स्वराज्य आणि रामराज्य..

श्री शिवछत्रपतींच्या इतिहासात अनेक लेखकांना त्यांच्या स्वमताला अनुकूल असणारे मत शोधायचा ध्यास लागलेला असतो. विविध हेतू ठेऊन निर्माण झालेल्या सामाजिक आणि राजकीय संघटना स्वत:चे मत हे समाजमत म्हणून मान्यता पावले जावे म्हणून शिवछत्रपतींच्या इतिहासामध्ये अक्षम्य ढवळाढवळ करतात. जदुनाथ सरकारांना तर शिवछत्रपतींच्या इतिहासाची खोली ही राजकीय सत्ते बरोबर सांस्कृतिक सत्तेपर्यंत होती हे उमगले नाही. कॉ शरद पाटील, गोविंद पानसरेंना शिवछत्रपतींच्या इतिहासात निव्वळ साम्यवाद दिसला. राजवाड्यानी इतिहासमांडणीआडून वर्णव्यवस्थेच्या पाठराखणीची हौस भागवून घेतली.
मूळात शिवछत्रपतींच्या अधीन असलेल्या मध्ययुगाच्या बाबतीत एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी कि तत्कालीन भक्तीमार्ग आणि संप्रदायाशी तत्कालीन समाज एकरुप झाला होता. वारकरी, भागवत संप्रदायाची अध्यात्मिक चळवळ ही त्यांच्या परमोच्च बिंदू वर होती. त्याच भक्तीमार्गांशी तादात्म पावलेल्या देवता श्रीराम व श्रीकृष्ण ह्यांचा पगडा लोकमानसावर असणे अगदीच साहजिकच होते. परमानंदाने जो शिवभारत ग्रंथ शिवछत्रपतींची थोरवी सादर करण्यात लिहिला त्याचं ऐतिहासिक दृष्ट्या महत्व थोर आहे ह्या शिवभारताचं नाव “अनुपुराणे सुर्यवंशम “असे येते. महाराजांचा वंशवेल हा प्रभू रामचंद्रां पर्यंत जातो हि धारणा तत्कालीन समाजात होती. परमानंदाने शिवभारताच्या दहाव्या अध्याया मध्ये श्लोक क्रमांक ३४ ते ४० च्या दरम्यान महाराजांनी अध्ययन केलेल्या ज्या शास्त्र ग्रंथांची यादी दिली आहे त्यात श्रुति,स्मृती ह्या बरोबरच रामायणाचा उल्लेख स्वतंत्र रित्या केला आहे. ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की तत्कालिन हिंदू समाज व्यवस्थेत राजा म्हणून श्री रामचंद्राची क्षत्रिय दिनचर्या आदर्श होती.
अज्ञातदासाच्या पोवाड्यात जी लोककला मानली जाते त्यात जेधे आणि बांदलांच्या बाबतीत अंगद आणि हनुमंताची उपमा येऊन शिवछत्रपती साक्षात प्रभू रामचंद्रांच्या ठायी आहेत. वनवासासाठी निघताना भरताला गादीवर बसवा म्हणणारे जसे प्रभू रामचंद्र दिसतात तसेच ह्याच पोवाड्यात उमाजीस म्हणजे महाराजांच्या पुतण्यास गादीवर बसवा असा थेट उल्लेख आहे. रामायणातला भ्रातृभाव आपल्याला शिवछत्रपतींच्या इतिहासात स्पष्ट दिसतो. व्यंकोजीराजांसोबत झालेल्या संघर्षात महाराजांची बाजू न्याय असताना महाराज पराभूत झालेल्या व्यंकोजीराजांबाबत रघुनापंतांना लिहितात.’व्यंकोजीराजे आपले धाकटे बंधू आहेत. मूलबुद्धी केली, त्यास तोही आपला भाऊ, त्यास रक्षणे, त्याचे राज्य बुडवू नका” महाराजांनी रामायण आत्मसात केलं ते असं आणि रामायण सांगण्यावर नंतर अधिकार गाजवणारे रामाचं रघुनाथ नाव धारण करू राहत्या घरात पुतण्याला ठार मारणारे पेशवाईत निपजले हा सुद्धा इतिहासच.
स्वराज्याच्या पहिल्या राजधानीला असलेल्या “सुवेळा “व “संजिवनी” माची ही रामायणाशी अंतर्धान पावणारी नावे ही परंपरा इथेच न थांबता रायगडाच्या “कुशावर्ता” पर्यंत जाते हे विशेष. राजगडी पालथे निपजलेले ‘रामराजे” हे शिवछत्रपतींच्या श्रीराम आस्थेचा आविष्कार. समर्थांच्या रामदासी संप्रदायाला महाराजांनी कायम आस्था दाखवली मग ती चाफळ च्या मठाला दिलेली सनद असेल अथवा आपली लष्करी ठाणी आश्रमासाठी रामदासी मंडळींना बहाल करणे असेल. महाराष्ट्रात खासा औरंगजेब उतरला तेव्हा ह्या संप्रदायाला तंजावरकर भोसलेंनी राजाश्रय दिला. पुढे जाऊन तर भोसले कुलोत्पन्न नागपूरकरांनी आपले कुलदैवत प्रभू रामचंद्र म्हणून स्विकारले.
महाराष्ट्रात आजही बाळाच्या बारश्याला राम, कृष्णाच्या बरोबरीने शिवछत्रपतींचा पाळणा गायला जातो. दंडकारण्यात श्री भवानी प्रभू रामचंद्रास वर देऊन रामवरदायनी झाली. त्याच वरदायनीला बत्तीस दाताच्या बोकडाचा बळी देणारे महत्तम मर्यादा पुरूषोत्तम श्री शिवछत्रपती मराठ्यांच्या काळजावर कोरलेत ते त्यांच्या “रामराज्य स्वराज्या” मुळे..
सचिन शिवाजीराव खोपडे देशमुख,
बारा मावळ परिवार.