ब्लॉक

वयाच्या 44 व्या वर्षी सोशल मीडियामुळे तिची 38 वर्षाच्या त्याच्याशी घट्ट मैत्री झाली. जोडीदार, 2 मुले, सुखी संसार असे समान धागे दोघांत होते तरीदेखील एकमेकांबद्दल अशी ओढ का वाटत होती? काही वेळा काहीही कमी नसले तरी काहीतरी का हवं असतं? मैत्रीच्या पुढे जाऊन त्याने आता तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. तिला खरेतर ते नको वाटत होते. छान मैत्री असेपर्यंत ती बिनधास्त होती पण आता मात्र त्याच्या गोड बोलण्याने तिची द्विधा मनस्थिती होत होती. मनाच्या एका उत्कट क्षणी तिची पावले त्याच्याकडे वळालीच… भर दुपारी 3 वाजता ती त्याला एकांतात भेटायला निघाली… मनातल्या सगळ्या विचारांवर मात करत ती त्याच्याकडे गेलीच… त्याने तिला हळुवार स्पर्श करत हळूच बाहुपाशात ओढली.. आजपर्यंत तिला तिच्या नवऱ्याशिवाय असा स्पर्श कोणीच केला नव्हता… तिने करूनही घेतला नसता.. मग हे ती आज स्वीकारत होती का? आणि कशासाठी?..

तिला आठवला 7 वर्षांपूर्वीचा तो प्रसंग… तिच्या बाळाच्या देखभालीसाठी ठेवलेल्या 20 वर्ष वयाच्या मदतनीस मुलीला आणि आपल्या नवऱ्याला नको त्या अवस्थेत तिने पकडले होते.. खूप उध्वस्त झाली होती ती त्यामुळे.. आपल्यात काय कमी होते म्हणून नवऱ्याने असा अपमान करावा.. ध्यानी मनी नसताना आयुष्याने तिला लाथाडले होते.. नवऱ्याने माफी मागितली, माझा पाय घसरला, परत असे होणार नाही बोलला, त्या मुलीला कामावरून काढले.. परत ती किंवा तशी घटना तिच्या आयुष्यात घडली नाही.. नवरा खूप चांगले वागत होता.. पण तिच्या मनावरचा ओरखडा पुसला गेला नव्हता… काळानुसार थोडा पुसट झाला होता इतकेच… कदाचित यामुळेच कि काय तिची पावले आज या मित्राकडे वळली!.. त्याने तिला बेभान होऊन किस करायला सुरुवात केली.. तीही बेधुंद व्हायला लागली.. त्याच्या मिठीत विरघळून जाता जाता कसे कोण जाणे ती एकदम सावध झाली. तिला डोळ्यासमोर सगळे दिसू लागले…. तिचा नवरा, मुले, आई, सासूबाई, बहीण, भाऊ… सगळे काय कुजबुज करत आहेत? तिच्याकडे घृणास्पद नजरेने बघत आहेत… आज अण्णा असते तर त्यांनी इकडचा गाल तिकडे केला असता. आणि स्वामी… स्वामी समर्थांपुढे आपण उभे तरी राहू शकू का? त्यांच्या नजरेला नजर देऊ शकू का? खाडकन कानफटात मारल्यासारखी ती भानावर आली.. तिने एकदम त्याचा हात झिडकरला… त्याच्या मिठीतुन स्वतःला सोडवून घेत आपण इथेच थांबूयात म्हणून त्याला विनवूू लागली. तोही तसा धूर्त होता. पहिल्याच प्रत्यक्ष भेटीत थोडे आवरते घेऊ… सगळे एकदम नको म्हणून त्यानेही तिच्या कलाने घेतले. तिने सुटकेचा निश्वास टाकला आणि ती धावत पळत घरी आली. संध्याकाळ होत आली होती. आल्या आल्या ती अंगावरच्या कपड्यानिशी शॉवरच्या थंडगार पाण्याखाली उभी राहिली… कितीतरी वेळ… सगळ्या भावना, लोभ, मोह, इच्छा वाहून जाईपर्यंत… शॉवरच्या पाण्याबरोबर तिचे डोळेही पाझरत होते…. मन आणि शरीर थंडगार होईपर्यंत ती तशीच निथळत होती.

नंतर शांतपणे आवरून देवघरात आली तो सासूबाईंनी तिला उशीर झाल्यामुळे आधीच दिवा लावला होता आणि तिला तुळशीतला तेवढा लाव ग म्हणाल्या. दिवा घेऊन ती अंगणात तुळशीपाशी आली. पण आज दिवा ठेवताना तिचा हात थरथरत होता. दिवा ठेवताच क्षणी तुळस शहारून आली असे तिला जाणवले आणि ती सुद्धा शहारली. त्याच वेळी तिच्या मनात आले आपल्या नवऱ्याने ‘ती’चूक केली म्हणून आपण हि ‘ती’चूक करायला पात्र आहोत, तो आपला अधिकार आहे असे आपल्याला वाटलेच कसे? पण तिच्यावरच्या खोल संस्कारांमुळे तिने हे वाटणे धुडकावून लावले आणि त्याला कधीही न भेटण्याचा तिने निश्चय पक्का केला. घरात येऊन तिने मोबाईलचे नेट ऑन करून त्या मित्राला ब्लॉक करून टाकले… सोशल मीडिया वरून हि आणि मनातूनही…

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: