मुलीने आपल्या लाडक्या बापासाठी…

fatherdaughter

बापाच्या आयुष्यातला खरंतर हा सगळ्यात आनंदी प्रसंग. कार्यालयातून परत आल्यावर भावनिक त्सुनामी येउन गेल्यानंतरची परिस्थिती घरभर असते. बरेचजण सुट्ट्या नसल्यामुळे परस्पर कार्यालयातून स्टेशनवर पळालेले असतात. सामान घेऊन गाड्यांबरोबर माणसंही घरी येतात. थकवा ओसरला की निघायच्या दृष्टीने रिटायर्ड लोकांनी दोनचार दिवसानंतरची जायची रिझर्वेशंस केलेली असतात.…. !

मागे राहिलेले दहाबारा पाहुणे, घरभर अस्ताव्यस्तं पडलेलं सामान, रंगीबेरंगी कागदात गुंडाळलेली प्रेझेंटस, बाहेर लावलेल्या लाईटच्या माळांचा निस्तेज प्रकाश, प्रत्येकाच्या चेह-यावर मानसिक आणि शारीरिक थकव्याचा हलकासा पफ फिरवल्यासारखा थर, कुणालाही भूक नसते पण दुपारीच जेवण झाल्यावर परतलेली, कमी दमलेली एखादी अनुभवी वयस्कं आत्या,काकी मुगाच्या डाळीची खिचडी ग्यासवर चढवते, ‘पोह्याचे पापड कुठेत गं? सांग फक्तं, मी काढते ‘ विचारत तिच्या दृष्टीने नुसत्याच मिरवणा-या पाहुण्या मुलीला/सुनेला ‘ताक घुसळतेस पटकन?’ अशी आदेशवजा विनवणी करते. सुनेला त्रास न देता सापडल्याच तर दहाबारा सांडगी मिरच्या तळून ठेवते.…. !

उद्या सकाळी जाणारे पाहुणे आपापलं सामान गोळा करतात, सकाळी घालायचे कपडे, रिझर्वेशंस वरती काढून ठेवून टूथब्रश सकाळी सापडेल अशा नेमक्या जागी ठेवतात. आजीच्या चेह-यावर लग्नाकरता एवढ्या लांबून मुद्दाम आलेल्या माणसाबद्दलचं कौतुक ओसंडून वहात असतं. परत भेट होतीये न होतीये म्हणून ती मायेने चिवडा लाडूच्या दोन पुड्या त्यांच्या हातात कोंबते. गाड्यांचे, कुणीकुणी गेल्या दोन दिवसात खर्च केलेले पैसे आठवणीने दिले जातात. सुतकात असल्यासारखे सगळेजण ऊनऊन खिचडीचे दोन घास पोटात घालतात, लग्नं कसं झालं, फोटो, दागिने यावर हलक्या आवाजात निरुत्साही चर्चा होते. अशावेळी सगळं पटापट आवरलं जातं. बापाचा हात न वाजलेल्या फोनकडे सारखा जातो. एकदाचा उत्साहानी फसफसलेला, आनंदी फोन येतो, सगळा ताण रिलीज झाल्यासारखा बाप ‘मिरची फारच तिखट आहे’ म्हणत तांब्यानी वरून पाणी पित डोळ्यातलं मागे सारतो.…. !

नमस्कार होतात, ओट्या भरल्या जातात, दिलं घेतलं जातं. आठवणी निघतात. डोळे ओले होतात, पुसले जातात, तोंडभरून आशिर्वाद मिळतात, दिले जातात, कानशिलावर बोटं मोडली जातात, परत लवकरच भेटण्याचे वायदे होतात, नातवंडांचे, माहेरवाशीणीचे गाल आजीच्या पाप्यांनी ओलसर होतात. दोनतीन दिवसात सुगी संपल्यावर पाखरं नाहीशी होतात तसा एकेक पाहुणा परततो. मग उरतो तो फक्तं नि:शब्द एकांत. मग आजी शहाण्यासारखी कोचावर सुखानी लवंडते.…. !

शेवटच्या पाहुण्याला स्टेशनवर सोडून आलेला बाप ‘मला भूक नाहीये गं, पडतो जरा’ म्हणत बेडरूममधे जातो. मुलीचं कपाट उघडतो, घरी आल्यावर लागतील म्हणून तिनी ठेवलेल्या कपड्यांवरून थरथरता हात फिरवतो. लागूनच असलेल्या बेडवर बसतो आणि ओंजळीत तोंड धरून आवाज न करता धबधब्यासारखा फुटतो.……… !

मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको आई होते आणि त्या फक्तं वय वाढलेल्या सशाला छातीशी घट्ट धरते.…. !

लक्षात ठेवा –

बाप हा सावली देणाऱ्या वृक्षा सारखा असतो आणि कोणताही वृक्ष आपल्या फळा कडून कसलीही अपेक्षा कधीच ठेवत नाही. तो फक्त त्या फळाला वाढवून सर्वाधिक गोड कसे बनवता येईल या साठीच जगात असतो

तात्पर्य –

बायांनो हा लेख वाचून नुसते डोळे पुसू नका तर ! तर आपल्या संसारिक व्यापातून वेळ काढून दिवसातून एकदा तरी आपल्या म्हातार्या बापाची चौकशी करण्या साठी एक तरी फोन करत जा ! कारण ३६५ दिसव रोज तो आपल्या मुलीची मनातल्या मनात आठवण काढत असतो हे विसरू नका. कारण एकदा तो बाप या जगातून गेला कि या संपूर्ण पृथ्वी वर तुमची मायेने आठवण काढणारा असा कोणी उरणार नाही. जीवन खूप छोटे आहे.

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, Google Group)

One thought on “मुलीने आपल्या लाडक्या बापासाठी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: