ओळख राशींची – कर्क

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,
मेष
वृषभ
मिथुन
कर्क
सिंह
कन्या
तूळ
वृश्चिक
धनू
मकर
कुंभ
मीन

कर्क ही राशीचक्रातील चौथी रास आहे. ही चर रास असून बहुप्रसव राशी आहे. ही स्त्री रास व जल राशी आहे. या राशीवर चंद्राचे स्वामित्व आहे. त्यामुळेच चंद्राची शीतलता व प्रसन्नता या राशीत आहे. अतिशय संवेदनक्षम अशी ही रास आहे.
चंद्राचा अंमल आपल्यावर असल्याने आपल्या वृत्तीत सतत चढ-उतार होत असतात. कधी हसू तर कधी अश्रू. कधी एकदम आनंदी तर लगेच दु:खी असे आपल्या स्वभावात चढ-उतार होत असतात. आपण अत्यंत भावनाप्रधान आहात. आपण प्रेमळ, दयाळू, पाण्यासारखे शुद्ध व निर्मळ आहात. पाण्यासारखे सतत वाहत जाण्याचा आपला स्वभाव आहे. आपण व्यवहार्य आहात, काटकसरी आहात त्यामुळे आपण प्रपंचात यशस्वी होणार आहात. प्रपंच यशस्वी होण्यासाठी लागणारे आवश्यक गुण आपणाकडे आहेत. भावनेचा पगडा आपल्या मनावर बसत असल्यामुळे प्रवाहाबरोबर काहीवेळा वाहत जाण्याचा आपला स्वभाव आहे. कठोरपणाचा व कडकपणाचा तसेच निष्ठुरतेचा आपणाकडे अभाव असतो. आपले मन सतत अस्थिर व चंचल असते. या राशीचे प्रतीक खेकडा आहे. खेकडय़ाने एखादी वस्तू पंजात घेतली की, तो ती सोडत नाही, त्याप्रमाणे कोणत्याही ध्येयाला, विचाराला एकदा का आपण चिकटून राहिला की त्या व्यक्तीला, ध्येयाला चिकटून राहण्याचा आपला स्वभाव आहे. पाण्याप्रमाणे कोणत्याही जाती, धर्म, पंथाच्या व्यक्तीला आपण सामावून घेत असता. जात, धर्म, देश, पंथ यांचा विचार न करता कोणत्याही व्यक्तीशी मैत्री करण्याचा आपला स्वभाव असल्यामुळे आपला मैत्रपरिवार अफाट असतो. आपल्या परिवारात सर्व प्रकारच्या व्यक्ती असतात व आपल्या सभोवतालची माणसे आपल्यावर निस्सीम प्रेम करत असतात. त्याबाबत आपण नशीबवान असता. मनापासून प्रेम करणे हे आपले वैशिष्टय़ असते. आपल्या भावना तीव्र व उत्कट असतात. एकाचवेळी पारिजातकासारखे कोमल व वज्राप्रमाणे आपण कठोर होऊ शकता.

आपल्याकडे सात्त्विकता आहे. प्रेमळपणा आहे. विशुद्ध मन ही परमेश्वराने आपणाला दिलेली देणगी आहे. एखाद्या व्यक्तीची, नेत्याची, साधुसंताची, परमेश्वराची भक्तिभावाने पूजा करणे आपल्याला विशेष आवडते. आपण ज्या संस्थेत, ज्या पक्षात व ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी जीव ओतून काम करण्याचा आपला स्वभाव आहे. कोणताही विषय आपण शीघ्रतेने ग्रहण करू शकता. आपली ग्रहणशक्ती व कल्पनाशक्ती चांगली असते. कसल्याही उलटसुलट परिस्थितीशी आपण मिळतेजुळते घेत असता. आपली कल्पनाशक्ती चांगली असते. स्मरणशक्तीही उत्तम असते. आपले व्यक्तिमत्त्व, कार्यपद्धती व आपली वर्तणूक परिणामकारक, भारदस्त व छाप पाडणारी असते. गरज पडेल त्याप्रमाणे आपल्या विचारात, ध्येयधोरणात अनुकूल बदल करण्याचे तंत्र आपणाला जमलेले असते. मात्र आपले मन उघडे न करण्याचा आपला स्वभाव आहे.

आपण जन्मजात नेते असता. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास, अपूर्व इच्छाशक्ती, संघटन चातुर्य, उत्कट ध्येयवाद, देशाभिमान या सर्वावर सारखेच व निस्सीम प्रेम करण्याचा आपला स्वभाव असतो. यामुळे एखाद्या संस्थेचे नेतृत्व, पुढारपण, अधिकारपद आपल्याकडे चालून येते. आपण कवी मनाचे असता. तसेच द्रष्टय़े असता. आपल्याकडे दूरदृष्टी असते. पुढे होणा-या गोष्टीचा आपण वेध घेऊ शकता. त्यामुळे आपल्या गतिमान पद्धतीमुळे सर्वसमावेशक स्वभावामुळे आपण इतरांपेक्षा चार पावले पुढे असता. आपल्या व्यक्तिमत्त्वाभोवती एक भारदस्त वलय असते. असामान्य यश व अफाट लोकप्रियता याबाबतीत आपली बरोबरी कोणीही करू शकत नाही. आपणाकडे उत्तम क्षमाशीलता असते.
कर्क राशीमध्ये पुनर्वसु, पुष्य व ओषा ही तीन नक्षत्र येतात. पुनर्वसु नक्षत्रातील शेवटचे एक चरण, पुष्य नक्षत्रातील चारही चरण व ओषा नक्षत्रातील चारही चरणांचा समावेश कर्क राशीमध्ये होतो


कर्क रास व पुनर्वसु नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – इश्वरावर श्रद्धा असणारे, सुखी, सौम्य, सात्त्विक, समानतेने वागणूक देणारे, विनम्र स्वभावाचे, व्यवहार कुशल, मृदुभाषी, स्वत:चे विचार असलेले असतात.

कर्क रास व पुष्य नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – देवी-देवकांचे पूजक, बुद्धिमान, मोठय़ा भाऊ-बहिणींना प्रिय, श्रद्धावान, धनाढय़, राजप्रिय, चतुर अतिथीपूजक, मोठे कुटुंब असणारे.

कर्क रास व ओषा नक्षत्रात जन्मलेल्या जातकांची वैशिष्टय़े – परिणामांची पर्वा न करणारे, काहीवेळा विश्वासावर उभे न राहणारे, क्रोधी, कृतघ्न, काही प्रमाणात धूर्त, बहुभाषी.

नक्षत्रानुसार अक्षरज्ञान
पुनर्वसु नक्षत्र – ही
पुष्य नक्षत्र – हु, हे, हो, डा अ
आश्लेषा नक्षत्र – डी, डू, डे, डो

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: