स्वातंत्र्यदेवतेची विनवणी

Happy Independence Day Facebook Photos

विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२ – १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककारसमीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे त्यांचे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

स्वातंत्र्यदिनावर आधारित अशीच त्यांची एक अजरामर कलाकृती..

पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करु नका।
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरु नका।।
सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत वरु नका।।

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालु नका।
अंध प्रथांच्या कुजट कोटरी दिवाभितासम दडू नका।।
जुनाट पाने गळुन पालवी नवी फुटे हे ध्यानि धरा।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका।।

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतिल दुसरे बघतिल तिसरे असे सांगुनी सुटू नका।।
जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा।
मेजाखालुन मेजावरतुन द्रव्य कुणाचे लुटू नका।।

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका।।
सत्ता तारक सुधा असे पण सुराहि मादक सहज बने।
करिन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेउ नका।।

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे।
इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकु नका।।
पाप कृपणता पुण्य सदयता संतवाक्य हे सदा स्मरा।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकु नका।।

गोरगरिबा छळू नका । पिंड फुकाचे गिळू नका।
गुणीजनांवर जळू नका।
उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरु नका।
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरु नका।।

परभाषेतहि व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी।
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका।।
भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे।
गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका।।

कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणु नका।
सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडु नका।।
पुत्र पशूसम विकती ते नर, नर न नराधम गणा तया।
परवित्ताचे असे लुटारु नाते त्याशी जोडु नका।।

स्वच्छ साधना करा धनाची बैरागीपण नसे बरे।
सदन आपुले करा सुशोभित दुसर्याचे पण जाळु नका।।
तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी।
करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका।।

सुजन असा पण कुजन मातता हत्यार हातामधे धरा।
सौजन्याच्या बुरख्याखाली शेपुट घालुन पळू नका।।
करा कायदे परंतु हटवा जहर जातिचे मनातुनी ।
एकपणाच्या मारुन बाता ऐन घडीला चळू नका।।

समान मानव माना स्त्री तिची अस्मिता खुडू नका।
दासी म्हणुनी पिटू नका वा देवी म्हणुनी भजू नका।।
नास्तिक आस्तिक असा कुणीही माणुसकीतच देव पहा।
उच्च नीच हा भेद घृणास्पद उकिरड्यात त्या कुजू नका।।

माणुस म्हणजे पशू नसे। हे ज्याच्या हृदयात ठसे।
नर नारायण तोच असे।
लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरु नका।
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरु नका।।

कुसुमाग्रज

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: