व्यक्तीविशेष: सुरेश भट

 

सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यांना ‘गझल सम्राट’ असे मानाने संबोधले जाते. आज त्यांचा जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज आम्ही प्रकाशित करत आहोत सुरेश भटांचे शेर. ज्या मध्ये सगळी अ पासून ज्ञ पर्यंत अक्षरे आहेत.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

(अ)
अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली?

(आ)
आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी
हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली

(इ)
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

(ई)
‘ईश्वरी इच्छा’च होती कालचा दंगा
माणसांनी माणसांना मारले कोठे?

(उ)
उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली

(ए)
एक मी निःशब्द किंकाळीच होतो
ऐकण्यासाठी सुना बाजार होता

(ऐ)
ऐकली आजन्म त्यांची मी शिळी रामायणे
शेवटी मी बोललो अन् ते किती रागावले

(ओ)
ओळखीचा निघे रोज मारेकरी
ओळखीचाच धोका मला यार हो

(क)
कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली

(ख)
खरेच सांग मला.. काय ही तुझीच फुले?
तुझा सुगंध कसा ये न आढळून मला?

(ग)
‘गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही.’

(घ)
घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

(च)
चाहूल ही तुझी की, ही हूल चांदण्याची?
जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला!

(छ)
छाकटे दुर्वास का निवृत्त झाले?
शापितांनी काय छाकट्यांचे करावे?

(ज)
जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही!

(झ)
झाला उशीर जेव्हा हाका तुला दिल्या मी
मातीत पावलांचे काही ठसेच होते!

(ट)
टाकली हातातली मी सर्व पाने
कोण जाणे,हारलो की जिंकलो मी

(ठ)
ठेवले मी तयार ओठांना
एकदा तू पुकार ओठांना

(त)
तसा न रस्त्यात आज धोका मला परंतू
घरात येतात वाटमारे अजून काही

(द)
दिसूनही दार तो तिथे थांबलाच नाही
खरेच दात्याहुनी भिकारी हुशार होता

(थ)
थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे..
रस्त्यास वाहणाऱ्या कसलीच खंत नाही….

(ध)
धन्य ही श्रद्धांजली जी वाहिली मारेक~यांनी,
संत हो आता बळीचा न्यायनिर्वाळा कशाला ?

(न)
नको जगा विचारू हासण्याचे गुपित माझ्या,
कित्येक हुंदक्यांनी, कोंडला एकांत माझा

(प)
पाठमोरा मी जरी झालो,तरीही
सूर्य येणारे मला कवळून गेले!

(फ)
फुलावया लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते
वसंत आला निघून गेला मला कुठे वर्तमान होते

(ब)
बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!

(भ)
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
एव्हढे मी भोगिले की मज हसावे लागले

(म)
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!
कुठेतरी मी उभाच होतो… कुठेतरी दैव नेत होते !

(य)
याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते…

(र)
रडत राखायची लोचने कोरडी
सतत कोठेतरी भिजत धुमसायचे…

(ल)
लागले न झाडांना दोनचार शिंतोडे
नाचही सुरू झाला जंगलात मोरांचा….

(व)
वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?…

(श)
शब्द म्हणाले सर्व भावना निघून गेल्या
हाय कधी अर्थाला मी सापडलो नाही….

(स)
सकाळी तू उन्हापाशी कसा केलास कांगावा,
तरीही खूण चंद्राची तुझ्या ओठांवरी होती….

(ह)
हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा
तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा….

(ज्ञ)
ज्ञानदेव लिहूनी गेले ओळ ओळ भाळी
निमित्तास माझे गाणे निमित्तास टाळी….

🌹 कवी- सुरेश भट

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)

One thought on “व्यक्तीविशेष: सुरेश भट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: