Vacuum Cleaner

मिताली काही दिवसासाठी राहायला माहेरी आली होती. माहेरी आलेल्या मुलीचे लाड जोरात चालू होते आणि सध्या तर काय मितालीची लाडकी आजी सुद्धा तिथे राहायला आली होती.. त्यामुळे मिताली जास्तच खुश… मितालीच्या आवडीचे पदार्थ तिची आई आणि आजी अगदी उत्साहानी करत होत्या. ह्या वेळी मिताली थोडी जास्तच दिवस राहायला म्हणून आलेली. आज घरात आई आजी आणि मिताली अशा तिघीच होत्या. बाबांची सुट्टी संपली असल्यामुळे बाबा ऑफिस ला गेले होते. मिताली हॉल मध्ये vacuum क्लिनर नि साफ सफाई करत होती… तिला स्वच्छतेची खूपच आवड होती. लग्नाआधी पण ती घर एकदम छान ठेवायची हि संधी साधून आईने मितालीला हाक मारली. “मनू … ए मनू … अग ऐकतियेस का ??” मिताली कडून काहीच उत्तर नाही.. भाजी निवडत बसलेली आजी हे सगळं बघत होती. “मितालीsss” पण आज ती वेगळ्याच तंद्रीत होती.. विचार करत…

शेवटी आईने मितालीच्या जवळ जाऊन तिला हलवले तेव्हा कुठे तिची तंद्री भंगली…

“काय ग कॊणत्या विचारांमध्ये हरवलीयेस? तुला आता अजिबात करमत नाही वाटतं अजय शिवाय.”

“नाही ग आई. असं काही नाही. काय झालं बोल ना.”

“अग मी कधीची हाक मारतेय तुला. तू आधी ते हातातलं बाजूला ठेव आणि इकडे ये अशी. बस आमच्याजवळ जरा” असं म्हणत आईने जवळपास ओढत मितालीला आजीजवळ बसवलं आणि स्वतः पण बसली. “अगं आई तो एकच कोपरा राहिलाय तेवढा तर…. ”

“ते नंतर होईल ग. बस अशी जरा आमच्याजवळ….” आजीला सुद्धा बरं वाटलं अगदी …

”मिताली… कसं चाललंय ग सगळं तिकडे? जमतंय ना मनू तुला…. म्हणजे मला खात्री आहे अगदी तुझी … तू सगळं छान करत असशील… ” आई.

“हो ग आई. मस्त एकदम.सगळं छान. सगळे खूप कौतुक करतात माझं. आणि अजय तर तुला माहितीच आहे. किती काळजी घेतो ते.”

“हो हो. खरंय. जमवून घेतेस ना ग सगळ्यांशी?” आई .

“अग आई हो.. असं का विचारतीयेस. आपण बोलतो कि कितीदा फोनवर .”

“हो अग फोनवर चेहरा नाही दिसत ग मनू… तू काय आणि आम्हाला त्रास नको म्हणून सगळं छान छानच सांगशील. माहितीये न मला. समोरासमोर जरा बर वाटतं ग तुला पण अजून सगळं नवीन आहे न म्हणून काळजी वाटते ग…  नाही सगळे छानच आहेत ग तसे. चांगली माणसं मिळाली तुला. त्यामुळे तशी काळजी नाही मला.. तू सुद्धा सगळ्यांना धरून राहायचं बरं का.. तुला काही त्रास नाही हो घरी…. सगळ्यांचे स्वभाव अगदी छान आहेत. आई पण अगदी छान कौतुक करतात तुझं.” आई.

“तुम्ही बसा दोघी.. मी जरा चहा ठेऊन आले आपल्याला .. “असं म्हणून डोळ्याच्या पाणावलेल्या कडा लपवत आई आत गेली.

मितालीच्या मनात मात्र वेगळंच वादळ घोंगावत होतं. किती कौतुक करते आई त्यांचं कायम. मान्य आहे मला काहीच त्रास नाही. पण म्हणून दर वेळी सगळं बरोबरच असतं असं नाही ना. आणि ते करतात का तुमचं असं कौतुक तुम्ही सगळ्या गोष्टी करून. खरं तर अजयशी भांडून मिताली इकडे आली होती. दोघांच जमायचं छान खरं पण अधून मधून अशी भांडणं सुद्धा होत असत. भांडणाच कारण अगदी शुल्लक असायचं पण नंतर ते मोठ्या भांडणात कधी रुपांतरीत व्हायचं ते त्यांना कळत पण नसत. अजयच्या घरच्यांशी मिताली पटवून घेण्याचा मनापासून प्रयत्न करत होती पण काही गोष्टीत त्यांनी सुद्धा थोडं समजून घ्यायला हवं असं मितालीला वाटत होतं. पण अजयला असं सांगितल्यावर तो कायम घरच्या लोकांची बाजू घेत असे आणि मितालीलाच समजून घ्यायला सांगत असे. ह्यावेळी मात्र मिताली खूपच चिडली होती. ह्या आणि अशा अनेक मागच्या गोष्टी तिने अगदी लक्षात ठेवल्या होत्या. त्यामुळे दर वेळी मीच का समजून घ्यायचं ? मीच का बदलायचं? हा प्रश्न तिला पडला होता. मितालीच्या मनात मोठ वादळ घोंगावत होतं… ती सकाळपासून हाच विचार करत होती… घरी बोलून दाखवलं तर घरचे काय आपल्यालाच समजावतील त्यामुळे घरी काही सांगायचं नाही असं ठरवलं होतं तिने.

“काय ग गब्बू कसला विचार चाललाय??” आजीच्या आवाजाने मितालीची तंद्री भंगली. “ते बघ तुझी आई गेली आत … मला काही सीक्रेट सांगायचंय का ??” आजीने एकदम दबक्या आवाजात कुजबुजत मितालीला विचारले. मिताली आणि आजी एकमेकींना अगदी जवळच्या. लहानपणापासून ज्या गोष्टी डायरेक्ट आई बाबांकडून होकार मिळणार नाही अशा गोष्टी आजीकडून बरोबर सांगितल्या जायच्या. घरातलं सुप्रीम कोर्ट होतं ते. मिताली तर हाक मारताना पण सुप्रीम कोर्ट म्हणायची कधी कधी… अगदी सीक्रेट गोष्टी सुद्धा मिताली आजीसोबतच share करायची. अजय आणि मितालीचं लग्न पण तसंच झालं होतं.

आजीचं बोलणं ऐकून मिताली हसली आणि म्हणाली “नाही ग आजी … सीक्रेट काही नाही .. मी ना आमच्या घरी पण असा vacuum क्लिनर आणायचा विचार करतेय ग … मस्त कोपरा न कोपरा स्वच्छ होतो … अगदी सोफा वगैरे पण ” आजीला पण आता कुठे हे सांगत बसा असं म्हणून मितालीने विषय बदलला.

इतक्यात मितालीची आई तिघींना चहा घेऊन आली.

चहाचा एक घोट घेत आजी म्हणाली “हम्म .. घे कि vacuum क्लीनर … घर साफ करायला ना … घाणेरडं घर … अस्वच्छ घर कुणाला आवडतं ??… पण २ घे”

“२ कशाला? एक बास झाला कि आजी . ”

“घर स्वच्छ राहावं म्हणून घेणारेस तर मन पण स्वच्छ करायला हवं ना सारखं …” प्रश्नार्थक चेहऱ्यांनी मितालीने आजीकडे बघितलं. “घराचा कोपरा न कोपरा स्वच्छ राहावा म्हणून धडपडतेस ना गब्बू तशी आपल्या मनाची पण साफसफाई व्हायला हवी ग. त्यात काही कडवे अनुभव , कुणी वाईट बोललेलं असेल तर ते अधून मधून साफ करावं लागतं नाहीतर आपलं मन पण कायम कचकच करत राहतं ग. घरातल्या कचऱ्यासारखं… घरात खूप कचरा साठल्यावर कशी दुर्गंधी येते तशी आपल्या बोलण्यातून वागण्यातून कुणाला येऊ नये म्हणून साफ करायचं ग. काही डाग खूप खोलवर गेलेले असतात. लवकर निघत नाहीत. पण ते मोठे होण्याआधीच. लोकांना दिसू नयेत म्हणून प्रयत्नपूर्वक पुसून टाकायचे; जास्त जोर लावून. शेवटी कचरा करणारी.. डाग पाडणारी आपलीच माणसं असतात ग. घरात माणसंच नसतील तर कचरा होणार नाही पण त्या घरातसुद्धा आपल्याला आवडणार नाही ग. घरात कितीही माणसं आली. अगदी बाहेरची सुद्धा आणि कचरा करून गेली तरी आपण पुन्हा पुन्हा घरही साफ करतो आणि त्यांनासुद्धा परत बोलावतोच कि. तसंच आपल्या मनाचं पण… त्याच त्याच गोष्टी मनात साठवून ठेवायच्या नाहीत… कचरा आपण साठवतो का घरात ? रोजचा रोज फेकतोच ना… तसं मनाचं पण. रोज सकाळी उठलं कि नवीन सुरवात… फ्रेश वाटायला हवं ..आणि आपलं सतत स्वच्छ असणारं घर बघून नंतर लोक पण आपल्या घरी तशीच जपून वागतात… आपल्याला त्रास होऊ देत नाहीत.. कधी कधी दूरवरून आपल्याला कचरा वाटणारी गोष्ट जवळ जाऊन बघितली कि आपल्याला कळत कि अरे हि तर आपल्याला लागणारी गोष्ट आहे ,महत्वाची आहे.. त्यालाच गैरसमज म्हणतात… दर वेळी आपल्याला वाटत असत तेचं बरोबर नसत.तसं होऊ नाही द्यायचं… नाहीतर आपली महत्वाची गोष्ट… महत्वाची माणसं हरवून जातात.. आपला vacuum cleaner आपणच असतो. सतत मीच का साफ करायचं असं वाटून उपयोग नाही. दुसर्यांनी साफ सफाई करून आपल्याला उपयोग होत नाही… आपणच आपल्या मनाला समजू शकतो आणि स्वच्छ ठेऊ शकतो. आपण दुसर्यांच्या घरात किती कचरा आहे हे बघतो का किंवा साफ करतो का ? नाही न… तसच मनाच पण आहे गब्बू.. आपण स्वतःच मन कायम स्वच्छ ठेवायचं.”

मिताली अगदी आश्चर्याने आजीकडे बघत होती.. आणि हे सगळं मन लावून ऐकत होती. मितालीने आजीला पटकन मिठी मारली.. आईच्या डोळ्यात पण पाणी तरळले.. इतके वर्ष ह्या घराची साफसफाई आजीनी कशी छान केलीये आणि त्यामुळे आपल्याला किती सुख मिळालं ह्या घरात हे आईला अनुभवायला तर मिळालंच होतं आज त्याचे रहस्य पण कळाले होते… आईने सुद्धा आजीचा हात हातात घेतला. आजींना पण आईच्या एका डोळ्यातले थँक you आणि एका डोळ्यात सॉरी चे भाव वाचायला वेळ लागला नाही .. त्यांनी आईकडे बघून डोळ्यांनीच असू दे असुदे केले.

आई डोळे पुसत आत गेल्यावर मितालीने आजीला विचारले “तुला कसं कळलं .. माझ्या मनात काय चाललंय ते … ”

“सुप्रीम कोर्ट आहे न मी… ह्या कोर्टाला सगळं कळतं … ते नार्को वगैरे न करता “. असं म्हणत आजीने उगाच साडी असताना पण कॉलर ताठ केली..

“आजी ग्रेट आहेस तू … “मिताली

“आणि गब्बू ते क्लीनर ऍमेझॉन वरून घे छान स्वस्त असतात गोष्टी तिथे आणि तुला घरबसल्या मिळेल … माझ्या मोबाइलला ते करून घेतलंय मी … उगाच कधीतरी बघत बसते साड्या वगैरे ….”

आता मिताली फक्त चक्कर येऊन पडायची बाकी होती ….

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: