उंबऱ्याच्या आतलं वातावरण बिघडू देऊ नका!

तीन-तीन वर्षं काहीही न करता, घरात बसून राहिलेली मुलं-मुली मी पाहतो, मला आश्चर्य वाटतं. चांगलं सुशिक्षित कुटुंब, बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता असं असूनही अनेक घरांमधून ही परिस्थिती आहे. दुपारी दोन-अडीच वाजेपर्यंत अंथरुणात लोळत पडणे, मग पुढे चार वाजता आंघोळ करणे, संध्याकाळी सहा वाजता जेवणे (या दरम्यान मोबाईल हाताशी असतोच), रात्री साडे आठ-नऊ च्या सुमारास घराबाहेर पडणे आणि साधारणपणे पहाटे तीन-चार च्या सुमारास घरी येणे अशा दिनक्रमात ही मुलं-मुली जगतात. दहावीपर्यंत बरं चाललं होतं पण काॅलेज सुरू झाल्यापासून सगळीच अवस्था बिकट झाली” असा सगळ्या पालकांचा सूर असतो.

ग्रॅज्युएशनच्या पहिल्याच सेमिस्टर परीक्षेत सगळ्या विषयांमध्ये नापास झालेल्या एका मुलाने मागच्या सहा महिन्यांमध्ये क्लासेसच्या नावाखाली दीड लाख रूपये पालकांकडून घेतले आणि क्लासेस न लावताच ते पैसे गर्लफ्रेंडवर खर्च केले. शिवाय पाॅकेटमनी च्या नावाखाली जवळपास ७५ हजार रूपये घेतले. पालकांनी एवढा खर्च केलाच, शिवाय काॅलेजची फी भरली, ती वेगळीच. एका मध्यमवर्गीय कुटुंबात हे घडतं, यावर आता विश्वास ठेवण्याची वेळ आली आहे.

डोक्यावर रंगवलेल्या केसांचं टोपलं, विराट कोहलीसारखी राखलेली दाढी, छप्पन्न सेंटीमीटर (इंच नव्हे) छाती, भडक कपडे, फाटक्या जीन्स, पायात मरतुकड्या स्लीपर्स, तोंडात मावा किंवा सिगारेट धरलेली अशी तीन-तीन पोरं एकाच स्कूटरवरून मोठ्यानं हाॅर्न वाजवत गावभर उंडारत फिरत असलेली आपल्यापैकी अनेकांना दिसत असतील. चार दिडक्यासुद्धा कमावण्याची अक्कल नाही पण तरीही गाड्या उडवत फिरणारी टाळकी सध्या उदंड झाली आहेत. अशाच एका मुलानं आज स्टंट करण्याच्या नादात एका गर्भवती महिलेला जोरात धडक दिली. त्या मुलाच्या मागे एक तंग कपड्यांतली मुलगी नको तितकी चिकटून बसलेली होती, आणि बहुतेक दोघेही भर दिवसा झिंगलेले होते. आजूबाजूची माणसं धावत येईपर्यंत दोघेही पसार झाले.

पोकर खेळणे, अनिर्बंध नाईट लाईफ जगणे, बेटींग करणे यात गुंतून पडलेली अनेक मुलं-मुली पाहण्यात येतात. एखादी वीस-बावीस वर्षांची मुलगी दिवसाकाठी पंधरा-वीस सिगारेटी व्यवस्थित ओढते, हे आता कॅज्युअल झालं आहे. हुक्का पार्लर्समध्ये १७-१८ वर्षांची मुलं-मुली दिवस घालवताना दिसत आहेत. दिवसभरात खाण्यापिण्यावर, पेट्रोलवर, व्यसनांवर दोन-तीनशे रूपये तर सहजच उडवणाऱ्या मुलां-मुलींची संख्या समाजात वेगाने वाढते आहे, यावर पालकांनी सीरियसली विचार करण्याची गरज आहे.

खरं तर सांगू नये, पण सांगतो. पालक हाॅटेलमधली जेवणं, खरेदी, वाढदिवस, परदेशी सहली यात रस घेतात, पण मुलांच्या प्रश्नांकडे जितकं आणि जसं लक्ष द्यायला हवं, तसं देत नाहीत. माझ्या ओळखीतल्या एका कुटुंबाने दुबई ट्रीपसाठी साडेतीन लाख रूपये खर्च केले, पण मुलगी सलग दोन वर्षं बारावीत नापास झाली, काॅलेजमधल्या एका मित्राबरोबर लग्न करण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला, घरातून अनेकदा पैसे चोरले, घरचे दागिने गायब केले, पण तिच्या काॅलेजमधल्या शिक्षकांना भेटायला जाण्यासाठी पालकांकडे वेळ नाही आणि काऊन्सेलरची अपाॅईंटमेंट म्हणजे वायफळ खर्च असं त्यांना वाटतं.

एका मुलीकडे चांगला महागडा स्मार्टफोन आहे. महागडी काॅस्मेटिक्स आहेत. नुकताच एक महागडा गाॅगल तिच्याकडे आलाय. यातली कुठलीच गोष्ट तिच्या पालकांनी दिलेली नाहीय. या गोष्टी तिच्याकडे कुठून आल्या? त्या कुणी दिल्या? या विषयी पालकांना काहीही माहीत नाही. मुलगीही काही सांगत नाहीय. तिचं सतत बाहेर भटकणं, दर आठ-पंधरा दिवसांनी पार्लरमध्ये जाणं, सिनेमाला जाणं या गोष्टींकरिता घरातून पैसे मिळत नाहीत. मग ती या गोष्टी कशा करू शकते, असा प्रश्न पालकांना पडूनही त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाहीय.

काही वर्षांपूर्वी माझ्याकडे अत्यंत सज्जन साध्या कुटुंबातल्या मुलीची केस आली होती. तिचं एका मध्यमवर्गीय पण अत्यंत हुशार मुलावर प्रेम होतं. पण, तिच्या मित्र-मैत्रिणींपैकी कुणीतरी तिच्या डोक्यात श्रीमंतीचं पिल्लू सोडलं. तिचे विचारच बदलले. “मी साध्या घरात जन्मलेली असले तरी आता मला या साधेपणातच आयुष्य जगायचं नाहीय, मला पाॅश आयुष्य जगायचंय” असं ती म्हणायला लागली. काॅलेजातल्या श्रीमंत मुलांशी तिनं जवळीक वाढवली. वागणं-बोलणं पार बदलून गेलं. राहणीमान बदललं. एका श्रीमंत मुलासोबत ती वारंवार दिसू लागली. त्या मुलानं तिचा ‘व्यवस्थित’ फायदा घेऊन ब्रेकअप करून टाकलं. हे सगळं होईपर्यंत मुलीची आई काहीही बोलली नाही. कारण काय तर, “श्रीमंत जावई मिळेल..” पण, या प्रकरणाची भलतीच किंमत त्या मुलीला चुकती करावी लागली.

आपण आपल्या मुलांना गाडी, मोबाईल फोन, लॅपटाॅप, इंटरनेट, स्वतंत्र खोली, पाॅकेटमनी या गोष्टी का आणि किती प्रमाणात देतो, यावर पालक काही विचार करतात का? पुष्कळ पालकांकडे या प्रश्नांची उत्तरंच नसतात. आधुनिक आणि तथाकथित ‘सुजाण’ पालक होण्याच्या शर्यतीत भावना,संस्कार मागे पडतात आणि या वस्तूच पुढे जातात.
“इन्स्टंट” गोष्टींचा जमाना आला आहे. मुलं आणि पालक दोघांनाही सगळ्याच गोष्टी इन्स्टंट आणि रेडिमेड हव्या असतात. त्या तशा मिळत नाहीत, म्हणूनच मग शेवटी फरफट सुरू होते आणि सगळं कुटुंबच अस्वस्थ होतं. सगळ्या गोष्टींना पैशाची आणि श्रीमंतीची गणितं लागू करण्याचा प्रयत्न पालक जाणते-अजाणतेपणी करायला लागतात, तिथंच त्यांच्या मुलांमध्येही हीच वृत्ती रूजली तर, त्यात नवल वाटण्याचं कारणच नाही.

शेवटी काय, उंबऱ्याच्या आतलं जग बिघडलं की, सगळंच बिघडतं..! वेळीच शहाणपण आलेलं बरं !
या गोष्टीपेक्षा आपल्या आयुष्य बदलताना समाजमनही बदलण्यासाठी काही वर्षे स्पर्धा परीक्षा वा इतर गोष्टी करण्यात सुद्धा एक वर्ग व्यस्त आहे. तो यशस्वी होईल अथवा नाही, झाला तरी समाजाचा एक चांगला नागरिक वा जाण असलेला भारतीय नागरिक यातुनच घडतो. तोच पुढे देशाला सावरेल या प्रकारचा तरुणवर्ग कुठे दृष्टीस पडला तरी त्याला फक्त एकदा म्हणा तु जे करत आहेस ते खरच खुप चांगल आहे काही लागले तर कळव.

प्रसिद्ध व्हाव म्हणून नाही तर वेळीच सुधाराव म्हणून हा लेख मी लिहीला आहे त्यावर नक्की विचार करा. कारण असे दिवसभरात आपण भरपुर शेअर करतो हा एक शेअर करा समाजासाठी.
— डी. एस. जोटकर (कोल्हापूर)

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: