कहाँ गये ओ लोग ?
अमित शहांच्या योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांनी योगाच्या मॅट्स पळवून नेल्या.
महागड तिकीट असलेल्या तेजस एक्सप्रेस मधून प्रवाशांनी इअरफोन चोरून नेले.
अमेरिकेच्या विमान प्रवासात दिलेलं ब्लॅंकेट आपल्या बॅगेत भरून घेवून जाणाऱ्या एका इंजिनीरिंग कॉलेजच्या सन्माननीय प्रिन्सिपल बाईनां मी पाहिलेलं आहे.
इचलकरंजीमध्ये आर्य चाणक्य सामाजिक मंडळाने अंत्यसंस्कारासाठी मोफत ठेवलेल्या अल्युमिनिअम तिरडीच्या चोरीची तक्रार तेथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी मला दाखविली होती.
औरंगाबादमधील एका नामांकित कंपनीतील चीफ अकाउंट्स ऑफिसर कंपनीच्या कामानिमित्त मुंबईला कंपनीतून जाणाऱ्या ट्रकमधून प्रवास करायचा पण बिल मात्र विमानाचं लावायचा.
एका सरकारी प्राथमिक शाळेत सर्व शिक्षकांनी मिळून मुलांसाठी लावलेलले झोपाळे, घसरगुंड्याची थोड्याच दिवसात चोरी झाली. चौकशीअंती समजल की शाळेच्या मुख्याध्यापकांनीच गावातील ग्रामपंचायत सदस्याच्या मदतीने चोरी करवली होती.
विजेची चोरी केल्याशिवाय आमचा धंदा चालूच शकत नाही असं जालन्यातील एका मोठ्या स्टील मिलच्या मालकानी मला खासगीत अत्यंत प्रामाणिकपणे सांगितल होतं.
परवा लंडनमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅच बघायला आलेल्या विजय मल्ल्याला चोर-चोर म्हणून आपलीच जनता चिडवत होती. तर हसतमुख चेहऱ्याने (आपली मुलगी आणि आई बरोबर असतांनासुद्धा) मल्ल्या महोदय थँक यू म्हणत सहजतेने निघून जाताना पहिलं.
आम्ही उसाला उच्चांकी दर दिला असं एका साखर कारखान्याच्या चेअरमननी मोठ्या अभिमानाने सांगितलं तर कारखान्याला उसाच्या वजनात बनवेगिरी करायला आम्ही काय व्यवस्था करून देतो हे तिथे संगणकीकृत वजनकाट्याची सिस्टीम पुरवणाऱ्या कंपनीचा तांत्रिक अधिकारी सांगत होता.
हे आणि असेच अजून कित्तेक नमुने सर्वांनाच, सदैव, सर्वत्र पाहायला मिळतात. प्रश्न असा पडतो की मग प्रामाणिक लोक शिल्लक आहेत का सगळेच संपलेत ? सगळेच संपले असतील तर मग हा गाडा चाललाय तरी कसा ? आणि शिल्लक असतील तर नेमके आहेत तरी कुठे ?
फार कमी शिल्लक आहेत. पण ते अंधारात आहेत. कधीतरीच क्वचित दिसतात.
एकदा संध्याकाळी हिंजवडीहून घरी येत होतो. बाणेर गावात आल्यावर फोन आला म्हणून गाडी बाजूला थांबविली. गाडीतून बाहेर येवून बोलत राहिलो. फोन बराच वेळ चालू राहिला तसं नकळत चालत बराच पुढे गेलो.
फोन कॉल संपल्यावर बाजूच्या एका बांधकामच्यासाईटवर वाळूने भरलेल्या ट्रकला खेटून एका वृद्ध जोडपं बसलेलं दिसलं. तसं थोडं चिंताक्रांत दिसत होतं. म्हातारा ७५ चा तर म्हातारी ७० ची असावी. कर्नाटकातून बांधकाम मजुरीसाठी इथे आलेले. मला कन्नड बोलायला येत असल्यानं त्यांना सहज बोलतं करता आलं. वाळूचा ट्रक रिकामा करायचा सौदा त्यांच्या मुलानं ४५० रुपयात ठरवला होता पण त्याला अचानक गावाकडे जायला लागलं, कंत्राटदाराकडून २५० रुपये ऍडव्हान्स घेवून. आता ट्रक रिकामा करायची जबाबदारी या दोघांच्यावर आलेली. त्यात म्हातारीच्या अंगात ताप आणि कणकण होती. म्हाताऱ्याला एकट्याला ट्रक रिकामा करायचं धाडस होतं नव्हतं. त्यात कंत्राटदाराने अडीच ब्रास सांगून हौद्याची उंची वाढवून साडेतीन ब्रास वाळू भरली होती. ती ही ओली वाळू.
मी म्हाताऱ्याला म्हटलं मी येतो तुमच्या मदतीला. आपण दोघे मिळून ट्रक रिकामा करू या. म्हातारा संकोचला. लई अवघड हाय हे काम, तुमानी जमणार नाही. वाळू वडून आतड्या लांब होत्यात असं म्हाणाला.
मी असली कामं करत असतो. मला हे काम जमतंय म्हणत त्याला तयार केलो. थोडं जबरदस्तीनचं. खरं तर मला माझ्या शारीरिक कष्टाची क्षमता पहायची संधी म्हणून मी या कामाकडे पहात होतो तर त्यांना त्यात दोनशे रुपयाची मजुरी दिसत होती.
म्हातारा कसाबसा तयार झाला. मी टी-शर्ट काढून ठेवलो आणि पँट गुढघ्यापर्यंत दुमडलो तर म्हाताऱ्याने बंडी काढून ठेवून धोतर खोचला. ट्रकवर चढून दोघांनी खोरं हातात घेतलं आणि कामाला लागलो.
थोड्या-थोड्या वेळाने म्हातारी येऊन पाणी द्यायची. थोडं विश्रांती घ्या म्हणायची.
तंबाखू पायजे काय हे सुद्धा एकदा विचारून गेली.
दीड तासाच्या मरणाच्या मेहनतीनंतर ट्रक रिकामा झाला.
खाली येवून मी बनियन काढून पिळलं तसा पेलाभर घाम निघाला. आतडी लांब होणे म्हणजे काय ते प्रत्यक्ष अनुभवत होतो. म्हतारा तर पूर्ण गळून गेला होता. धोतार्याच्या सोग्याने घाम पुसत बसला होता.
मी ही दमून बाजूच्या बाकड्यावर बसलो तशी म्हातारी माझी ओली पाठ तिच्या नऊवारी साडीने पुसू लागली. लई दमलास की रे लेकरा म्हणत वारा घालू लागली. मला फार बोलायची अंगात शक्तीच न्हवती.
थोड्या वेळाने एका पेपरात बांधून आणलेला पुडा आमच्या समोर सोडला. त्यात ४ वडापाव होते. बरोबरीने एक जर्मन चहाची किटली आणि पारलेजीचा बिस्कुट पुडा ठेवला.
एका मजुराची भूक म्हणजे काय असते याचा खरा साक्षात्कार होणारा तो प्रसंग.
म्हातारीला आमच्या बरोबरीने खायला आग्रह केला पण तिनं काहीच खाल्लं नाही.
थोड्या वेळाने कंत्राटदार आला. म्हाताऱ्याच्या हातात शंभर रुपयाच्या दोन नोटा ठेवल्या.
म्हातारा त्यातील एक नोट मला द्यायला हात पुढे केला. मी नको म्हणालो. तसा तो उठून माझ्या समोर उभा राहिला आणि हात पकडून कोंबायला लागला. माझा त्याला नकारच.
अरे पोरा, तू माझ्यापेक्षा ज्यास्त राबलायस. ते बी गुरावानी. तुजी बी बायकु-पोरं तुज्या रोजंदारीची वाट बघत असतील की. घे हे पैशे.
माझा पुन्हा नकारच.
हा खेळ थोडा वेळ पाहून म्हातारी पुढं आली. म्हाताऱ्याच्या हातातून शंभराची नोट न बोलता काढून घेवून सरळ माझ्या पँटच्या किशात कोंबत म्हणाली – पोरा, आम्ही रातच्याला हितचं झोपतो. ह्या जमिनीवर तुझं लई घाम सांडलय. जमीन आमची आई हाय. तुझं पैशे आम्ही घेटलो तर आमाला ही जमीन कशी झोपू देईल ते तूच सांग ?
यावर मात्र मी निरुत्तर !
जगातलं सर्वात प्रामाणिक तत्वज्ञान मी वास्तवात अनुभवल होतं !!
मी थोडं आग्रह करून म्हातारीला डॉक्टरकडे घेवून जातो म्हणालो तर तयार होईना. मी आयुष्यात कवाच डॉक्टरच तोंड बघिटलं नाही आणि बघणार बी नाही म्हणाली. रात्रीला काडा करून पितो, सकाळपर्यंत पुना कामाला लागायचं हाय. आजार-बीजार काय आमाला होत न्हाई.
तिथून दोघांचा निरोप घेवून निघताना एक प्रश्न घेवून निघालो ज्याचं आजवर मला उत्तर मिळालेलं नाही.
क्यूँ ओ लोग अंधेरेमे गुमनाम रहते है जिनपर हिंद को नाझ है ?
हिंद को शर्मसार कारणेवाले लोग क्यूँ सितारों जैसे चमकते रहते है ??
कुलभूषण बिरनाळे
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)
भाई आंखो मे आसू आ गए