तो बाप असतो…!!

5000234821458828864_Org

 

 

 

 

 

 

 

 

“ती दोघेही‘ आपल्या आयुष्यात बरोबर चालत असतात; पण भावनांच्या पायवाटेवर चालताना “तो‘ मात्र कुठेतरी थोडासा मागे राहतो… प्रत्येक जण “तिच्या‘वर वारेमाप लिहितो, तोंडभरून बोलतो… पण “तो‘ मात्र असाच कुठेतरी अबोलपणे पडद्याआड लपून राहतो. प्रसंगानुरूप “तिच्या‘ डोळ्यांतले अश्रू पाहून आपल्याला वाईट वाटतं; पण त्याच अश्रूंना तळहातावर झेलून, मनातून ओघळणारा “तो‘ मात्र उपेक्षितच राहतो… लहानपणी पाठीवर बसवून खेळताना “तो‘ आपला घोडा असतो, गर्दीतली एखादी गोष्ट पाहण्यासाठी, गर्दीतून फिरण्यासाठी “त्याचा‘ आपल्याला खांदा असतो… आपल्याला हवं-नको पाहण्यासाठी, आपले बालहट्ट पुरवण्यासाठी, आपल्याभोवती नाचण्यासाठी “तोच‘ तर असतो… “तो‘ असतो म्हणून आपण असतो, “तो‘ राबतो म्हणून आपण खातो… “तो‘ जागतो म्हणून आपण जगतो… “तिच्या‘मुळे गजबजलेलं घर “त्याच्या‘मुळे सजलं जातं… “तिच्या‘ आपल्यावरच्या मायेने, तर “त्याच्या‘ असलेल्या धाकाने आपलं घर साधलं जातं…

…”तो‘ तसाच असतो, बदामासारखा.. वरून कठीण कवच असणारा; पण आपली शक्ती वाढवणारा, बोट धरून चालायला शिकवणारा, पडलो-धडपडलो तर पुन्हा उठायला लावणारा… हाक मारली की एका हाकेला धावणारा; पण नेहमी नजरेच्या धाकात ठेवणारा, “तो‘!!!… “तो‘… कुणी त्याला “तात‘ म्हणतं, कुणी त्याला “बाप‘ म्हणतं, कुणी “पप्पा‘ म्हणतं, तर कुणी त्याला ‘वूरवर‘ म्हणतं… कोणत्याही नावाने आपण त्याला बोलावलं, तरी ते आपल्या आधारासाठीचं पहिलं हक्काचं शस्त्र असतं!

…चालताना ठेच लागली, की नकळत “आई गं!‘ येईल आपल्या तोंडून; पण समोर एखादं मोठं संकट आलं, की “बाप रे‘च येईल पुढून… जेवणात काय पाहिजे ते आपण हक्काने आईला सांगू; पण सहलीला जायची परवानगी मात्र आपण नक्‍कीच बाबांची मागू… “यायला वेळ होईल गं..‘ असं आपण आईला नक्कीच दादागिरीत सांगू; पण झालाच उशीर प्रत्यक्षात, की मात्र बाबांच्या नुसत्या घरी असण्यालासुद्धा आपण घाबरू… कसं आहे ना हे नातं?

त्याच्या आपल्यावरच्या मायेला
साय म्हणता येत नाही
पण तसं तर दूध उकळल्याशिवाय
सायसुद्धा येत नाही…

खरं आहे ना? कृष्णासारखा कृष्ण… देव! कारागृहात असताना देवकीने जन्म तर दिला त्याला; पण वसुदेव नसता तर? यमुनेचा पूर पार करून त्याचा जीव कुणी वाचवला असता? त्याला सांभाळणारा, त्याचे पालनपोषण करणारा नंदराजा नसता तर?… तो नंदलाल नसता ना झाला? भले ईश्‍वरी संकेत काहीही असोत, कृष्ण वाचणारच होता.. पण तरीही अवघड घाट चढण्यासाठी हातात बाबांचा हात तर हवाच ना?

सुटीचे दिवस होते. गल्लीत आजूबाजूच्या छोट्या मुलांचा दंगा चालू होता. मलाही सुटीच होती. जेवणानंतर दुपारची झोप घेण्याच्याच तयारीत होते. तेवढ्यात बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये लक्ष गेलं. भातुकलीचा खेळ रंगलेला होता. चिमुकल्यांची चिवचिव चालू होती. कुणाचा स्वयंपाक चालू होता, कोण बाजारात जात होतं, कुणाचं बाळ रडत होतं, कुणाची शाळा चालू होती… कुणी भांडत होतं… कुणी रडत होतं… आपल्यासाठी सगळं खोटं खोटंच; पण त्यांच्या भातुकलीत मात्र अगदी खरंखुरं…

त्या भातुकलीतसुद्धा त्यांची दोन घरं होती… दोन्ही घरांत बाळ होतं. एकीकडे मुलगा होता, त्याचं नाव “राया‘… दुसरीकडे मुलगी होती, तिचं नाव “अबोली‘… टीव्हीवरच्या सीरियलमधली नावे बरोबर आठवणीने ठेवली होती. त्यांच्या बाहुल्यांना खेळवायचं, दूध घालायचं, जेवायचं चालू होतं. ऊन फार होतं, म्हटलं आपणही सरबत घ्यावा करून. म्हणून आत जाऊन सरबताचा ग्लास घेऊन बाहेर आले, तोवर कानावर आलं, “अगं अबोली, आता तुझं लग्न करायचं ना? आता तरी शहाण्यासारखी वाग. थोडी कामात मदत कर.‘

घरी ऐकलेली वाक्‍ये बरोब्बर वापरात आणली होती; पण मला आश्‍चर्य वाटलं ते हे, की यांची अबोली इतक्‍यात लग्नाला पण आली? उत्सुकतेपोटी मी तिथेच उभी राहिले खेळ पाहत. बऱ्याच दिवसांनी माझंच बालपण समोर खेळत होतं. अक्षतांची वेळ झाली होती. छोटा भटजी आंतरपाट घेऊन उभा होता. मघाचचे बाहुला-बाहुली मोठी झाल्याने त्यांच्या जागी आता खरोखरचे मुलगा-मुलगी आलेले होते. आईची ओढणी नवरीने नेसली होती. सगळं कसं गोड चाललं होतं. अक्षता पडल्या. वाजंत्री झाली… नवरीच्या पाठवणीची वेळ झाली… आणि काय झालं कुणास ठाऊक… अचानक नवरी मुलगी खरंच मोठ्याने रडायला लागली. मग त्यांच्यातल्या एकीने तिला विचारलं,
“अगं, काय झालं इतक्‍या मोठ्याने रडायला? आपण खेळतोय ना?‘
ती नवरी हुंदके देत देत म्हणते, “”टीव्हीमध्ये कसं, नवरी जाताना “बाबा‘ म्हणत मागे पळत येऊन रडत बाबांच्या कुशीत शिरून रडते. मला बाबा नाहीत. मग मी कुणाकडे पळत जाऊ?‘‘
.

..किती बाळबोध प्रश्‍न होता! डोळ्यांत टचकन पाणी आलं… मी खाली गेले. काय झालं विचारलं. तेव्हा मुलांकडून कळलं, की तिचे बाबा गेल्याच वर्षी देवाघरी गेले होते… कशीबशी तिची समजूत काढली आणि दुसऱ्या खेळात त्यांना गुंतवून दिलं…
पण विषय डोक्‍यातून जात नव्हता. जिथे तिथे “तो‘ असतो… त्याचं मुकं अस्तित्व असतं… तो आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात तर असतोच; पण आपला कोणता खेळही “बाबा‘शिवाय पूर्ण होत नाही.

बाबा कधी आपला अभ्यास घेत नसेल; पण अभ्यासासाठी लागणारं सारं साहित्य तो देतो… झोपताना आपण कधी त्याच्या कुशीत झोपत नसू; पण शेजारी “बाबा‘ आहे म्हणून, त्या कुशीत निर्धास्त नक्कीच आपण झोपू… “बाबा‘ आपल्याला कधी जेवायला घशात नक्कीच घास उतरवत नसेल… संध्याकाळी उशीर झाला म्हणून आई वाट बघत बसेल; पण अजून कुठे थांबलोय, हे पाहायला बाबा अपरात्रीही घराबाहेर पडेल… जन्म देतानाच्या आईपणाच्या वेदना तो साहत नसेल; पण आपण आपल्या बाळाला जन्म देऊन आई-बाप होऊपर्यंतच्या सर्व झळा तो आपल्या नकळत झेलत असेल…
आणि एखाद्या मुलीसाठी तर तिचा बाबा म्हणजे तिचा खट्याळ मित्र असतो, गडगडणारा ढग असतो, बरसणारा पाऊस असतो… आणि कधी तर दरडावणारा बाप असतो…

बाबाचं बोट म्हणजे मुलासाठी लहानपणीची काठी असते… कधी उगारणारी पट्टी असते… मनात काळजीची विटी असते आणि ती कोलण्यासाठीच नजरेत रागाची मिठी असते… कधी उगारणारा, कधी थरथरणारा हा हातच आपला गरम तूप-भात असतो… कधी पोळतो; पण त्याची नेमकी चव नाही सांगता येत… कारण बापच तो… तो असाच असतो…!!

(दै. सकाळ – शुक्रवार, 13 जून 2014)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: