ओळख राशींची – सिंह

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,
मेष
वृषभ
मिथुन
कर्क
सिंह
कन्या
तूळ
वृश्चिक
धनू
मकर
कुंभ
मीन

सिंह ही राशी चक्रातील पाचवी रास आहे. जंगलाचा राजा ‘सिंह’ हे या राशीचे प्रतीक आहे. ही अग्नितत्त्वाची रास आहे. स्थिर रास आहे. तसेच अल्पप्रसव व वंध्या राशी आहे. या राशीवर ‘रवी’ या ग्रहाचे स्वामित्व आहे. ‘रवी’ या ग्रहाचे या राशीवर स्वामित्व असल्यामुळे आपल्याकडे उदंड आत्मविश्वास आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्या स्वभावात स्वाभिमान खूप आहे. तेजस्वीपणा, चमकदारपणा, आकर्षकता व भव्यता ही आपल्या राशीची वैशिष्टय़े आहेत. आपणाला स्वातंत्र्य प्रिय असते. इतर कोणाही व्यक्तीच्या हाताखाली काम करणे आपणाला आवडत नाही. इतर कोणाचेही स्वामित्व आपण खपवून घेऊ शकत नाही. आपल्या स्वत:च्या काही विशिष्ट कल्पना असतात. सत्त्व आणि स्वत्त्व हे जपण्यासाठी आपण आग्रही असता. स्वातंत्र्याच्या संदर्भात आपण कोणतीही तडजोड करू शकत नाही.

आपल्या कुलशिलाबद्दल, परंपरेबद्दल, आपल्या पूर्वजांबद्दल आपणाला विशेष अभिमान असतो. परंपरेचे आपण पूजक असता. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत अशी आपली लहानपणापासून समजूत असते. घरातील, परिवारातील व सभोवतालच्या लोकांनी आपल्याला खास वागणूक द्यावी अशी आपली कल्पना असते. ही राज राशी आहे. त्यामुळे आपण मनाने उदार आहात, दिलदार आहात. सिंह हा वनाचा राजा असतो. कितीही अडचण आली तरी सिंह हा कधी गवत खाणार नाही. त्या सिंहाची ऐट, त्याचा दिमाख, त्याची प्रत्येक चाल, त्याची प्रत्येक हालचाल ही मी वनाचा, या जंगलाचा राजा आहे, या प्रदेशाचा मी स्वामी आहे. माझे जीवन व व्यक्तिमत्त्व स्वयंभू आहे, हे जसे त्या सिंहाचे असते तसेच आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल असते.

आपण मनाने उदार आहात. परमेश्वरानेच जन्मत: आपणाला विशाल मन बहाल केले आहे. कर्णाने आपली कवचकुंडले काढून देताना मागेपुढे पाहिले नाही. त्याप्रमाणे आपले मित्र असोत, नातेवाईक असोत, सहकारी असो ज्या ज्या व्यक्ती अडचणीच्या प्रसंगी आपणाकडे येतील त्यावेळी आपण मुक्तहस्ताने त्यांना आपणाला जे काही शक्य आहे ते देत असता, मदत करत असता. उदात्त, भव्य व दिव्य याची आपणास जन्मजात आवड आहे. प्रत्येक समारंभात आपल्याला पुढचीच खुर्ची हवी आहे. लग्न समारंभात किंवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात इतरांनी आपणाला मान द्यावा अशी आपली कल्पना असते. आपल्याला आपली उपेक्षा केलेली खपणार नाही. ज्या ठिकाणी सिंह व्यक्तींना मान मिळणार नाही त्या ठिकाणी सिंह व्यक्ती फिरकणार नाहीत.

आपण इतरांना स्फूर्ती देऊ शकता. चैतन्य देऊ शकता, संजीवनी देऊ शकता. नेतृत्व करणे किंवा पुढारपण करणे हा तुमचा जन्मजात हक्क आहे. सिंह रास ही नशिबवान रास आहे. ही राज राशी असल्यामुळे एखादी व्यक्ती जीवनाच्या सुरुवातीला कितीही खालच्या पदावर असली तरी, आपल्या केवळ राशीच्या प्रभावामुळे कालांतराने ती उच्च पदावर जाणार यात संशय नसतो. आपल्याकडे सत्तेची अनिवार लालसा असते. कोणतेही खालचे पद, कोणतीही सामान्य जागा आपणाला आवडणार नाही. आपण अतिशय महत्त्वाकांक्षी आहात. आपणाला कितीही मोठी सत्ता मिळाली, कितीही मोठे पद मिळाले तरी त्याच्याहीपेक्षा अधिक पद मिळावे अशी आपली इच्छा असते. सत्ता, संपत्ती, कीर्ती या गोष्टी कितीही मिळाल्या तरी सिंह व्यक्तींचे समाधान होत नाही. आपल्याकडे प्रचंड आत्मविश्वास आहे, दमदारपणा आहे, आशावाद आहे, उत्साह आहे. आपण मनाने सतत चिरतरुण असता. मनाने निरोगी असता. आपल्याकडे खिलाडू वृत्ती असते. आपली मते कायम व स्थिर स्वरूपाची असतात. आपल्या स्वभावात मोकळेपणा असतो. दिलखुलासपणा असतो. हातचे काही राखून न ठेवता वागण्याची आपली पद्धत असते. आपल्या स्वभावात प्रांजलपणा असतो. आत एक व बाहेर एक अशी दुटप्पी वृत्ती आपल्याकडे नसते. आपले दुसरे वैशिष्टय़ म्हणजे आपला राग दीर्घकाळ टिकत नाही. एखाद्यावर आपण रागावला तरी क्षणभर, क्षमा करणे हे आपले खास वैशिष्टय़ आहे. एखाद्या व्यक्तीने आपले किती नुकसान केले, कितीही त्रास दिला तरी कालांतराने सिंह व्यक्ती त्या गोष्टी विसरून जातात.

आपण स्तुतिप्रिय आहात. पूर्वीच्या राजे लोकांच्या दरबारात सतत खुषमस्करी असायची. तसे आपल्या सभोवतालच्या लोकांनी आपली सतत खुषमस्करी करावी, स्तुती करावी, वाहवा करावी असे आपणाला वाटत असते. प्रेम संबंधात आपण एकनिष्ठ असता. आपल्या अवतीभोवती सतत आपल्याबद्दल गोड बोलणारी, आपले दोष न दाखवणारीही माणसे आपणाला हवीत. आपण दयाळू असता पालक म्हणून आपण अत्यंत आदर्श असता. आपण मातृ-पितृभक्त असता. शासकीय कामात आपणाला यश लाभत असते. थोरामोठय़ांची कृपा लाभते. वरिष्ठांची, वडिलधा-यांची आपणाला सतत मदत मिळत असते. राजकारणात, सार्वजनिक कार्यात व वेगवेगळय़ा शासकीय सेवेत अनेक सिंह व्यक्ती उच्चपद भूषवत असलेल्या दिसतील. आपल्या हातून काही चांगल्या चिरस्थायी गोष्टी व्हाव्यात, आपल्या मागेही आपली कीर्ती राहावी असे आपणाला वाटत असते. कोणतेही काम आपण गतिमानतेने करत असता. स्वभावाने थोडासा रागीट पण आपल्यात असतो. आपण एखाद्यावर निष्ठा ठेवली तर ती निष्ठा शेवटपर्यंत ठेवत असता.
सारांश, स्वच्छ, अंत:करण, निष्कपट स्वभाव, दिलदार व उदार वृत्ती, मान, प्रतिष्ठा व सत्ता यांची अभिलाषा, नेतृत्त्वाची जन्मजात आवड, स्वाभिमानी वृत्ती, स्वातंत्र्याची आवड ही आपली खास वैशिष्टय़े आहेत.

सिंह या राशीमध्ये मघा, पूर्वा, उत्तरा ही तीन नक्षत्र येतात. मघा नक्षत्रातील चारही चरण, पूर्वा नक्षत्रातील चारही चरण व उत्तरा नक्षत्रातील फक्त पहिल्या चरणाचा समावेश सिंह राशीमध्ये होतो.

सिंह रास व मघा नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – सतत उद्योगी, सेवासंपन्न, गौरवर्णयुक्त, महादानी, अतिथीपूजक, काहीवेळा अत्याधिक उतावळे, कोणत्याही गोष्टींचे शिघ्र अनुमान करणारे, नीतीमान ठेवणारे

सिंह रास व पूर्वा नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – भोगी विलासी, ऐश्वर्यसंपन्न, काहीवेळा खíचक स्वभावाचे, व्यवहारकुशल, भिन्न लिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण, धाडसी, अहंकारी, खेळ, क्रीडा यांची आवड.

सिंह रास व उत्तरा नक्षत्रात जन्मलेल्या जातकांची वैशिष्टय़े – मानसन्मान प्राप्त करणारे, धनी, मधुर भाषा असणारे, परिवार, वाहन यांचे सौख्य मिळविणारे, कलाकौशल्यान रुची ठेवणारे.

नक्षत्रानुसार अक्षरज्ञान
मघा नक्षत्र – मा, मी, मू, मे
पूर्वा नक्षत्र – मो, टा, टी, टू
उत्तरा नक्षत्र – टे

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: