ओळख राशींची – मेष

‘मेष’ ही राशी चक्रातील पहिली रास आहे. ‘मेंढा’ हे या राशीचे प्रतीक आहे. ही अग्नी तत्त्वाची व रजोगुणांनी परिपूर्ण भरलेली रास आहे. ही पुरुष रास आहे. तसेच अल्पप्रसव व चररास आहे. मेंढय़ाप्रमाणे लढऊपणाने व निकराने कोणत्याही प्रसंगात टक्कर घेण्याचा आपला स्वभाव आहे. आपण शूर व करारी आहात. स्वातंत्र्याचे भोक्ते आहात. त्यामुळे कोणाच्याही हाताखाली चाकरी करणे आपल्याला नापसंत असते. प्रत्येक क्षेत्रात बाणेदारपणे, तडफदारपणे व आत्मविश्वासाने काम करण्याचा आपला स्वभाव आहे.

मूर्तिमंत चैतन्य, उसळणारे तारुण्य व ओसंडून जाणारा उत्साह हे आपले वैशिष्टय़ आहे. युद्धभूमीवर, रणांगणावर, कुस्तीच्या आखाडय़ात धर्याने व तेजाने पराक्रम करून चमकणारी आपली रास आहे. आपल्याच धुंदीत व मस्तीत बेगुमानपणे व उन्मत्तपणे आक्राळविक्राळ लाटांनी फेसाळत दुथडी भरून पूर आलेल्या व वेगाने वाहणा-या नदीसारखा आपला स्वभाव आहे. संकटकाळी न घाबरणारी साक्षात मृत्यूच्या जबडय़ात प्रवेश करणारी आपली रास आहे. कसल्याही नाठाळ घोडय़ाला वठणीवर आणणारी आपली रास आहे. कसलेल्या स्वाराप्रमाणे आपली घोडय़ावरील मांड पक्की असते. झुंजारपणा हे आपले खास वैशिष्टय़ आहे. शौर्य, धाडस, धडाडी, साहस, धैर्य, निग्रह, निश्चय व आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती, मनोनिग्रह, स्वातंत्र्यप्रेम या गोष्टी उपजतच आपल्याकडे असतात. सम्राट सिकंदराप्रमाणे सारे जग जिंकावे असे आपणास वाटत असते. नेपोलियनप्रमाणे ‘अशक्य’ हा शब्द आपल्याही शब्दकोषात नसतो.

आपल्या व्यक्तिमत्त्वात रग आहे. मनगटात जोर आहे. व्यक्तिमत्त्वात अपूर्व ताकद आहे. स्वभाव बाणेदार आहे. आपल्या स्वभावात हुकूमशाही आहे. आपले बोलणे, वागणे आक्रमक वृत्तीचे असते. हातात काहीही राखून न ठेवण्याचा आपला स्वभाव असतो. आपल्याला आपल्या मानी स्वभावामुळे अपमान सहन होत नाही. आपली मते व विचार इतरांवर लादण्याचा आपला स्वभाव आहे. कुटुंबातील, ऑफिसमधील, संस्थेतील सर्वानी आपल्याच तंत्राने वागावे असे आपणास वाटत असते. आपल्याकडे नेतृत्वाचे गुण असतात. आपण गतिमानतेने, वेगाने, त्वरेने काम करणारे असता, त्यामुळे अनेक संस्थांचे नेतृत्व आपणाकडे चालून येते.

आपला स्वभाव कडक असतो. तापट असतो. काहीवेळा फटकळही असतो. दुस-यावर वर्चस्व गाजविण्यात आपल्याला आनंद वाटतो. नमते घेणे, माघार घेणे आपल्या स्वभावात नसते. आपल्याला चटकन संताप येतो. आपण थोडेसे भांडखोर असता. मात्र आपल्याकडे चिकाटी आहे. जिद्द आहे. सतत गतिमान राहून परिस्थितीचा वेध घेऊन पुढे जाण्याची ईर्षा आहे. नराश्याने हातपाय गाळून स्वस्थ बसण्याचा आपला स्वभाव नाही. आपल्या वृत्तीत गर्वष्ठिपणा आहे. अहमपणा आहे. स्वभावात मानीपणा आहे. आपल्याकडे थोडे क्रौर्य आहे. निष्ठूरपणा आहे. कोपिष्टपणा आहे. त्याचप्रमाणे काहीवेळा उतावीळपणाने व अविचाराने कार्य करण्याची व निर्णय घेण्याची आपली वृत्ती आहे. आपल्या बोलण्या-चालण्यातून घमेंडी स्वभाव दिसून येतो. आपणाला प्रवासाची आवड असते. आपले ठिकाण वारंवार बदलण्याची आवड असते. परिस्थितीला हवे तसे वळण आपण देऊ शकता. परंतु, त्याचबरोबर आपला स्वभाव हा शिपाई गडय़ासारखा रांगडा व सरळधोपट असतो. प्रत्येक गोष्टीत धांदल, धावपळ करण्याची आपणाला सवय असते. आपली रास ही आरंभशूर आहे. नेतृत्व करणारी सामर्थ्यवान अशी आपली रास आहे.

मेष या राशीमध्ये आश्विनी, भरणी व कृत्तिका ही तीन नक्षत्र येतात. आश्विनी नक्षत्रातील चारही चरण, भरणी नक्षत्रातील चारही चरण व कृत्तिका नक्षत्रातील फक्त पहिल्या चरणाचा समावेश मेष राशीमध्ये होतो.

मेष रास व आश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – विद्वान, चतुर, सौंदर्यप्रेमी, स्वच्छतेची आवड, स्वकार्यदक्ष, चलाख, सुखी, यशस्वी, मानसिकदृष्टय़ा स्थिर, व्यवहारकुशल, विनयशील, काहीवेळा जास्त उतावळेपणा, काही प्रमाणात विश्वासघातकी.

मेष रास व भरणी नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – वाचाळ, भाग्यवादी, धनाढय़, भोजनप्रिय, कृतघ्न, काही वेळा क्रूर व निष्ठूर, विचारात अस्थिरता, भोगप्रिय, सुगंधित वस्तूंचे शौकीन

मेष रास व कृत्तिका नक्षत्रात जन्मलेल्या जातकांची वैशिष्टय़े – तेजस्वी, विद्वान, चतुर, राजासमान आचरण, स्वाभिमानी, गुप्त विद्येमध्ये रस असणारे, स्त्री सान्निध्याच आकर्षण असणारे, प्रसिद्धी मिळविणारे, काही प्रमाणात चलाख व क्रोधी.

नक्षत्रानुसार अक्षरज्ञान
अश्विनी नक्षत्र – चू, चे, चो, ला
भरणी नक्षत्र – ली, ले, लू, लो
कृत्तिका नक्षत्र – अ

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

3 thoughts on “ओळख राशींची – मेष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: