ओळख राशींची – मिथुन

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,
मेष
वृषभ
मिथुन
कर्क
सिंह
कन्या
तूळ
वृश्चिक
धनू
मकर
कुंभ
मीन

मिथुन ही राशी चक्रातील तिसरी रास आहे. स्त्री व पुरुषाचे जोडपे हे या राशीचे प्रतीक आहे. ही वायू तत्त्वाची व द्विस्वभाव राशी आहे. बुध या ग्रहाचे या राशीवर स्वामित्व आहे. त्यामुळे बुद्धिप्रधान अशी ही रास आहे. मिथुन ही विषय राशी असून पुरुष राशी आहे.

आपणाकडे निसर्गत:च उत्तम ग्रहणशक्ती आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता आहे. पांडित्य आहे. तीव्र स्मरणशक्ती आहे. ज्ञान साधनेकरिता आपला जन्म असतो. वाचन, चिंतन, मनन, संशोधन, व्यासंग याबद्दल आपली ख्याती असते. आपल्याकडे शोधकपणा असतो. प्रसंगावधान, समयसुचकता, हजरजबाबीपणा, चातुर्य, नर्मविनोद, हसत हसत दुस-यावर टीका करण्याची सवय असते. ही सर्व उत्तम वकिलाला लागणारी गुणवैशिष्टय़े आपणाकडे असतात. अनेक भाषांवर आपले प्रभुत्व असू शकते. शब्दावर आपली हुकूमत असते. वक्तृत्व, चर्चासत्रे, परिसंवाद, व्याख्याने, प्रवचने, वृत्तपत्र, बौद्धिक चळवळी ही आपल्या आवडीची खरीखुरी क्षेत्रे होत. आपल्याकडे चिकित्सक वृत्ती आहे. प्रत्येक प्रश्नाचे व समस्येचे विविध पैलू आपल्या नजरेसमोर येतात. ही द्विस्वभाव रास आहे व वायुराशी आहे. यामुळे विचाराने, तडकाफडकी दुसरे टोक गाठण्याचा आपला स्वभाव असतो. आपल्या जीवनात विचारांचा व भावनांचा चढ-उतार होत असतो. या राशीमध्ये चंचलता आहे, अस्थिरता आहे, धरसोडपणा आहे. आपल्या बोलण्यात व कृतीत मेळ असत नाही. ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी आपली स्थिती असते. आज एक गोष्ट आवडेल तर थोडय़ाच दिवसात त्या गोष्टीचा कंटाळा येऊन दुसरीच गोष्ट आवडेल असा आपला स्वभाव असतो. आपल्याला मर्दानी व मैदानी खेळापेक्षा कॅरम, बुद्धिबळ, पत्ते असेच खेळ आवडतात. एखाद्या गोष्टीचे नेतृत्व स्वीकारण्यापेक्षा पडद्याआड राहून काम करण्याची प्रवृत्ती असते. बँकिंग, पोस्ट, टेलिग्राफ, वकील, बातमीदार, संपादक, विमा एजंट, दलाल, जनसंपर्क व प्रसिद्धी अधिकारी, दुभाषी, स्टेनो टायपिस्ट, कॉम्प्युटर ही आपली क्षेत्रे आहेत. संशोधन कार्य, विज्ञान, शाखा, स्टॅटिस्टिक्स, वाणिज्य, कायदा या विषयात आपला उत्तम प्रभाव पडतो. आपल्या बौद्धिक कौशल्याने मित्रमंडळींतील बैठकीत आपण उठून दिसता. नवनवीन कंपन्या, फर्मस्, संस्था याची आखणी व जुळणी, प्रोजेक्ट रिपोर्ट्स आपण उत्तमरीत्या करू शकता.

आपण सतत गतिमान राहता. जगात नवनवीन काय चालले आहे, याचा कुतूहलाने आपण शोध घेत असता. साहित्य, काव्य, नाटय़ या गोष्टी आपणास मुळापासून आवडतात. कुठे काय चालले आहे, याकडे आपले लक्ष असते. यामुळे मिथुन व्यक्ती वृत्तपत्र, आकाशवाणी, टेलिव्हिजन यासारख्या प्रसारमाध्यमांत आघाडीवर असतात. शब्दांचा अचूक वापर हे आपल्या हातातील प्रमुख अस्त्र असते. आपल्या बोलण्याच्या पद्धतीमुळे आपणाला असाधारण लोकप्रियता लाभते. आपल्याकडे अनेक गोष्टींचा खजिना असतो. ज्ञानाचे भांडार असते, त्याचा योग्यवेळी आपण कौशल्याने वापर करू शकता. व्यासपीठावर आपण चमकत असता. बुद्धिमत्ता हेच आपले खरेखुरे भांडवल असते. जगातील ज्ञानभांडार समृद्ध करण्यात, विपुल ग्रंथलेखन करण्यात, काव्य – समीक्षा या ज्ञानशाखा संपन्न करण्यात मिथुन व्यक्तींनी मोठाच हातभार लावला आहे.

मिथुन या राशीमध्ये मृग, आद्र्रा व पुनर्वसु ही तीन नक्षत्र येतात. मृग या नक्षत्रातील तिसरे व चौथे चरण, आद्र्रा नक्षत्रातील चारही चरण व पुनर्वसू नक्षत्रातील पहिले तीन चरणांचा समावेश मिथुन राशीमध्ये होतो.

मिथुन रास व मृग नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – धार्मिक यात्रा करणारे, धनाढय़, साहसी, विवेकी, वाहन सुखाचा तसेच भूमी भवनाचा उपभोग घेणारे, हुशार, विद्वान, गतिशील, क्रियाशील, उत्साही, पराक्रमी, भ्रमणशील, उद्योगी.

मिथुन रास व आद्र्रा नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – धार्मिक कार्यात, सामाजिक कार्यात रस घेणारे, चंचल वृत्तीने युक्त, यांचे सर्व योग चंद्रावर अवलंबून असतात. शत्रूनाशक, बलशाली, काहीवेळा आपल्या कृत्याने इतरांना त्रास देणारे.

मिथुन रास व पुनर्वसु नक्षत्रात जन्मलेल्या जातकांची वैशिष्टय़े – व्यवहारकुशल, विद्वान, कोमल, माणुसकी जपणारा, साहित्यप्रेमी, सरळ व सौम्य, ऐश्वर्यसंपन्न जीवन जगणारे, संतोष मानणारा, मातृ-पितृप्रेमी, काव्यप्रेमी.
नक्षत्रानुसार अक्षरज्ञान
मृग नक्षत्र – का, की
आद्र्रा नक्षत्र – कु, घ, गं, छ
पुनर्वसु नक्षत्र – के, को, हा

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: