्यात काय किडे झालेत, मला कशाचा त्रास होतोय.
एकदा एका साधूकडे एक तरुण मुलगा जातो. म्हणतो गुरुजी, मला एखादं साधं सोपं व्रत द्या, असं व्रत जे केल्यानं माझं पटकन कुणाशी भांडणच होणार नाही. साधू म्हणतात, सोपंय. बोलताना कुठल्याच वाक्यात ‘मी’ असा उल्लेख करायचा नाही. मी नाही, माझं नाही, माझ्यामुळे नाही, मला काय वाटतं असं काहीही म्हणायचं नाही.
तरुणाला वाटतं, त्यात काय अवघड आहे?
पण एक पूर्ण दिवसही त्याला ‘मी-माय -मायसेल्फ’हा उल्लेख टाळता येत नाही. त्यात हा तरुण आजच्या फेसबुकी जमान्यातला, जिथे स्वत:ची आरती आणि दुसर्याची नालस्ती यापलीकडे दुसरं काही बोलणंच होत नाही. तो तरुण एकाच दिवसात थकतो आणि गुरुजींना विचारतो की,
‘‘ याहून सोपं दुसरं काही नाही का?’’
ते म्हणतात, ‘‘आहे ना, काहीच बोलू नकोस.’’
कल्पना करून पाहा, काहीच न बोलता मौन व्रत धारण करून राहणं जितकं अवघड त्याहून अवघड ‘मी’चा उल्लेख टाळणं. जमेल ?
आपण किती मी-मी म्हणतो.
ज्यात त्यात आपलं एकच, माझं ऐक. मी म्हणतो तेच खरं, मी म्हटलं तसं केलं असतं तर बरं झालं असतं, माझं कुणी ऐकूनच घेत नाही. मला काय वाटतं हे महत्त्वाचं, मला जे पटलं तेच मी केलं.
हा ‘मी-मी’चा जप करणं आपण सोडून देऊ शकू. निदान प्रयत्न तरी करू शकू.
बोलताना किती मी मी म्हणतो आपण, एकदा सहज तपासून पाहूया का.?
माझा मूड, माझी आवड, माझ्या फिलिंग्ज, मला आत्ता काय वाटतं, माझ्या डोक्यात काय किडे झालेत, मला कशाचा त्रास होतोय.
किती तो मीपणा ज्यात त्यात.!
पण आपल्याला जसं वाटतं, तसंच ते इतरांना वाटत असणार.
आपल्या मी मीचा, मीच कसा भारी या अँटिट्यूडचा लोकांना त्रास होत असणार हे आपण लक्षातच घेत नाही.
आणि त्यानं होतं काय, तर आपल्यापाठी लोक आपल्याला हसतात.
म्हणतात, अशा माणसांना स्वत:पलीकडे जगच दिसत नाही.!
क्या बोलते है?
हा ‘मी’पणाचा ताठा सोडून, स्वत:ची आरती करणं सोडून अवतीभोवती जरा स्वच्छ नजरेनं पाहता येईल. जमलंच तर जे आहे ते स्वीकारता येईल.
ज्यात त्यात मी पणाचा टॅग न लावता.?
Grow
अबोले, भांडणं, राग, रुसवे काट्याचे नायटे आणि मनातल्या अढय़ा. बास की आता!
‘‘अगं पण झालं काय? ते तरी सांग. किती वेळ अशी हुप्प करून बसणारेस, तू बोललीच नाहीस तर मला कळणार कसं.?’’
‘‘साधं एवढं पण नाही का समजत तुला? तुझं तू काय ते समज, तुला कळायला हवं.!’’
– हे असे संवाद आपण कितीदा आपापसात ऐकतो. अनुभवतो. राग आला म्हणून रुसून बसतो. अबोले धरतो.
गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्डशीच कशाला, मित्रांवरही असा दात धरतो. भांडण झालं की कित्येक दिवस तोंडाचे फुगे करून बसतो.
ज्याच्याशी भांडण झालं, त्याचे कितीही फोन आले, तरी आपण नाहीच उचलत. फोन वाजत राहतो आणि आपण नाही म्हणजे नाहीच अँन्सर करत. नाही तर नाही एसएमएसला उत्तर देत.
एरवी कुणी असं वागत असेल तर आपल्याला किती पोरकट वाटतं!
पण वेळ आली की आपणही तसेच वागतो.
मनात अढय़ा धरतो त्या वेगळ्याच, पण फालतू कारणांवरून अबोले धरतो आणि काट्याचा नायटा होईपर्यंत ताणतो.
त्यापेक्षा नवीन वर्षात जुन्या अबोल्यांची, रुसव्यांची सगळी जळमटंच सोडून दिली तर.?
ती ‘चक दे’तली पहिलवान गरम भेजा पंजाबी मुलगी म्हणते ना,
‘‘ए, सॉरी देगी की जेल जाएगी?’’
तसं आपणही म्हणून टाकलं तर, बास आता काय बावळटासारखं भांडायचं नी कट्टी-कट्टी करायचं?
ग्रो अप.!
महत्त्वाच्याच काय पण न महत्त्वाच्या माणसांशीही अकारण धरलेले अबोले, त्यांच्यावरचा राग हे सगळं सोडून दिलं तर?
तेवढंच मन हलकं होऊन जाईल, नको त्यावेळी निगेटिव्ह भावना मनात गर्दी करणार नाहीत.
आपण कोणाशी कितीही चांगलं वागा, लोक कायम आपल्याला हर्टच करतात, असं वाटून स्वत:ची दया येणार नाही.
मस्त वाटेल की, आपल्या बाजूने आपण तर दोस्तीचा हात पुढे केला होता, नाही जमलं तर ना सही. जमलं तर उत्तमच!
मात्र नको ती ओझी मनावर वाहत राहण्यापेक्षा, फुटकळ कारणांवरून आलेला राग सोडून दिलेला बरा.
ज्याला त्याला वाटत बसण्याएवढा आपला राग स्वस्त का आहे.?
काय?
Listen
कुणी एक कमेण्टला की त्यावर दुसरा की तिसरा, कुणी कुणाचं म्हणणं वाचत नाही की समजून घेत नाही, ज्यात त्यात कमेण्टणं मस्टच!
एका लग्नाच्या दुसर्या गोष्टीतली ती काकू आठवते..? (आत्ता ’होणार सून’मधल्या श्रीची छोटी आई झालीये तीच ती.)
तर ती बोलता बोलता सहज म्हणायची, ‘लिसन ना.!’
तिलाच कशाला अनेक माणसं स्वत: खूप बोलतात आणि दुसर्याला म्हणत राहतात, ऐक ना, ऐक ना.
त्यांचं ऐकून ऐकून इतरांना कंटाळा येतो.
पण ते बोलत राहतात, बोलत राहतात. बोलतच राहतात.
आणि या अशा माणसांत आताशा आपलाही समावेश होतो का?
– तपासून पाहायला हवं.
आणि त्यासाठी किमान एक मिन्टंभर तरी गप्प बसून पाहायला हवं.
आपण आता ऐकूनच घेत नाही कुणाचं काही.कारण ऐकण्यासाठी स्वत: गप्प तर बसायला हवं.समोरच्याला वाटायला तर हवं की, आपण पोटातलं काही मनापासून सांगावं, सांगितलं तर याच्यापर्यंत पोहचेल!
तसं होतच नाही. कारण आपल्याला ऐकण्यापेक्षा सुनावण्यातच हल्ली जास्त रस असतो.
अगदी फेसबुकवरचं वातावरण असतं तसं. कुणी एक कमेण्टला की त्यावर दुसरा की तिसरा, कुणी कुणाचं म्हणणं वाचत नाही की समजून घेत नाही, ज्यात त्यात कमेण्टणं मस्टच. हे सारं लोकलमधल्या बायकांच्या डब्यातल्या वातावरणासारखं.
त्या डब्यातल्या ग्रुप्समध्ये अनेक जणी अशा असतात की, समोरची कुणी बोलत असेल तरी ह्या बोलतात. अनेकदा तर दोघीही बोलतात.कुणीच कुणाचं ऐकूनच घेत नाही.
हे असं होतंय का आपलं, आपण आता कुणाचं काही ऐकूनच घ्यायला तयार नसतो.
अगदी घरात, मित्रमैत्रिणींत, ऑफिसात, कुठंही.
कोण काय म्हणतोय, का म्हणतोय, काय सांगतोय,
हे आपल्यापर्यंत पोहचतच नाही अनेकदा.
कारण आपण बोलतच सुटलेलो आहोत.
हे ऐकूनच न घेता ‘फक्त बोलणं’ सोडून देता येईल.?
येईल का? आपलं बोलणं कमी करून ऐकता?
तसंही म्हणे, आपल्याला कान दोन आणि तोंड एकच आहे.
तेव्हा कानाचा वापर वाढवून पाहायला, ही बोलत राहण्याची सवय सोडून तर द्यायला पाहिजे ना..!
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)