रांगोळ्या
रांगोळ्या म्हणजेच हिंदू मंत्रोच्चारांचे Print Outs!
( दुर्मीळ वेगळी माहिती जाणून घ्या )

रांगोळी आणि रांगोळ्या काढणे याबद्दल सर्व माहिती भारतीय हिंदूंना वेदकालापासूनच आहे. वेद, रामायण,महाभारत,अनेक काव्ये, साहित्य, धार्मिक ग्रंथ — पोथ्या अशा अनेक ठिकाणी रांगोळ्यांचे उल्लेख आढळतात. भारतातील ६४ आद्य कलांमध्ये रांगोळी या कलेचा उल्लेख आहे. वेदकालापासून भारतीयांना माहिती असलेली रांगोळी, तिकडे पारशी लोकांनाही माहिती होती, असे दिसते. भारतात रांगोळी, रंगावली, चित्रमाळी, रंगमाळी अशा जुन्या उल्लेखांबरोबरच भौगोलिक प्रदेशानुसार वेगवेगळी नावे आढळतात. कोलम, चौकपूरना, अल्पना, मुग्गूळु अशी विविध नावे आहेत. तर मांडणा ही राजस्थानी रांगोळी जमिनीसारखीच भिंतीवरही काढली जाते.
प्रत्येक सणाला, मंगल कार्यांना, शुभविधीच्या निमित्ताने रांगोळी घातली जाते ( प्रचलित शब्द – ‘ काढली जाते”).खेड्यापाड्यात तर अगदी रोजसुद्धा रांगोळी काढली जाते. घरापुढे, देवघरापुढे, उंबरठा, अंगण, तुळशीवृंदावन, मंदिरे, मंडप, रस्ते अशा विविध ठिकाणी विविध कार्यानुरूप रांगोळ्या काढल्या जातात. गावाकडे अजूनही जमीन किंवा चूल सारवल्यावर अगदी छोटीसी तरी रांगोळी त्यावर काढली जाते. तांदुळाच्या पिठाची रांगोळी घातली जाते ती छोटे कीटक खातात. पण जेवणाच्या ताटाभोवती घातलेल्या रांगोळीमुळे, पानातील पदार्थ खायला येणारे कीटक अडविले जातात. या कीटकांच्या ओलसर नाजूक त्वचेला, दगडाच्या बारीक पावडरची रांगोळी आणि त्यात भरली जाणारी हळद व कुंकू सहन होत नाही. त्यामुळे ते ही रांगोळी ओलांडून पानात येत नाहीत. चैत्र महिन्यातील चैत्रांगणमध्ये काही खास रांगोळ्या काढल्या जातात. कांही विशिष्ट विधी किंवा पूजेला खास रांगोळीच काढली जाते. उदा. कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये बोडण भरण्याची पद्धत आहे. फक्त त्याचवेळी काढायच्या २ / ३ प्रकारच्या रांगोळ्या आहेत. त्या अन्य कधीही काढल्या जात नाहीत. रांगोळीमध्ये किमान हळद आणि कुंकू हे दोन रंग तरी भरले जातातच. फक्त अशुभ प्रसंगी काढल्या जाणाऱ्या रांगोळीत मात्र रंग भरले जात नाहीत.
डोलामाईट किंवा संगमरवर या दगडांची बारीक पावडर करून रांगोळी बनविली जाते. बंगाल आणि दक्षिण भारतात तांदुळाचे पातळ ओले पीठच रांगोळी काढण्यासाठी वापरले जाते. ओणमसाठी फुलांची रांगोळी घातली जाते. शुभ चिन्हे ( गोपद्म, स्वस्तिक, कासव, चंद्र सूर्य, चांदण्या, सुदर्शन चक्र इ.), त्रिकोण – चौकोन – षट्कोन असे भौमितिक आकार, विशिष्ट ठिपके काढून त्यामध्ये परंपरागत रांगोळ्या काढल्या जातात. ही परंपरा हजारो वर्षांची असावी. पण आता त्यात काही बदल झालेले आहेत. या कलेचे अनेक उत्तमोत्तम प्रकार रूढ होत आहेत. धान्य वापरून, फुले – पाने- भाज्या यांचा वापर करून, विविध रंगी मीठ वापरून रांगोळ्या काढल्या जातात. तर रांगोळीने एखाद्या फोटोसारखे हुबेहूब चित्र काढणे म्हणजे कलेची सर्वोच्च पातळी आहे. पाण्यावर तरंगणारी, पाण्याच्या खाली, त्रिमिती रांगोळी असे अनेक सुंदर प्रकार आता पाहायला मिळतात. रांगोळ्यांचे साचे आले आहेत. रांगोळीचे स्टीकर्स म्हणजे रांगोळीची केवळ चित्रे. त्याला रांगोळीची सर नाही. संस्कारभारतीने तर अत्यंत आकर्षक आणि कुठेही काढायला सोयीस्कर अशा रांगोळ्यांची एक सुंदर परंपराच निर्माण केली आहे. अलीकडे मात्र भर रस्त्यावर रांगोळ्या काढल्या जातात. त्यावरून पालख्या, गणपती विसर्जन मिरवणूक, रथ नेले जातात. हे चुकीचे आहे. रांगोळ्यांना पाय लागू नये, त्या विस्कटू नयेत. ( याचे सविस्तर कारण खाली देत आहे ). रांगोळ्या रस्त्याच्या दोन्ही कडांना, पाय लागणार नाहीत अशा तऱ्हेने काढाव्यात. आपल्याकडे रांगोळी उचलण्यासाठी किंवा पुसण्यासाठी केरसुणी वापरत नाहीत.
पृथ्वी, पाणी, तेज, वायू आणि अवकाश ( आकाश ) या पंचमहाभुतांपासून माणसाला देह मिळाला, त्याचे जीवन सुरु राहिले. या पाचही गोष्टी स्थिर नाहीत. पण माणसासाठी तुलनेने पृथ्वी ही स्थिर आहे. तिची सूक्ष्म कंपने सतत सुरु असतात. हिंदू धर्मामध्ये हजारो वर्षांपासून मंत्रांमधील शब्द, ते उच्चारतांना होणारी कंपने, त्याचा माणसाच्या शरीरावर आणि बाजूच्या वातावरणावर होणारा परिणाम याचे पक्के ज्ञान असलेले निष्णात जाणकार होते. या कंपनांमधून निर्माण होणाऱ्या आकृती आणि आकृतींमधून मिळू शकणारे परिणाम याचे ज्ञान त्यांना निश्चित होते असे दिसते.
आपल्या अनेक परंपरागत रांगोळ्या हे केवळ आकारच नाहीयेत. त्यात खूप वेगळा धार्मिक अर्थ भरला आहे. स्वर आणि सूर यामध्ये सखोल संशोधन करणाऱ्या डॉ. अशोक रानडे यांनी, सुमारे ४० वर्षांपूर्वी कांही प्रयोग केले होते. एका प्रचंड मोठ्या घंटेच्या खाली एक मोठा लोखंडी चौकोनी पत्रा ( प्लेट ) ठेऊन त्यावर त्यांनी रांगोळी फक्त पसरून ठेवली होती. घंटेच्या विविध प्रकारच्या आवाजानुसार खाली ठेवलेल्या पत्र्यावरील रांगोळीच्या कणांचे विविध आकार तयार होत होते. हे आकार अगदी आपल्या अनेक परंपरागत रांगोळ्यांसारखे होते.
आता असेच अत्यंत थक्क करणारे कित्येक प्रयोग, जगामध्ये विविध देशांमध्ये, गेली अनेक वर्षे केले जात आहेत. यामध्ये अनेक शास्त्रज्ञ आणि संगीतज्ञ भाग घेत आहेत. यासाठी विविध प्रकारचे स्पीकर्स आणि धातूच्या जाड पत्र्यांचा वापर केला जात आहे. पत्र्यावर पसरलेली रांगोळीसारखीच जाड पावडर, विविध आवाजांनुसार अगदी हुबेहूब आपल्या ठिपक्यांच्या रांगोळ्यांचे आकार धारण करते. सर्वात आश्चर्याची आणि हिंदू धर्मासाठी अभिमानाची गोष्ट अशी की यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध आवाजांमध्ये आपल्या ओमकारासह अनेक मंत्रोच्चारांचा वापर केला जातो. स्टीव्हन हॅपर्न यांनी केलेल्या एका प्रयोगात, ओSSSम असा उच्चार झाल्यावर एकाच्या आत एक उमटणारी वर्तुळे म्हणजे, “पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात् ” याचे प्रत्यंतरच वाटते. ( सोबतच्या व्हिडीओ क्लिप्स जरूर पाहाव्यात ). अनेक आवाजांमधील विविध मंत्रोच्चार आणि त्यानुसार वेगाने साकारणारे रांगोळीचे आकार, आपल्याला थक्क करून सोडतात. कांही आवाज ऐकून तर आपण गावाच्या एखाद्या मोठ्या देवळाच्या गाभाऱ्यातच कांही मंत्रजप ऐकतोय असे वाटते. इव्हॅन ग्रॅन्टच्या एका प्रयोगात, एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीला आपल्या समोर चक्क कमळ साकारत जाते. हिंदू धर्मामध्ये कमळाला किती महत्व आहे ते आपण जाणतोच. तर कांही प्रयोगांमध्ये आपण शंख आणि घंटा यांचा आवाज ऐकू शकतो, त्याच्या उमटणाऱ्या आकृत्या पाहू शकतो. त्यांनी अनेक युरोपीय वैज्ञानिकांची नावे घेतली असली तरीही या गोष्टी आपल्याला त्याच्याही आधी, हजारो वर्षांपासून नक्कीच माहिती असाव्यात, असे दिसते. हे प्रकरण चक्क आपल्या DNA ( गुणसूत्रे ) पर्यंत जाऊन पोचते. सोबतचे चित्र क्रमांक ५ आणि ६ जरूर पाहा. निसर्गातील १.६१८ हे सूत्र, ज्याला गोल्डन रेशियो म्हटले जाते ते आपल्या मंत्रांमध्ये, DNA व मानवी देह यात आढळते. ओमकाराचे आधुनिक ध्वनी चित्र, आपले श्रीयंत्र आणि अनेक रांगोळ्या यांच्यामध्ये आश्चर्यकारक साम्य आहे.
वास्तविकपणे आता ध्वनीसाठी ग्राफिक्स, नोटेशन्स, मॉनिटर्स, कॉम्प्युटराइज्ड अनालिसिस अशा अत्याधुनिक गोष्टी उपलब्ध असूनही हे आरेखनाचे प्रयोग केले जात आहेत. याला सायमॅटिक्स ( CYMATICS ) असे म्हटले जाते. हे सर्व प्रयोग आणि त्यांचे परिणाम पाहिल्यावर अशी खात्री पटते की आपल्या पूर्वजांना या गोष्टींचे सखोल ज्ञान होते. ठिपक्यांच्या रांगोळ्या या कालानुरूप बदलत गेल्या असल्या तरी ते कांही मुक्त आकार नव्हेत. निरर्थक चित्रे नव्हेत. आपल्या विविध मंत्रोच्चारांचे ते परिणाम होते. आरेखन होते. प्रिंटाऊट्स होते. आपण जमिनीवर ( जमिनीत सूक्ष्म कंपने असतातच ) आणि पाण्यावरच रांगोळ्या काढतो. हे सर्व प्रयोगही कृत्रिम कंपने निर्माण करण्यसाठी जाड पत्र्यावर आणि पाणी किंवा द्रव पदार्थावारच केले जात आहेत. आपल्या धर्मामध्ये विविध धातूंच्या पत्र्यांवर,कांही मंत्र,आकृत्या,अक्षरे,चिन्हे,मंत्रबीजे कोरून तयार केली जाणारी यंत्रे म्हणजेही याचाच एक भाग असावा.
आपला योग, आयुर्वेद, भारतीय संगीत, कोरोनामुळे भारतीय सार्वजनिक जीवनपद्धती अशा अनेक गोष्टींचा जगात खूप प्रसार होतो आहे. मला अशी आशा आहे की या सर्व अभ्यास आणि निष्कर्षानंतर पाश्चात्य सुद्धा आपल्या घरासमोर रांगोळी काढायला लागतील.
दीपावली म्हणजे जशी दिव्यांची रांग तशीच रंगावली म्हणजे रंगांची रांग ! दिवाळीला रांगोळीमुळेच पूर्णत्व लाभते. आता हे सर्व पाहिल्यावर तरी पुढे कधीही रांगोळी काढतांना आपण ते एक मंत्रचित्र आहे याची आठवण ठेवायला हवी. जर मंत्रोच्चारांमुळे एक आकृती साकार होत असेल तर साकारलेल्या आकृतीतून मंत्रलहरी पुन्हा उत्सर्जित होऊ शकत असतील का ? किंवा पृथ्वीची सतत होत असलेली कंपने , या रांगोळीच्या माध्यमातून बाहेर येऊन नकळत एखाद्या मंत्राचा प्रभाव निर्माण करीत असतील का ? विचार करायला हवा.
ही दीपावली सर्वांना खूप आनंदाची आणि भरभराटीची जावो !
( सौजन्य, आभार — विकिपीडिया, गुगल, युट्युब, पिंटरेस्ट, चिन्मयी कानुगोंडा, जॉन रीड, एरिक लार्सन, TED, इव्हान ग्रांट, चार्ल्स टेलर आणि अनेक अज्ञात )
मकरंद करंदीकर. makarandsk@gmail.com
वरील लेखाशी संबंधित लिंक्स—
1) Steven Halpern Great Pyramid OMs Cymatics
https://www.youtube.com/watch?v=Yw13EAX3cZk&feature=emb_rel_end
2) Evan Grant: Making sound visible through cymatics
https://www.youtube.com/watch?v=CsjV1gjBMbQ
3) Amazing Resonance Experiment!
https://www.youtube.com/watch?v=wvJAgrUBF4w
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)