वेडात मराठे वीर दौडले सात
लता मंगेशकरांच्या आवाजातील कुसुमाग्रजांच्या या अप्रतिम पंक्तींनी मराठी मानसात आणि मराठी साहित्यात सेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा साथीदारांचे महत्वपूर्ण योगदान अधोरेखित केले आहे.
कुसुमाग्रजांच्या या गीतात नेमके वर्णन कशाचे आहे, याविषयी सर्वश्रुत असणारी कहाणी पुढीलप्रमाणे –
सन १६७३ साली राज्याभिषेकापूर्वी शिवाजी महाराज पन्हाळगडावर स्थित होते. याच काळात अदिलशाही सरदार बहलोल खान मराठी मुलुखावर आक्रमण करण्याकरिता ३० हजारांची फौज घेऊन तो निघाला.
“खान वलवल भारी करतो, त्यास मारोन फते करणे.” असा आदेश महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांना दिले.
खानाचा मुक्काम मिरजेच्या बाजूला कर्नाटक प्रांतातील उमराणी गावात होता, सरसेनापतींनी गनिमी काव्याचा वापर करत भल्या पहाटे खानाची नाकेबंदी केली. कुठलाही प्रतिकार न करता बहलोलखान प्रतापरावाला शरण आला. आपण पुन्हा स्वराज्याच्या वाट्याला येणार नाही असे म्हणून अभयदान मागितले.
युद्धात शरण आलेल्यांना मारु नये, या लढाई धर्माला जागत प्रतापरावांनी मोठ्या मनाने बहलोल खानाला माफ करत सोडून दिले.
महाराज राज्याभिषेकाच्या तयारीत असताना शत्रूपासून सावधगिरी बाळगून होते. राज्याभिषेकात अडथळा येऊ नये म्हणून मोगलांचा सुभेदार बहादुर खानाला गोडी गुलाबीची पत्रे पाठकून झुलवत ठेवले होते. अशावेळी हातात आलेल्या शत्रूला परस्पर सोडून दिल्याने महाराज प्रतापरावांवर नाराज झाले. खरमरीत पत्र लिहून महाराजांनी सेनापतींना जाब विचारला आणि नाराजी व्यक्त केली.
महाराजांच्या अंदाजाप्रमाणे बहलोल खानाने पुन्हा उपद्रव सुरु केला. सर्जाखानासह तो पुन्हा स्वराज्याच्या दिशेने चाल करून आला. शिवराज्याभिषेकाची तयारी रायगडावर सुरू झाली होती. यात होणारे बहलोल खानाचे हल्ले महाराजांना पचण्यासारखे नव्हते. बहलोलखान स्वराज्यावर पुन्हा चालून येत असल्याचे पाहून त्यांना राग येणे स्वाभाविक होते.
त्यांनी संतापाने प्रतापरावांना दुसरे पत्र लिहिले, “हा बहलोल वरचेवरी येतो. यांसी गर्दीस मेळवून फत्ते करणे. अन्यथा आम्हांस तोंड न दाखवणे.” महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या जिव्हारी लागले.
बहलोल कोल्हापूरच्या बाजूने पन्हाळ्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत होता, प्रतापराव या सुमारास गडहिंग्लज परिसरात होते. खानाचे सैन्य नेसरीच्या दिशेने चाल करून येत आहे ही बातमी त्यांना समजली.
महाराजांची नाराजी दूर करायची असेल तर खानाचा वध करण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता. प्रतापरावांनी तलवार घेतली आणि घोड्यावर मांड मारून कूच केली. आपल्या सेनापतींचा अवतार पाहून विसाजी बल्लाळ, विठोजी शिंदे, दीपाजी राऊतराव, विठ्ठल पिळदेव, सिद्दी हिलाल, कृष्णाजी भास्कर हे सहा शिलेदार प्राण हातावर घेऊन बहलोल खानाच्या प्रचंड अशा मोठ्या फौजेचा मुकाबला करण्यासाठी प्रतापरावांसोबत निघाले.
संख्याबळाचा विचार करता लढाई कुठेच बरोबरीची नव्हती. मात्र या सात वीरांचा आवेश उत्स्फूर्त होता. स्वामीनिष्ठेच्या वेडापायी प्राणत्यागाची त्यांची तयारी होती.
नेसरीच्या खिंडीत मराठ्यांचे सात वीर शत्रूवर तुटून पडले. त्या सात वीरांनी बेभान होऊन खानाचे बरेच सैनिक कापून काढले. खानाच्या हजारोंच्या संख्येत असलेल्या सैन्यासमोर या सात वीरांचा निभाव लागणे केवळ अशक्य होते. परिणामी धाडस आणि शौर्याची परिसीमा गाठणारे हे सात मराठे २४ फेब्रुवारी १६७४ रोजी धारातीर्थी पडले.
सात वीरांच्या बलिदानापुढे खानही नमला. त्याने आपला मार्ग बदलला. तो परत फिरल्याने जवळ येऊन ठेपलेला राज्याभिषेक पुढे निर्विघ्नपणे पार पडला. ६ जून १६७४ रोजी शिवाजीराजे छत्रपती झाले.
ही घटना ऐकल्यावर महाराजांना अतीव दु:ख झाले. या सात वीरांचे स्मारक महाराजांनी नेसरीजवळ उभारले. तसेच राजाराम महाराजांचा विवाह प्रतापरावांची कन्या जानकीबाईंशी लावला.
धन्यवाद..!!
संदर्भ :
डॉ. सतीश कदम (दैनिक सामना)
जयवंत पाटील बोरसे (महाराष्ट्र टाइम्स)
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, Google Group)