काश्मीरचे राजे: महाराज हरी सिंग
महाराज हरी सिंग हे जम्मू आणि काश्मीर संस्थानाचे शेवटचे राजा होते. त्यांच्या आधी ह्या संस्थानाचे राजेपद प्रताप सिंग नावाच्या त्यांच्या काकांकडे होते. पण त्यांना वारस नसल्यामुळे हरी सिंग हे जम्मू आणि काश्मीर संस्थानाचे १९२५ मध्ये राजे बनले.
हरी सिंग ह्यांचे शिक्षण
वयाच्या १३ व्या वर्षी त्यांना ‘मेयो कॉलेज ऑफ प्रिन्सेस’ मध्ये शिकण्यासाठी दाखल करण्यात आले. अवघ्या काही दिवसांत त्यांचे वडील अमर सिंग ह्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूपश्चात ब्रिटिश सरकारने त्यांचे शिक्षण आणि संगोपन ह्यामध्ये विशेष लक्ष घातले. हरी सिंग एक चांगले राजा म्हणून उदयास यावेत, तसेच त्यांना योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी सरकारने एका ब्रिटिश अधिकाऱ्याची त्यांचा सहाय्य्क म्हणून तेव्हा नेमणूक केली. मेयो कॉलेजमधील त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सैनिकी कला आणि युद्धकौशल्य ह्यामध्ये पारंगत होण्यासाठी डेहराडून येथील ‘इम्पीरियल कॅडेट कोर्प्स’ मध्ये भरती करण्यात आले.
हरी सिंग ह्यांनी जम्मू आणि काश्मीर संस्थानात काय बदल घडवून आणले?
- इ.स. १९१५ मध्ये हरी सिंग २० वर्षांचे असताना त्यांना जम्मू आणि काश्मीर संस्थानाचे सरसेनापती बनविण्यात आले. सैन्याची कमान स्वीकारल्यानंतर त्यांनी सैनिकी प्रशिक्षण आणि सैनिकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा ह्यामध्ये चांगले बदल घडवून आणले. आधी सैनिकांना स्वतःचे अन्न स्वतः शिजवून खावे लागत असे हे बघून त्यांनी सैनिकांसाठी खाणावळींची सोय केली.
- हरी सिंग ह्यांच्या आधीच्या काळामध्ये जम्मू आणि काश्मीर संस्थानामध्ये ब्रिटिशांचा झेंडा सगळीकडे फडकविला जायचा. त्यांनी ह्या झेंड्यावर बंदी आणली. ब्रिटिशव्हॉइसरॉयच्या विनंतीवरून त्यांनी काही मोजक्या इमारतींवर ब्रिटिश झेंडा लावायची परवानगी दिली.
- अनेक ब्रिटिश इतिहासकारांनी राजा हरी सिंग ह्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये प्रशासन आणि न्यायव्यवस्था ह्या क्षेत्रांमध्ये घडवून आणलेल्या अनेक सुधारणांसाठी प्रशंसा केली आहे. त्यांनी नागरिकांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी तसेच राहणीमान सुधारण्यासाठी काही महत्वाची पाऊले उचलली.
- संस्थानामध्ये त्यांनी प्रत्येक नागरिकासाठी (स्त्री आणि पुरुष दोघांसाठी) मूलभूत शिक्षण सक्तीचे केले.
- बालविवाहांवर बंदी आणली.
- धार्मिक स्थळे समाजातील सर्व घटकांसाठी खुली करण्यात आली.
- शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अनेक शाळा आणि महाविद्यालये ह्यांची स्थापना करण्यात आली.
- त्यांनी संस्थांनातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी, तसेच भ्रष्टाचाऱ्याना पकडून त्यांना शासन करण्यासाठी अनेक पद्धती राबविल्या. असे बोलले जाते कि त्यांच्या काळामध्ये कोणीच लाच घ्यायचा किंवा द्यायचा प्रयत्न करत नसे.
- त्यांनी भीक मागण्यांवर बंदी आणली.
हरी सिंग ह्यांची राजकीय कारकीर्द
- त्यांच्या काळामध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये राजकीय उलथापालथी खूपदा घडल्याचे दिसून येते. हरी सिंग ह्यांच्या शासनाविरुद्ध शेख अब्दुल्ला ह्यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये बंडखोरी करण्याचे खूपदा प्रयत्न झाले.
- राजा हरी सिंग हे मुस्लिम लीग आणि मोहम्मद जिन्नाह ह्यांच्या धर्मानुसार देशाचे विभाजन करण्याच्या प्रस्तावाच्या कायम विरोधात असल्याचे दिसून येते.
- पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला ह्यांचे घनिष्ट संबंध असल्यामुळे त्यांना राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या रोषाला कायम सामोरे जावे लागले.
- भारत स्वतंत्र झाल्यानंतर आणि पाकिस्तान देशाच्या निर्मितीनंतर थोड्याच दिवसांत त्यांच्या संस्थानामध्ये भीषण जातीय दंगली वाढायला लागल्या.
- थोड्याच दिवसांत पाकिस्तानी फौजांनी जम्मू आणि काश्मीर संस्थानामध्ये घुसखोरी केली. तेव्हा राजा हरी सिंग ह्यांनी भारताबरोबर करार करून त्यांचे संस्थान भारतामध्ये विलीन केले.
- महाराज हरी सिंग हे दूरदृष्टी असलेले तसेच पुढारलेल्या विचारांचे होते. त्यामुळे भविष्यात समोर काय वाढून ठेवले आहे ह्याचा त्यांना आधीच अंदाज आला होता. भारत स्वतंत्र होण्याआधी लंडन मध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांनी आधीच स्पष्ट केले होते कि त्यांना भारताबरोबर राहणे जास्त पसंद आहे. ह्यामुळे त्यांना ब्रिटिशांच्या रोषाला पण सामोरे जावे लागले आणि तद्नंतर ब्रिटिश त्यांच्याकडे कायम संशयाने बघू लागले.
- त्यांना आधीच समजून चुकले होते कि संस्थानाचे आणि संस्थानिकांचे दिवस भरलेत आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला भविष्यात लोकशाही विचारांशी जुळवून घेण्याचे शिक्षण दिले.
- जुने १९४७ मध्ये लॉर्ड माउंटबॅटन ह्यांनी राजा हरी सिंग ह्यांची भेट घेतली आणि त्यांचे संस्थान पाकिस्तानला देण्याचा सल्ला (हुकूम?) दिला. पण हरी सिंग ह्यांनी त्याच्याकडे कानाडोळा केला. कारण त्यांना माहिती होते कि पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला ह्यांना पण जम्मू आणि काश्मीर संस्थान भारतामध्येच हवे होते.
- भारत पाकिस्तान वेगळे झाल्यानंतर हरी सिंग ह्यांच्याकडे ३ पर्याय होते.
-
- जम्मू आणि काश्मीर वेगळे ठेवणे
- भारतात विलीन होणे
- पाकिस्तानबरोबर जाणे.
- राजा हरी सिंग ह्यांना तिन्ही पर्यायांचे फायदे आणि तोटे माहिती होते. म्हणून त्यांनी भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांना स्टँडस्टील अग्रीमेंट (स्थिरता करार) करण्याचा प्रस्ताव दिला. पंडित नेहरू ह्यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला आणि त्याचा परिणाम कुठे ना कुठे पुढच्या पूर्ण इतिहासावर झाला. जर भारतने तो प्रस्ताव स्वीकारला असता तर विचार करण्यासाठी २ महिन्यांचा कालावधी मिळालाअसता आणि ह्या कालावधीमध्ये भारताला योजना बनविता आली असती. कदाचित पुढे पाकिस्तानने जो जम्मू आणि काश्मीर संस्थानांवर हल्ला केला त्यासाठी आधीच तयार राहता आले असते.
- २६ ऑक्टोबर १९४७ ला राजा हरी सिंग ह्यांनी भारतबरोबर करार केला आणि काही अटी घालून जम्मू, काश्मीर, उत्तरी भाग, लडाख, ट्रान्स काराकोरम ट्रॅक्ट, सध्याचा पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आणि अक्साई चिन एवढे भाग भारताच्या स्वाधीन केले.
तळटीपा:
[1] Remembering Maharaja Hari Singh
[2] MAHARAJA HARI SINGH : THE LAST RULER OF JAMMU & KASHMIR By. Col. J.P. Singh (Retd).
[3] Hari Singh – Wikipedia
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)