पानिपत – मराठ्यांचा अद्वितीय पराक्रम

‘लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले , २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेल्या याची गणना नाही..…’

विश्वासराव आणि सदाशिवराव या दोन मोत्यांसह २७ सरदार आणि सैन्यासह काफिला मारला गेल्याचं हे वर्णन आहे.

मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम’, असं पानिपतच्या युद्धाचं वर्णन केलं जातं.

पानिपतची तिसरी लढाई जानेवारी १४, १७६१ रोजी अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांत झाली. या युद्धात मराठा सैन्य शौर्यानं लढलं, पण अखेर त्यांची पीछेहाट झाली, त्यांच्या घोडदौडीला खीळ बसली. पण यातही मराठ्यांचा विजय होता. अब्दालीचं कंबरडं मोडायचं काम या मराठ्यांनी या युद्धात केलं होतं.

युद्धाची पार्श्वभूमी :

मुघलांच्या उतरत्या काळात मराठे अगदी जोशाने नवीन महासत्ता म्हणून उदयास आले होते. १७१२-१७५७ या काळात मराठ्यांनी भारतातील एक महत्त्वपूर्ण भाग नियंत्रित केला होता. १७५८ मध्ये त्यांनी दिल्लीच्या आसपासचा काही भाग काबीज केला होता, पेशावरच्या अटकपर्यंत झेंडा रोवला, लाहोरवर हल्ला करून शहर ताब्यात घेतले आणि शहराचा कारभार पाहणाऱ्या तैमूर शाह दुर्रानी याला हाकलून लावले. तैमूर शाह दुर्रानी अफगान शासक अहमद शाह अब्दालीचा मुलगा होता.

मुस्लिम धर्मगुरूंनी मराठ्यांना इस्लामवरील संकट मानले व मराठ्यांना प्रत्युतर देण्यासाठी आघाडी उघडण्याचे आव्हान केले. सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारता बाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. अब्दालीने याचा विडा उचलला, त्याने १७५९ मध्ये बलुच, नजीब खानच्या नेतृत्वातील पश्तुन रोहिल्ले व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील छोट्या छोट्या चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले.

अब्दालीने दिल्लीवर स्वारी करण्याची योजना आखली, छोट्या मोठ्या हल्ल्यांच्या माध्यमातून अब्दालीने उत्तरेतील मराठयांचे वर्चस्व मोडकळीस आणले होते, यातीलच एका लढाईत मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे यांची हत्या करण्यात आली.

मृत्यूच्या दाढेत असताना "बचेंगे.....तो और भी लडेंगे" असे म्हणून नजीब खानाला डिवचणाऱ्या दत्ताजी शिंदेंची क्रूर हत्या एक महत्वाची घटना ठरली

मराठ्यांना याचे उत्तर देणे गरजेचे होते तसेच अब्दालीला हुसकावणेही गरजेचे होते. अन्यथा उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती. म्हणून मराठ्यांनी पण ५०-६० हजारांची मोठी फौज उभारली व १७६० च्या जानेवारी- फेब्रुवारी मध्ये पानिपतकडे रवाना झाले. फौजेसोबत अनेक बाजारबुणगे देखील गेले होते. सगळ्यांचा मिळून आकडा लाख सव्वा लाखाच्या आसपास होता.

सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची मोहिम चालू झाली. भरतपुरचे जाट, होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येउन मिळाल्या. या सैन्याने दिल्ली काबीज केली.

यादरम्यान अब्दाली व मराठे यांच्यात नियमितपणे चकमकी चालू झाल्या. भले मोठे सैन्य आणि त्यांच्या सोबतच्या बुणग्यांमुळे रसद संपत आली होती. सदाशिवरावांनी दिल्ली लुटायचा आदेश दिला. रसदेसाठी दिल्ली लुटायच्या बहाण्याने सदाशिवराव विश्वासरावांना दिल्लीच्या तख्तावर बसवणार अशी भनक जाट महाराजा सुरजमलला लागली म्हणून त्याने सदाशिवरावांना विरोध केला व तो युतीच्या बाहेर पडला. ही घटना युद्धात निर्णायक ठरली असे बर्‍याच इतिहासकारांचे मत आहे.

छायाचित्र : Pinterest – India

कुंजपुराच्या चकमकीत मराठ्यांनी अब्दालीची संपूर्ण तुकडी संपवली व कित्येकांना बंदी बनवले. नजीब खानाचा गुरु कुतुबशहा, सरहिंदचा सुभेदार अबुस समदखान, मोमीनखान आणि नजीबचा भाऊ नाजाबतखान ह्यांना मराठ्यांनी कापून काढले.

कुंजपुऱ्यात लक्ष लावून बसलेल्या मराठ्यांना गाफील ठेऊन अब्दाली बाघपत मधून निसटला आणि यमुना ओलांडून दक्षिणेकडे वळला. अब्दालीने यमुना ओलांडल्याचे मराठ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पानिपत जवळ तळ टाकला व बचाव भक्कम करण्यावर जोर दिला. २६ ऑक्टोबर १७६० रोजी अब्दाली पानिपत व सोनपत मधील संबलका येथे पोहोचला. पुढे चालणार्‍या अब्दालीच्या आघाडीच्या सेनेची मराठ्याशी येथे जोरदार चकमक झाली व मराठे पूर्ण चाल करणार इतक्यात अब्दालीची कुमक पोहोचली व मराठ्यांचे जोरदार आक्रमणाचे मनसुबे थंडावले. दोन्ही बाजुनी मोठ्या प्रमाणावर सैन्य मारले गेले.

एका चकमकीमध्ये बुंदेलेंच्या तुकडीवर अब्दालीच्या सेनेने हल्ला चढवला. ही तुकडी मुख्य सेनेसाठी रसद व घोडदळीची कुमक आणत होते. मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले पण त्याही पेक्षा मोठे नुकसान म्हणजे, रसदेचा पुरवठा अब्दालीने पूर्णपणे तोडून टाकला.

पुढील दोन महिने दोन्ही सेनांमध्ये सातत्याने चकमकी होत राहिल्या व एकमेकांवर कुरघोडी करणे चालू राहिले. अब्दालीला मराठ्याच्या सामर्थ्याचा अंदाज आलेलाच होता व युद्ध फायद्यात नाही हे लक्षात आले होते. मराठ्यांच्या गोटातही उपासमार व बुणग्यांच्या ताणामुळे सदाशिवराव भाऊ तहाचा विचार करत होते. अब्दाली देखील तहाच्या बाजूने होता परंतु नजीबने तो होऊ दिला नाही, नजीबने इस्लामच्या नावावर युद्धाची शक्यता तेवत ठेवली. यामुळे मराठे अजून गोंधळात पडले. आज ना उद्या तह होईल या आशेवर थांबले. दरम्यान धान्यसाठा संपत आलेला होता, मराठ्यांची उपासमार सुरु झाली. यामुळे मराठे आजूबाजूच्या गावांमधून अन्न धान्य उचलून आणत होते. यामुळे मराठ्यांना आजूबाजूच्या गावांमधून अन्न धान्य उचलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांचा मराठ्यांवरील रोष वाढला. याउलट अब्दालीला दक्षिणेकडील मित्र पक्षांकडून रसद पुरवठा होत राहिला.

मराठा सैन्य पानिपतच्या उत्तरेकडे होते, त्यांचे मित्र पक्ष, त्यांचे रसद पुरवठादार, सैन्य कुमक हे सर्व दिल्लीच्या दक्षिणेकडे होते. तर अब्दाली पानिपतच्या दक्षिणेकडे होता. परिस्थिती लक्षात घेता युद्ध किंवा संधी असे दोनच विकल्प होते.

भाऊंनी सरतेशेवटी कोंडी मोडून काढण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रथम तोफांनी अफगाण्यांना भाजून काढायचे व नंतर घोडदळाने आक्रमण करायचे व कोंडी मोडून जिथे रसद पुरवठा निश्चित होता त्या दिल्लीला पोहोचायचे, असे ठरले.

अंतिम लढाई

१४ जानेवारी १७६१ रोजी मराठे युद्धासाठी तयार झाले, लढाईची सुरुवात मराठ्यांकडून लढणाऱ्या इब्राहिम खान गारदीने गाजवली. रणांगणाच्या उजवीकडून इब्राहिम खानने आपल्या कमानी रोहिल्यांवर भिडवल्या. मराठे गारदी, तिरंदाज व भालदार यांनी अफगाण व नजीबच्या रोहिला पठाणांना मोठ्या प्रमाणावर कापून काढले. अब्दालीचे सैन्य मागे हटले, समोर फक्त मराठेच होते. उत्स्फूर्तपणे मराठे अब्दालीकडे मजल करत होते.

अब्दालीच्या तोफा छोट्या अंतरावरच्या असल्याने युद्धाच्या सुरुवातीला काहीच फरक पाडू शकल्या नाहीत. पण त्वेषाने लढणारे मराठी सैन्य दुपारी आपसूक त्या तोफांच्या पल्ल्यात पोहोचले. तरीसुद्धा अब्दाली तोफा वापरू शकत नव्हता कारण तोफांच्या हल्ल्यात त्याचे सैनिक देखील मारले गेले असते. हीच स्थिती इब्राहिम खानाची झाली, त्याच्या लांब पल्ल्याच्या तोफा सहज अब्दालीच्या सैन्याला हरवू शकत होत्या, पण त्यांच्या पल्ल्यात मराठे सुद्धा येत होते.

सदाशिव भाऊंनी रणांगणाच्या मध्यातून अब्दालीच्या अफगाण सैन्यावर हल्ला चढवला, अफगाण मागे हटायला लागले. अफगाणी पळ काढण्याच्या बेतात आहे हे पाहून मराठ्यांच्या घोडदळाला संयम आवरला नाही व आक्रमण केले परंतु उपाशी जनावरांनी ऐन वेळी हाय खाल्ली, कित्येक घोडे रस्त्यातच कोसळले व घोडदळाच्या घावाचा दणका अफगाण सेनेला देता आला नाही.

दोन तृतीयांश मैदान मराठ्यांनी मारले होते पण डाव्या बाजूला नजीब जोरदार प्रतिकार करत होता. सगळे मराठा सैनिक मैदानात होते. नाम मात्र राखीव कुमक शिल्लक होती, अनेक बुणगे देखील प्रत्यक्ष युद्धात लढत होते. संध्याकाळ होईपर्यंत मराठे थकलेले होते.

शेवटची चाल म्हणून अब्दालीने आपली राखीव सेने पुढे केली. त्याने १५,००० कसलेले योद्धे त्यांच्या मागे बंदूकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा बाहेर काढले व चाल केली. या उंटावर लादलेल्या छोट्या तोफा पानिपतच्या युद्धात निर्णायक ठरल्या, या तोफा घोडदळाविरुद्ध अतिशय परिणामकारक ठरल्या तसेच मराठ्यांचे घोडदळ अफगाणी बंदुकधार्‍यांपुढे टिकाव धरू शकले नाहीत. राखीव फौज परिणामकारक होत आहे हे पाहून त्याने उरली सुरली १०,००० ची राखीव फौजही नजीबच्या मदतीस पाठवली. याच वेळेस दमलेल्या मराठी सैनिकांना ताज्या दमाच्या अफगाणी सैनिकांचा सामना करायला लागला. याच वेळेस मागून पण तोफांना आपल्या फौजांना संरक्षण देता आले नाही. समोरुन येणार्‍या उंटांवरील तोफांसारखा मराठी तोफखाना लवचीक नव्हता व युद्धाचे पारडे फिरले.

ताज्या दमाचे राखीव सैनिक पुढे न आणण्यात भाऊंची चूक झाली. दरम्यान विश्वासराव गोळी लागून ठार झाले होते व सर्वत्र गोंधळाचे वातावरण झाले. हत्तीवर बसलेले सदाशिवराव भाऊ अब्दालीच्या बंदूकधाऱ्यांचे सहज लक्ष होऊ शकत होते हे ध्यानात घेऊन ते हत्तीवरून उतरले आणि घोड्यावर बसून नेतृत्व करणार होते. परंतु मराठ्यांना भाऊ आपल्या हत्तीवर दिसले नाहीत व भाऊ पडले असे मराठ्यांना वाटले व संपूर्ण मराठे सैनिकांनी एकच हाय खाल्ली. आपला पराभव झाला असे समजून मराठे मागे सरकले. या टप्प्यावर होळकरांना पराभवाची जाणीव झाली आणि ते सैन्यातून बाहेर पडत मागे फिरले. भाऊ शेवट पर्यंत लढत होते पण ते सुद्धा धारातीर्थी पडले आणि अब्दालीने रणभूमीवर ताबा मिळवला.

मराठ्यांच्या पीछेहाटीस कारणीभूत काही मुख्य कारणे थोडक्यात बघूया :

१. बाजारबुणगे आणि यात्रेकरूंचा भरणा :

पुण्यातील राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून यात्रेकरूंना फौजेबरोबर मोहिमेत सामील करण्यात आले. यात्रेच्या निमित्ताने हजारो यात्रेकरू, व्यापारी आणि कुटुंबकबिला असे एकास एक सुमारे लाखभर बिनलढाऊ लोक फौजेबरोबर होते. सैन्याच्या मोहिमेच्या संरक्षणात आपल्याला उत्तर भारतातील तीर्थस्थाने पहायला मिळतील या भाबड्या कल्पनेमुळे सर्वजण आले होते. रसदेमधील मोठा हिस्सा या बुणग्यांना जात होता, त्याचा अतिप्रचंड ताण सेनेवर पडला.

युद्धाअगोदर काही आठवडे नोंदीनुसार माणसांना खायला नाही म्हणून घोडे हत्ती यांचा चारा बंद करण्यात आला त्याचा परिणाम प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेस दिसला. दुसरी गोष्ट म्हणजे बुणग्यांच्या मोठ्या संख्येमुळे संरक्षणासाठी कित्येक सैनिकांच्या तुकड्या खर्ची पडल्या ज्यांचा प्रत्यक्ष लढाईत फायदा झाला असता. आपल्या तुफानी वेगासाठी प्रसिद्ध मराठ्यांची सेना या अतिरिक्त लोकांच्या भारामुळे मंदावली होती.

२. हवामान :

मराठे महाराष्ट्रातून निघाले (जानेवारी १७६०) तेव्हा त्यांनी थंडी पासून बचाव करणारे साहित्य सोबत घेतले नव्हते. त्यामुळे मराठे उत्तरेच्या थंडीत गारठून गेले होते. उत्तरेतल्या कडाक्याच्या थंडीत लढाई करणे मराठ्यांसाठी सोपे नव्हते, उलटपक्षी अब्दालीच्या सैन्याला थंड वातावरण त्यांच्या घरच्या हवामानासारखेच होते आणि ते अंगावर चामड्यापासून बनलेला पोशाख घालायचे. युद्धात थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांना हे पुरेसे होते. अब्दालीच्या सैनिकांसाठी ही जमेची बाजू ठरली.

सकाळी नऊपासून सुरू झालेल्या या युद्धात दुपारनंतर सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला आणि मराठा सैन्याच्या डोळ्यांवर, डोक्यावर सूर्याची किरणे येऊ लागली. अनेकांच्या डोळ्यासमोर अंधारी आली त्यामुळे मराठे अडचणीत आले. अंतिमतः सूर्याची दिशा निर्णायक ठरली.

३. कूटनीतीचा अभाव :

मराठ्यांना राजपूत राजे, सुरजमल जाट, अवधचा नवाब शुजा उद्दौला यांची साथ लाभली नाही. शुजा उद्दौलाने दिल्ली दरबारचे प्रधानपद मागितले होते, सुरजमल जाटला आग्रा हवे होते तर दिल्लीतील मराठ्यांच्या वर्चस्वामुळे राजपूत नाराज होते.

फर्रुखबादच्या लढाईत रोहिल्यां विरुद्ध मराठे आणि अवधचा नवाब सफदरजंग उद्दौला एकत्र लढले होते, मात्र पानिपतच्या युद्धात सफदरजंगचा मुलगा शुजा उद्दौला अब्दालीच्या बाजूने लढला. सुरजमल जाट मोहीम चालू असताना मधेच साथ सोडून गेला, तर राजपूत राजे तटस्थच राहिले.

स्थानिक सरदारांना सोबत घेऊन चालणे मराठ्यांना जमले नाही.

४. अन्नधान्याचा तुटवडा :

अब्दालीने यमुनेच्या किनारी मराठ्यांची कोंडी केली होती आणि रसद पुरवठ्यात खोडा घातला होता. जेव्हा अन्नधान्य संपुष्टात आले तेव्हा मराठ्यांनी विचार केला की उपासमारीने मारण्यापेक्षा युद्धात मरणे चांगले आहे. प्रत्यक्ष कृतीदिनी अनेक मराठे उपाशीपोटीच लढले.

५. युद्धनीतीतील दुमत :

होळकर आणि शिंदे गनिमी काव्याने युद्ध करण्याच्या बाजूने होते, पण आसपासचा मैदानी, सपाट मुलूख लक्षात घेता इथे मराठ्यांचा गनिमी कावा चालणार नाही, हे ओळखून इब्राहिम खान आणि सदाभाऊ यांनी तोफखाना पुढे ठेवून त्याच्या मागे घोडदळ आणि पायदळ यांचा गोल करून पुढे सरकत शत्रूवर हल्ला करायचा अशी योजना आखली. पण अशा प्रकारच्या लढाईची सवय मराठा फौजेला नव्हती. प्रत्यक्ष मैदानात मराठ्यांच्या काही तुकड्या गोल मोडून रोहिल्यांच्या दिशेने धावल्या. तोफखान्यासमोर आपलंच सैन्य आलेलं बघून इब्राहिमखानाला तोफखान्याचा मारा बंद करावा लागला. याचा फायदा अब्दालीने घेतला आणि उंटांवरच्या आपल्या हलक्या तोफा पुढे करत मराठ्यांना भाजून काढलं.

६. प्रत्यक्ष युद्धभूमीतील चुका :

हत्तीवर बसलेल्या विश्वासरावांना गोळी लागली आणि ते धारातीर्थी पडले, हे पाहून सदाशिवराव भाऊ अंबारीतून उतरले आणि त्यांनी घोड्यावर मांड ठोकली. अंबारी रिकामी दिसल्याने भाऊही पडल्याची बातमी मराठा सैन्यात पसरली आणि सैन्याने कच खाल्ली.

युद्ध चालू असताना होळकरांनी काढता पाय घेतला, तसेच राखीव दलाचे नियोजन करणे सेनापतींना जमले नाही. अब्दालीने मात्र दहा हजारांचं राखीव दल ठेवलं होतं. मराठ्यांचं पारडं जड झाल्यावर त्याने अचानक हे दहा हजार सैनिक रणात उतरवले. दमलेल्या मराठ्यांना या ताज्या दमाच्या सैनिकांचा मुकाबला करणं कठीण गेलं.

पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांचा उत्तरेकडचा दबदबा अचानक नाहीसा झाला. पण एखाद्या विजयालाही लाजवेल असं तुफान शौर्य यौवनातल्या रणबहाद्दर मराठ्यांनी दाखवलं. त्या वीरांच्या स्मृती निमित्त १४ जानेवारी हा शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो.

छायाचित्र : Pinterest – India

रणांगणावर देह वाहिला भारत भू तुजसाठी ! रक्षावया तुज कधी न हटलो, ही मराठ्यांची ख्याती !!

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

संदर्भ:
पानिपत – विश्वास पाटील
Invasions Of Ahmad Shah Abdali
250 years on, Battle of Panipat revisited
Peshwa
पानिपतच्या युद्धात कसे लढले होते मराठे?

One thought on “पानिपत – मराठ्यांचा अद्वितीय पराक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: