ओळख राशींची – तूळ

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,
मेष
वृषभ
मिथुन
कर्क
सिंह
कन्या
तूळ
वृश्चिक
धनू
मकर
कुंभ
मीन

तूळ ही राशी चक्रातील सातवी रास आहे. ‘तराजुची दोन पारडी’ हे या राशीचे प्रतीक आहे. शुक्र या ग्रहाचे या राशीवर स्वामित्त्व आहे. ही रास सौंदर्याची देवता म्हणून ओळखली जाते. ही पुरुष राशी आहे तसेच रजोगुणी, वायूतत्त्वाची व चर राशी आहे. मनुष्य व प्राणी यामध्ये जर कोणता फरक असेल तर तो हा की, मनुष्य हा बौद्धिक व कलेची भूक असलेली व्यक्ती आहे. नाटक, सिनेमा, रंगभूमी, चित्रपटसृष्टी, नृत्य, काव्य, चित्रकला, शिल्पकला, वास्तूकला, संगीत, कथा, काव्य हे तूळ व्यक्तींचे विशेष आहेत. साहित्य व संगीत याची ज्यांना आवड नाही त्यांची संभावना पंडितांनी पशूत केली आहे. संगीत, वाद्य, चित्रपट व नाटय़ याची मोहिनी तुळा व्यक्तींना जन्मजात असते. तुळा व्यक्ती म्हणजे मानवी जीवनाचे वैभव आहे. जीवन कसे जगावे हे तुळा व्यक्तींना अधिक कळते. सर्वाबरोबर मिळून मिसळून वागण्याची कला, आर्जवी, मधुर व्यक्तिमत्त्व, न्यायाविषयीची आवड व सर्वाबरोबर मिळतेजुळते घेण्याचा स्वभाव यामुळे तुळा व्यक्ती सर्वानाच प्रिय असतात.

सौंदर्याचे, निसर्गाचे खरे रसिक आपणच असता. आपली सौंदर्याची अभिरूची ही अभिजात असते. एखाद्या गाण्याचे, काव्याचे, चित्राचे व शिल्पाचे रसग्रहण आपणच करू शकता. केवळ पैसा व संपत्ती हे आपले ध्येय असत नाही. सुंदर वृक्षराजी, निळे हिरवे डोंगर, विस्तीर्ण जलाशय, सरोवरे, अथांग सागर, आकाशाचे विविध रंग, विस्तीर्ण बागा, मोराचे नृत्य, मधुर संगीत यामुळे वेडे होणारे व त्यात रसिकतेने आकंठ बुडणा-या व्यक्ती म्हणजे तुळा व्यक्ती होत. जीवनातील, काव्यातील, निसर्गातील, साहित्यातील सौंदर्य आपण रसिकतेने टिपता. त्याचा खराखुरा आस्वाद घेता. या सा-याला लागणारी उत्कट मनोवृत्ती, तरल संवेदना व मनस्वी स्वभाव या गोष्टी आपणाला जन्मजात मिळालेल्या आहेत.

नि:पक्षपातीपणा व न्यायाची आवड या गोष्टी आपल्याकडे जन्मजात आहेत. समतोल वृत्तीबद्दल आपण प्रसिद्ध असता. कोणत्याही घटनेत, विचारात व प्रसंगात अटीतटीची भूमिका न घेणे, टोकापर्यंत न ताणणे, दुराग्रही वृत्ती न ठेवणे हा स्वभाव आहे. विक्रमादित्याप्रमाणे न्यायाबद्दल आपण आग्रही असता. आपण समतावादी आहात. स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुभाव ही तत्त्वे आपल्या रोमारोमात भिनली आहेत. ज्याला इंग्रजीमध्ये ‘गोल्डन मीन’ म्हणतात तो आपण नेहमी स्वीकारता. सर्वत्र तडजोड, वैचारिक देवाण-घेवाण, मिळतेजुळते घेण्याची वृत्ती, लोकशाहीवादी वृत्ती, परमताबद्दल सहिष्णुता व आदर, दुस-या व्यक्तीची प्रतिष्ठा सांभाळण्याबद्दल आपला असलेला आग्रह यामुळे सर्वत्र आपले स्वागत होते. आपल्या हातून चुका झाल्या तरी त्या प्रांजलपणे, प्रामाणिकपणे, उघडपणे कबूल करण्याचा मनाचा मोठेपणा आपल्याकडे आहे.
जीवनातील सारी द्वंद्वे व त्यातील सीमारेषा आपणास ठाऊक आहेत. न्याय व अन्याय, सत्य व असत्य, सुंदर व असुंदर, खोटेपणा व खरेपणा यातील सीमारेषा व या सा-यांच्या मर्यादा आपणाला ठाऊक आहेत. आपली रास ही सहवासप्रिय व समाजप्रिय अशी आहे. जीवन कसे जगायचे याची खरी कला आपणालाच उमगलेली असते. जीवनातील ताल व तोल आपण बरोबर सांभाळलेला असतो. कोणत्याही गोष्टीचा साधकबाधकपणे, शांतपणे व चौफेर विचार केल्याशिवाय निर्णय न घेण्याची आपली पद्धत आहे. जीवनातील विसंगतीतून सुसंगती, अस्थिरतेतून स्थिरता, अव्यवस्थेतून सुव्यवस्था या गोष्टी आपण निर्माण करू शकता. सत्यम् शिवम् सुंदरम् या मूल्यावर आपला गाढ विश्वास असतो. मांगल्यावर, सत्यावर, न्यायावर आपली श्रद्धा असते.

आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, आत्मियता व शुद्ध प्रेम याचे आपण भोक्ते असता. श्रीमंत व्यक्तीपेक्षा आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी, दिलदार अंत:करणाची, उदार मनाची माणसे आपणाला हवीत, असे मित्र आपणाला हवेत. अत्यंत न्यायनिष्ठूर अशी आपली रास आहे. त्याचबरोबर गरिबांचे, दीनदुबळय़ांचे अश्रू पुसणारी आपली रास आहे. इतरांच्या सुखात सुख व दुस-यांच्या दु:खात दु:ख मानणारी आपली रास आहे. तूळ ही रास योगी पुरुषाची रास आहे. स्थितप्रज्ञांची रास आहे. आसक्ती व अनासक्ती यातील खरे मर्म आपण ओळखलेले असते. आपल्याकडे श्रद्धा आहे, भक्ती आहे. देहभान विसरून चंद्रभागेच्या वाळवंटावर नामदेव, तुकारामांसारखी नाचणारी भक्तीत रममाण होणारी, ध्येयभान विसरणारी आपली रास आहेत. सुख व दु:ख, आशा व निराशी, जय-पराजय, स्तुती-निंदा, यश-अपयश या दोन्ही प्रसंगी आपली वृत्ती समतोल असतो.
खोटेपणा, मायावीपणा, नकलीपणा, ढोंगीपणा याचा आपणाला टिटकारा आहे. कारुण्याने ओथंबणारी, दुस-याच्या दु:खाने मनात कष्टी होणारी, साधुत्वाची पूजा करणारी आपली रास आहे. कोणत्याही प्रसंगात, संकटात कासवासारखी धीमेपणाने वाटचाल करणारी आपली रास आहे. ब्रह्मदेवाने, विधात्याने अत्यंत कौशल्याने व परिश्रमाने तुळा राशीची निर्मिती केलेली आहे. ताजमहालासारखी, कोहिनूर हि-यासारखी किंवा राजा रवी वर्माच्या कुंचल्यातून निर्माण झालेली कलाकृती म्हणजे तुळा राशी. तुळा राशी म्हणजे मानवी जीवनातील एक मोठे वैभवच आहे. प्रेम, पावित्र्य, सात्त्विकता, शुद्धता, निर्मळता, सुंदरता, आकर्षकता यातून न्हाऊन निघालेली आपली रास आहे. प्रसन्नतेने चमकणारी, आनंदाने कार्य करणारी, आशावादी दृष्टिकोन ठेवून अखिल मानव जातीची सेवा करणारी, मानवतेवर विश्वास ठेवणारी आपली रास आहे. भूतदया, शांती, क्षमाशीलता, प्राणिमात्रावर प्रेम हे सा-या साधुत्वाचे गुण आपल्याकडे आहेत. सार्वजनिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रात ज्या व्यक्ती पुढे आलेल्या आहेत, ज्यांनी कोणत्याही एका क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटवली आहे अशा ब-याचशा व्यक्ती या तूळ राशीच्या आहेत. विशेषत: कला, संगीत, नाटय़ या क्षेत्रामध्ये तुळा व्यक्ती या पुढे आलेल्या आहेत. राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा कलेचे क्षेत्र असो तुळा व्यक्ती या आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या बुद्धिमत्तेमुळे, आपल्या जन्मजात अंगभूत गुणामुळे त्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविल्याशिवाय राहणार नाहीत. कारण तूळ ही रास अत्यंत समाजप्रिय आहे. अनेक गुणांनी समन्वित अशी ही रास आहे. त्यामुळे तुळा व्यक्तींना आपापल्या क्षेत्रात यश हे लाभतेच. सफलता मिळते.

तुळा या राशीमध्ये चित्रा, स्वाती, विशाखा ही तीन नक्षत्र येतात. चित्रा नक्षत्रातील शेवटचे दोन चरण, स्वाती नक्षत्रातील चारही चरण व विशाखा नक्षत्रातील शेवटच्या तीन चरणांचा समावेश तुळा राशीमध्ये होतो.

तुळा रास व चित्रा नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – पराक्रमी, साहसी, बलवान, उत्साही, आर्थिकबाबतीत श्रेष्ठ, सौंदर्यप्रेमी, रूपवान व बलशाली.

तूळ रास व स्वाती नक्षत्रात जन्मलेल्या जातकांची वैशिष्टय़े – सत्त्वगुणी, नीतीमान, चाणाक्षपणा, धूर्त, धार्मिक, विनयशील, रसिक, कलाकौशल्य व सौंदयदृष्टी असणारे, प्रवासाची आवड.

तूळ रास व विशाखा नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – चिडखोर, रसिक पण काहीप्रमाणात उधळय़ा, व्यवहाराची रुची, आकर्षक, प्रभावशाली व्यक्तिमत्त्व, राक्षसगणी त्यामुळे तामसी स्वभाव, काहीवेळा असुरी वृत्ती.

नक्षत्रानुसार अक्षरज्ञान
चित्रा नक्षत्र – रा, री
स्वाती नक्षत्र – रू, रे, रो, ता
विशाखा नक्षत्र – ती, तू, ते

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: