मी नेहमी एकाच मुलीच्या प्रेमात पडतो…
देवाशप्पथ खरं सांगतोय, खोटं सांगणार नाही. आयुष्यात मी आजपर्यंत 23 पोरींवर मनापासून प्रेम केलयं. अगदी आठवीत असल्यापासून मी प्रेम करायला सुरवात केली. तेव्हापासून आजपर्यंत (म्हणजे आता मी एका मुलाचा बाप झालोय) प्रत्येकवेळी मी एकाच पोरीवर प्रेम करत आलोय. आता मी फक्त बायकोवर प्रेम करतोय आणि तेही फक्त माझ्याच.
“शाळा“ पिक्चर पाहिला आणि मला माझ्या शाळेची आठवण झाली, तेव्हा माझीसुद्धा अशीच एक लाइन होती. तिला कधीच कळले नाही, की मी तिच्यावर किती प्रेम करतोय ते. अगदी “फूल और कांटे’मधल्या अजय देवगणसारखा मी तिच्यावर प्रेम करत होतो. एकदा इंप्रेशन मारण्यासाठी मी सेंट लावून वर्गात गेलो. सेंट लावले म्हणून गुरुजींचा मारसुद्धा खाल्ला; पण तिला माझं मन आणि गुरुजींनी मला का मारलं, हे कधीच कळलं नाही. खरं तर माझ्या प्रेमाचा सुंगधही सेंटसारखाच फिका पडला होता. सेंटचा वास सगळ्यांना आला; पण तिच्यापर्यंत पोचलाच नव्हता. अभ्यासात सत्तर टक्के पाडणारा मी अठ्ठावन्न टक्क्यावर आलो फक्त तिच्यामुळेच. असो, दहावी संपली आणि माझी लव्हस्टोरी पण.
पुढे कॉलेज सुरू झालं आणि खाकी पॅंट घालून वर्गात बसणारा मी जिन्सवर वर्गात बसू लागलो. पहिल्याच दिवशी एका मुलीच्या प्रेमात पडलो. जीन्स आणि टी शर्ट घालणारी मुलगी फक्त टीव्हीत पाहिली होती. डिट्टो तशीच पोरगी वर्गात आली होती. मग मी कसला मागं हटतोय, कुणाच्याही बापाला न घाबरता बिनधास्त तिच्या प्रेमात पडलो. दुसऱ्या दिवशी तिचा बाप आला तिला कॉलेजमध्ये सोडायला. खाकी कपडे, साखरेच्या पोत्यासारखं भलेमोठे पोट आणि म्हशीच्या शेपटारखी त्याची मिशी. पोलिस होता. तरीही मी काही घाबरलो नाही त्याला. सरळ चालत गेलो आणि दुसऱ्या वर्गातल्या सुंदर मुली शोधू लागलो. कुणाच्याही बापाला न घाबरता मी त्या पोलिसाच्या पोरीचा चॅप्टर क्लोज केला होता. चोवीस तास मी निखळ प्रेम केलं होतं; पण बापाच्या तब्येतीचा आणि त्याच्या खात्याचा आदर करत मनावर दगड ठेवून तिच्यावर करत असलेल्या प्रेमाला बाजूला सारलं होतं.
प्रत्येकवेळी असंच होत गेलं. एकदा एका पोरीच्या प्रेमात पडलो, तर तिच्या भावानं भर वर्गात एका पोराला बदड बदड बदडलं. आणि तेही माझ्यासमोर. मी अहिंसेचा पुजारी. का करू अशा मुलाच्या बहिणीवर मी प्रेम. सोडून दिला विचार. हो, पण मी काय तिच्या भावाला घाबरलो नव्हतो बरं का. सांगितलेलं बरं…
एकदा काय झालं. मी एका मुलीकडं पाहिले. तिनंही पाहिलं. वाटलं पटली रे पटली. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर तिच्यासोबत तिच्या आजूबाजूच्या सर्व पोरी पाहत होत्या. छे… छे… एकावेळी एवढ्या मुलींना लाइन देणं मला जमणारच नव्हतं. कारण मी माझ्या तत्त्वांना बांधील होतो. मी नेहमी एकाच मुलीच्या प्रेमात पडतो. (कार्टीनं सगळ्या पोरींना सांगितलं होतं.)
कुणाचा भाऊ जिममध्ये जायचा, तर कुणाची आई आमच्याच वर्गाला शिकवायला असायची. प्रत्येक वेळी माझ्या निखळ प्रेमाला या लोकांचा अडथळा यायचा. का? माझ्यासोबतच असं का होत होतं? एकदा एका मुलीच्या प्रेमात पडलो, तर तिच्याकडे साधी स्कुटीपण नव्हती. एका मुलीवर मनापासून प्रेम केलं, तर तिच्या मोबाईलमध्ये प्रीपेड कार्ड होते. तिनं मिस्ड कॉल द्यावा म्हणून मलाच तिचं कार्ड रीचार्ज करून द्यावं लागायचं. एका मुलीसोबत लग्न करण्याचं ठरविलं. तिच्यासोबत जेवणसुद्धा करायला गेलो. तिला महागाचं खायचं होतं तर स्वत: पैसे आणायला पाहिजे ना. पण मीपण मुरलेला होतो. अनुभवी प्रेमवीर होतो. बिल येताना दिसताच मोबाईल ऑफलाइन करून कानाला लावला आणि बसलो बोलत विनाकारण. वेटर दोनवेळा येऊन गेला. तिसऱ्यांदा आला तेव्हा तिनंच गुपचूप पर्स काढून पैसे दिले. वेटर शिल्लक पैसे घेऊन आला तेव्हा मी फोन ठेवला आणि हे काय योग्य नाही, असं म्हणत रुसून बसलो. तो रुसवा प्रेमभंगात कधी परावर्तित झाला, हे कळलंसुद्धा नाही. केवळ महागाईमुळे माझं प्रेम मला मिळालं नव्हतं.
एक पोरगी भलतीच रोमॅंटिक. सलमान खानसारखं भर कॉलेजमध्ये गुडघे टेकवून तिला प्रपोज करावं, तिच्याकडे पाहणाऱ्या पोरांना साऊथस्टाईल फायटिंग करून मारावं, अशी तिची अपेक्षा. आपली तब्येत अशी किडमिडी. पोरगी पटवायच्या नादात यायचा हात गळ्यात. दिला सोडून विषय. पुढे शाळा, कॉलेज, कॅम्प, प्रवास, लग्नसोहळा, जॉब, गाव प्रत्येक ठिकाणी एखाद्या मुलीवर प्रेम करायचोच. “माणसावर प्रेम करावे’ या मोठमोठ्या संतांच्या वचनाचा मी मनापासून आदर केला. श्रीमंत-गरीब, गोरी काळी, उंच-बुटकी असा कधीही भेदभाव केला नाही. त्यांच्या पैशाच्या तिकिटानं कधी पिक्चरला जायला नाही म्हटलं नाही, की त्यांच्या घरी कुणी नसताना केवळ सोबत म्हणून घरी जायचं टाळलं नाही. त्यांच्या घरच्यांचा इतका आदर केला, की कधी चुकूनसुद्धा त्यांच्यासमोर गेलो नाही. या मुलींना वाईट वाटायला नको म्हणून माझ्या बर्थडेला हक्कानं त्यांच्याकडून हक्कानं काही ना काही गिफ्ट मागवून घ्यायचो.
असो, आता त्या 23 पोरीपण आठवत नाहीत. कुणावर एक तास प्रेम केले तर कुणावर एक महिना. एक वर्षापासून प्रेम करतोय अशी एकमेव मुलगी म्हणजे माझी बायको. आता तर मी एका मुलाचा बापसुद्धा झालोय. आयुष्यभर हिच्यावर प्रेम करण्याचं ठरवण्यामागचं कारण म्हणजे त्या 23 पोरींपैकी कुणालाही मी कुणाविषयी काही सांगितलं नव्हतं; पण बायकोला सर्व मुलींविषयी सांगितलं. सर्व ऐकूनही तिनं लग्नाला होकार दिला. आता व्हॅलेंटाईनला मला अजूनही एकच मुलगी आठवते, ती म्हणजे बायको आणि तीसुद्धा फक्त माझीच…
~ नितीन थोरात
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)