ओळख राशींची – वृषभ

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,
मेष
वृषभ
मिथुन
कर्क
सिंह
कन्या
तूळ
वृश्चिक
धनू
मकर
कुंभ
मीन

वृषभ ही राशी चक्रातील दुसरी रास आहे. धष्टपुष्ट बैल ही या राशीची आकृती आहे. भरपूर ताकद व शक्ती, धिमा व शांत; परंतु खवळला तर उग्र असे सामान्यत: बैलाचे स्वरूप असते. ही पृथ्वी तत्त्वाची व शुक्राच्या अंमलाखालील रास आहे. ही अर्थ तत्त्वाची, बहुप्रसव व स्त्री राशी आहे.
आपले पाय जमिनीवर स्थिर असतात. व्यवसाय, नोकरी, जागा वरचेवर न बदलण्याचा आपला स्वभाव असतो. मैत्रीला व शब्दाला आपण पक्के असता. श्रद्धा व निष्ठा या बाबतीत आपण कमालीचे तत्त्वप्रधान असता. अनुयायी म्हणून आपली रास अत्यंत चांगली असते. आपल्या नेत्याला आपण आपली निष्ठा अर्पण केलेली असते. त्यामध्ये अस्थिरपणा नसतो. घेतलेल्या निर्णयाला चिकटून राहण्याचा आपला स्वभाव असतो.

आपण आनंदी व आशावादी आहात. आपल्याला सुखाची अभिलाषा मोठय़ा प्रमाणावर असते. शांतपणा हा आपला स्थायीभाव आहे. भांडणतंटा करणे, हमरीतुमरीवर येणे, आदळआपट करणे हे आपल्या स्वभावात नसते. आपण सहनशील व सोशिक आहात. गोड, आर्जवी व प्रिय बोलण्यामुळे आपण सर्वाना हवेहवेसे असता. शुक्र या ग्रहाचा अंमल आपल्या राशीवर असल्याने आपणाकडे एक प्रकारची आकर्षण शक्ती असते. आपल्याकडे विनयशीलता, नम्रता व प्रेमळपणा हे गुण असतात. आपण रसिक आहात. साहित्य, कला, संगीत, नाटय़, चित्रपट यांची आपणास विशेष आवड असते. वृषभ स्त्रीला दागदागिन्यांची आवड, उंची साडय़ा, अत्तरे व ख्यालीखुशालीची उपभोग घेण्याची आवड असते. विलासी राहण्याकडे तिचा कल असतो. वृषभ ही संसारप्रिय राशी आहे. आपली ओढ नेहमी घराकडे असते. पत्नी, मुले व परिवारातील सर्वाना सुखी, समाधानी ठेवण्याकडे आपला कल असतो. आपल्याला मित्रमंडळी खूप असतात व त्यांचे अतिथ्य करण्यात आपणाला आनंद वाटत असतो. सेवा करणे, नोकरी करणे याकडे आपल्यापैकी अनेकांचा कल असतो. सहनशील, सोशिक व सेवाभावी स्वभावामुळे सोपवलेले काम कर्तव्य निष्ठेने व जबाबदारीने पार पाडण्याचा आपला स्वभाव असतो. मालक वा नेता यांच्या आज्ञा पाळणे, सेवा करणे, निष्ठेने काम करण्याकडे कल असल्यामुळे व विधायक, रचनात्मक कामाकडे ओढा असल्यामुळे कोणत्याही संस्थेचा, उद्योग समूहाचा, ट्रस्टचा कारभार आपण उत्कृष्टपणे करू शकता. कोणत्याही संस्थेचा कारभार सेवाभावी वृत्तीने व नि:स्वार्थी भावनेने करण्यात आपला हात कोणीही धरू शकणार नाही. कोणतेही काम समर्पण भावनेने करण्यात आपणाला सात्त्विक आनंद मिळतो. जीवनाच्या रंगभूमीवरील कोणतीही भूमिका आपण यशस्वीपणे पार पाडता. कोणतीही जबाबदारी निष्काम भावनेने पार पाडण्याची आपली पद्धत असते. भारतीय युद्धात अर्जुनाच्या रथाच्या घोडय़ाचे खरारे करण्यास किंवा पांडवांच्या यज्ञ समारंभात काम करण्यात योगेश्वर कृष्णाला कमीपणा वाटला नाही. त्याप्रमाणे आपण सर्वत्र निर्मोही व निरपेक्ष बुद्धीने काम करत असता.
मृगजळाच्या मागे धावण्याचा आपला स्वभाव नाही. मेष, सिंह किंवा वृश्चिकेसारखा महत्त्वाकांक्षी असाही आपला स्वभाव नाही. त्यामुळे वृषभ व्यक्ती या राजकीय किंवा सामाजिक चळवळीच्या नेतृत्वपदी क्वचितच आढळतील. कौटुंबिक जीवन, स्वास्थ्य, समाधान, आराम, शांतता यांना आपण अधिक किंमत देत असल्यामुळे महत्त्वाकांक्षेसाठी फार मोठी किंमत मोजावयास आपण तयार नसता. आपल्याकडे संग्राहक वृत्ती आहे. व्यवहार कुशलता आहे. व्यापारी वृत्ती आहे. पैशाचे मोल आपणाला समजलेले असते. आपल्याला प्रवासाची आवड कमी असते. आपणाकडे थोडा हट्टीपणा असतो. सुप्त शक्ती भरपूर असते. या सर्व गुणांमुळे वृषभ राशीचा पती किंवा पत्नी मिळणे हे भाग्याचे लक्षण असते.

सारांश : संसार सुखाचा करावा. सरळ वागावे. दुस-याचे हित साधावे. प्रामाणिकपणे काम करून संसार सुखाचा करावा व आयुष्य सुख-समाधानात घालवावे ही आपली विचारसरणी असते.

वृषभ या राशीमध्ये कृत्तिका, रोहिणी व मृग ही तीन नक्षत्र येतात. कृत्तिका नक्षत्रातील दुसरे, तिसरे व चौथे चरण, रोहिणी नक्षत्रातील चारही चरण व मृग नक्षत्रातील पहिल्या दोन चरणांचा समावेश वृषभ राशीमध्ये होतो.

वृषभ रास व कृत्तिका नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – धनयुक्त, चतुर, विद्यानिपुण, स्वाभिमानी, चेह-यावर तेज असलेले, राजासारखे आचरण असणारे, आशावादी असतात. ‘क्षणे रुष्टा क्षणे तुष्टा’ असे असतात.

वृषभ रास व रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – स्वभावाने शांत, हसमुख, मधुरभाषी, रूपवान, विनम्र, प्रसन्नचित्त, दृढप्रतिज्ञ, पवित्रतायुक्त, धनी, उत्तम स्मरणशक्ती, भोगी, मोठय़ा टपो-या डोळय़ांचे असतात.

वृषभ रास व मृग नक्षत्रात जन्मलेल्या जातकांची वैशिष्टय़े – स्वभावाने सौम्य, भ्रमणशील, चंचलमनाचे, उत्तम वक्ता, अभिमानी, विवेकी, धनपुत्र, भूमी, वाहन यांचे सुख मिळविणारे, काहीवेळा स्वार्थी व कुटिल असतात.
रास व नक्षत्रानुसार अक्षरज्ञान
कृत्तिका नक्षत्र – इ, उ ए
रोहिणी नक्षत्र – ओ, वा, वि, ऊ
मृग नक्षत्र – वे, वो

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: