ओळख राशींची – कन्या

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,
मेष
वृषभ
मिथुन
कर्क
सिंह
कन्या
तूळ
वृश्चिक
धनू
मकर
कुंभ
मीन

कन्या ही राशी चक्रातील सहावी रास आहे. ही पृथ्वी तत्त्वाची द्विस्वभाव व स्त्री राशी आहे. बुध या ग्रहाचे या राशीवर स्वामित्व आहे. हातात फुलांची फांदी घेतलेली कन्या ही या राशीची प्रतीक आहे.

बुधाच्या अंमलाखालील ही रास असल्याने आपणाकडे ज्ञानाची जिज्ञासा आहे. तसेच कुशाग्र बुद्धिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती, तर्कशुद्ध विचारसरणी या गोष्टी आपणाकडे असतात. कल्पकता, शोधक बुद्धी, नवीन संशोधनाकडे कल, बुद्धिचातुर्य यामुळे विज्ञानात व संशोधनात अनेक कन्या व्यक्तींनी मोलाची भर टाकली आहे. आपण धोरणी व मुत्सद्दी आहात. आपण अगोदर इतरांची मते जाणून घेत असता मात्र आपल्या मनाचा थांगपत्ता आपण सहसा इतरांना लागू देत नाही. थोडीशी आतल्या गाठीची अशी ही रास आहे. आपल्याला अनेक भाषा येऊ शकतात. कोणताही विषय आपल्याला अवघड नसतो. कोणत्याही कामात भावनेच्या भरात झोकून देण्याचा आपला स्वभाव नाही. आपणाकडे हजरजबाबीपणा, वाक्चातुर्य, दूरदर्शीपणा हे गुण निसर्गत: असतात.

मेष, सिंह किंवा वृश्चिक राशींसारखी धडाडी या राशीत नाही किंवा शौर्य, पराक्रम व धाडस याही गोष्टींचा आपणाकडे अभाव असतो. त्यामुळे नेतृत्व किंवा पुढाकार घेण्याचा आपणाकडे अभाव असतो. त्यामुळे पडद्यामागून काम करणे आपल्याला अधिक पसंत असते. ‘किंग’ होण्यापेक्षा ‘किंगमेकर‘ होणे आपणाला अधिक पसंत असते. मात्र आपले निरीक्षण चौफेर व खोलवर असते. प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्मपणे आपण विचार करत असता. प्रत्येक प्रश्नाच्या अनेक बाजू आपणास माहीत असतात. आपणाला एकांतवास व बैठे खेळ अधिक प्रिय असतात. ही वैश्य वृत्तीची रास असल्यामुळे व व्यवहार तिला अधिक समजत असल्यामुळे आपण प्रपंचात यशस्वी होऊ शकता.
आपल्यापैकी काही जणांकडे धूर्तपणा, कावेबाजपणा, मुत्सद्दीपणा अधिक असतो. आपणाकडे काहीतरी गुप्त ठेवण्याची वृत्ती असते. आपल्या स्वभावात मनमोकळेपणाचा अभाव असतो. आपले बोलणे मार्मिक असते. स्वत:च्या फायद्याकडे आपले अधिक लक्ष असते. आपणापैकी अनेकांना इतरांना मार्गदर्शन करणे आवडते. संग्रह करण्याचा आपला स्वभाव आहे. आपणाकडे महत्त्वाकांक्षेचा अभाव असतो. आपल्या राशीत कोमलपणा, विनयशीलता, नम्रता, संकोच, भावनावशता ही वैशिष्टय़े असतात. ही स्त्री राशी व समराशी असल्यामुळे आपल्या राशीत बेगुमानपणा, झुंजारपणा, संघर्षवृत्ती या गोष्टी कमीच आढळून येतात. जिद्द, चिकाटी, सातत्य या गोष्टीत कन्या व्यक्ती कमी पडतात. एका गोष्टीकडून सतत दुस-या गोष्टीकडे वळतात. प्रत्येक विषयांना आत्मसात करता येत असल्यामुळे एका विषयात पूर्ण प्राविण्य मिळविण्या अगोदर दुस-या विषयाकडे धाव घेत असतात. त्यामुळे काहींची एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होते. बुद्धिमत्ता हेच आपले भांडवल असल्यामुळे शारीरिक कष्टाचा आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे परिश्रम टाळण्याकडेच आपला अधिक कल असतो. तसे पाहिले तर ही थोडी दुबळी रास आहे. या राशीत रोगप्रतिकार शक्ती कमी असते.
कन्या ही रास स्त्रियांना अधिक चांगली असते. ही खरी पतिव्रता रास आहे. पतीला देव मानणारी रास आहे. संसार सुखाचा करण्याकडे तिचे लक्ष केंद्रित झालेले असते. पती कसाही असला तरी कन्या स्त्री आपल्या घरातील व्यंग बाहरे सांगणार नाही. कन्या ही निसर्गाची आवडती रास आहे. त्यामुळे कन्या स्त्री-पुरुष आपल्या वयापेक्षा लहान दिसतात. कन्या स्त्रिया शुद्धाचरणाच्या बाबतीत काटेकोर असतात. संयमी व विवेकी असतात.

कन्या या राशीमध्ये उत्तरा, हस्त व चित्रा ही तीन नक्षत्र येतात. उत्तरा नक्षत्रातील शेवटचे तीन चरण, हस्त नक्षत्रातील चारही चरण व चित्रा नक्षत्रातील पहिल्या दोन चरणांचा समावेश कन्या राशीमध्ये होतो.

कन्या रास व उत्तरा नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – तेजस्वी, स्वाभिमानी, रक्तवर्णी, कलेच्या क्षेत्रात कुशल, भौतिक सुख उपभोगणारे, आत्मविश्वासू, नेत्रविकारी, समानतेचे व्यवहार करणारे असतात.

होणार कन्या रास व हस्त नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – अत्याधिक उत्साही, गूढशात्राची आवड असणारे, शांतीप्रिय, विनम्र, विद्वान, धनी, प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असणारे, सौंदर्याचे भोक्ते, काहीवेळा निर्दयी, संतप्त, कामी व मदिरापानप्रिय.

कन्या रास व चित्रा नक्षत्रात जन्मलेल्या जातकांची वैशिष्टय़े – हसतमुख, संवेदनशील, भावूक, सौंदर्यप्रिय, सुगंधाचे शौकीन, धनधान्यसंपन्न, आपली मते गुप्त राखणारे, चतुर, प्रतिष्ठित, रूपवान, लवकर चिडणारे; परंतु लगेच शांतदेखील होणारे.

नक्षत्रानुसार अक्षरज्ञान
उत्तरा नक्षत्र – तो, पा, पी
हस्त नक्षत्र – पू, षा, णा, ठा
चित्रा नक्षत्र – पे, पो

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: