ऐतिहासिक: १६७२ चा साल्हेर रणसंग्राम
तेव्हाच ‘बागलाण प्रांत’ म्हणजे आजचा उत्तर महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील काही भाग होय. इ.स १६७१ मध्ये शिवरायांनी बागलाण प्रांतात मोहीम उघडली आणि साल्हेर किल्ला जिंकला. हे ऐकून बादशाह खूप कष्टी झाला. त्याने इखलासखान आणि बहलोलखानास २०हजाराची फौज देऊन बागलाण मोहिमेस पाठविले. त्या दोघांनी किल्ल्याला वेढा घातला. बादशाहने पाठीमागून बहादूर कोकलताशला देखील पाठविले. “तुम्ही दिल्लीची पातशाही खुशाल करणे आपण शिवाजीवर जातो त्यास हालखुद ठेवितो, त्याचे लष्कर पातशाही मुलखात न येईल ऐसें करितो. पातशाहांनी फ़िकीर न करावी.” अशा आशयाचे उदगार काढले अशी नोंद सभासदांनी आपल्या बखरीत केलेली आहे.
(किल्ले साल्हेर, जि. नाशिक)
हे वर्तमान जेव्हा महाराजांना कळाले तेव्हा त्यांनी मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना कळविले, “तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बेलोलखनास धरून चालविणे आण् कोकणातून मोरोपंत पेशव्यांस हशमनिशी रवाना केले. हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे असे दुतर्फा चालून येऊन गनिमास गर्दीस मिळविणे.” अशी पत्रे पाठविली.
शिवाजी महाराजांच्या योजनेप्रमाणे सरसेनापती प्रतापराव गुजर वरघाटाकडून आणि पेशवे मोरोपंत पिंगळे कोकणातून साल्हेरकडे आलेले होते. त्यामूळे मोगलांच्या दोन्हीं बाजूच्या फ़ळीवर मराठ्यांना अचानकपणे हल्ला करणे शक्य झाले.साल्हेरला झालेली लढाई घनघोर स्वरूपाची होती. मराठ्यांनी नेहमीच्या गनिमीकाव्या ऎवजी उघडउघड “सुलतान ढवा” करून मोगलांना घेरले होते. या लढाईचे वर्णन करताना सभासद लिहतात, “चार प्रहर दिवस युद्ध जाहले. मोगल, पठाण, रजपूत रोहीले, तोफ़ाची, हत्ती, उंटे, आरावा घालून युद्ध जहाले. युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की, तीन कोस औरस चौरस आपले व परके माणूस दिसत नव्हते. हत्ती रणास आले दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले. पूर वाहिले रक्ताचे. चिखल जाहले. त्यामध्ये रुतो लाबले, असा कर्दम जाहला.”
या युद्धात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. पेशवे मोरोपंत आणि सरसेनापती प्रतापरावांनी आणीबाणी निर्माण केली. सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवतांना आपला देह ठेवावा लागला. शिवाजी महाराजांना हे आनंदाचे वृत्त समजल्यावर खबर आणणार्या जासूदाना त्यांनी सोन्याची कडी घातली. जे मर्द मराठे जिवाची बाजी लावून लढले त्यांना महाराजांनी अपार द्रव्य दिले आणि त्यांची संभावना केली.
हा पराभव दिल्लीच्या बादशहाच्या फार जिव्हारी लागला की सभासद म्हणतात, ” पातशहा असे कष्टी जालें, ‘खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवजीसच दिधली असे वाटते. आता शिवाजी अगोदर आपणासच मृत्यू येईल तर बरे. आता शिवाजीची चिंता जीवी सोसवत नाही.’ असे बोलिले.”
या युद्धात महाराजांच्या लोकांनी दाखवलेल्या युद्ध कौशल्याची कीर्ती चहू दिशांना पसरली व त्यांचा दरारा अधिकच वाढला. साल्हेर जिंकल्यावर त्यासमोरील मुल्हेर किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि संपूर्ण बागलाण प्रांत स्वतःच्या ताब्यात घेतला. त्यामुळे सुरत शहरास कायमची दहशत बसली.
इतर कोणत्याही लढाईपेक्षा साल्हेरच्या लढाईचा तपशील सभासदाने बऱ्याच बारकाव्याने दिला आहे. साल्हेरची लढाई मराठ्यांना अभिमानाची आणि प्रतिष्ठेची वाटली असावी कारण मैदानावर समोरासमोर लढाई करून मोगलांचा पराभव करण्यात मराठे या लढाईत यशस्वी झाले. गनिमी कावा हा तर मराठ्यांच्या युद्धशैलीचा खास प्रकार होता. परंतू समोरासोमरील लढाई देऊन आपण त्यातही मोगलांपेक्षा कमी नाही, असे साल्हेरला मराठ्यांनी सिद्ध केले. म्हणून “साल्हेरची लढाई” मराठ्यांच्या इतिहात महत्वपूर्ण मानणे आवश्यक आहे.
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)