ओळख राशींची – धनू

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,
मेष
वृषभ
मिथुन
कर्क
सिंह
कन्या
तूळ
वृश्चिक
धनू
मकर
कुंभ
मीन

धनू ही राशीचक्रातील नववी रास आहे. ‘अश्वमानव’ हे या राशीचे प्रतीक आहे. या राशीची आकृती म्हणजे कमरेखालील भाग घोडय़ासारखा व कमरेच्या वरील भाग हातात धनुष्य घेऊन शरसंधान करण्याच्या पावित्र्यात असलेला धनुर्धारी होय. ‘गुरू’ या ग्रहाचा या राशीवर अंमल आहे. ही अग्नितत्त्वाची व द्विस्वभावी रास आहे. साधु-संत, ऋषीमुनी, सत्पुरुष, आचार्य, महान योगी या पुरुषांची ही रास आहे. चारित्र्यसंपन्नता, निरलसपणे, नि:स्वार्थीपणे कोणत्याही कार्याला वाहून घेणे हे धनू राशीचे वैशिष्टय़ आहे. त्याचबरोबर प्रामाणिकपणा, सुसंस्कृतपणा, सभ्यता, परोपकारिता या राशीचे वैशिष्टय़ आहे. अनेक मोठमोठय़ा धार्मिक, आध्यात्मिक संस्थेमध्ये निर्मळपणाने काम करणा-या व्यक्ती या धनू राशीच्या असतात.

निष्कपट व निर्मळ स्वभावाबद्दल आपण प्रसिद्ध असता. यामुळे आपले सर्वत्र स्वागत होत असते. व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने अत्यंत प्रसन्न; परंतु सौम्य, भारदस्त असे आपले व्यक्तिमत्त्व असते. तत्त्वाला चिकटून राहण्याचा, कसल्याही प्रसंगात आपले ध्येय न सोडण्याचा आपला स्वभाव असतो. आपण आपल्या मूल्यांशी, आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड करणार नाही. आपल्याकडे सुसंस्कृतता असते, सभ्यता असते, माणुसकी असते. अखिल मानव जातीवर प्रेम करणारी आपली रास आहे. आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये मधुरता व गोडवा असणार. आपल्या बोलण्यामध्ये कधीही असंस्कृतपणा, असभ्यपणा, हलकेपणा, शिवीगाळपणा, बिर्भर्त्सपणा असणार नाही.
आपणाला स्वातंत्र्य प्रिय असते. त्यामुळे आपण इतरांचे मार्गदर्शन घेतले, सल्ला घेतला तरी आपण स्वत:च्या विचारानेच चालणार. माता व पिता यांच्याबद्दल आपणाकडे आदर असतो. मोठमोठय़ा लोकांची, गुरूंची आपण सेवा करत असता. पैशाच्या व आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात आपण अत्यंत चोख असता. आपल्याकडे अप्रामाणिकपणा, लबाडी, दांभिकपणा, मत्सर, हेवा, द्वेष या गोष्टी सापडणार नाहीत. अंत:करणाने आपण दिलदार आहात, दयाळू आहात. आपल्याकडे दानत आहे. वृत्तीने आपण निर्भय आहात, स्पष्टवक्ते आहात. निर्भयपणा व स्वातंत्र्यप्रियता ही आपली स्वभाववैशिष्टय़े आहेत.

मेष, सिंह किंवा वृश्चिक या राशीसारखा आपला स्वभाव उग्र, रागीट किंवा तापट असा नाही. ज्ञानलालसा, स्वातंत्र्यप्रियता व न्यायप्रियता ही आपली वैशिष्टय़े आहेत. एखाद्या महाविद्यालयात प्राध्यापक, एखाद्या धार्मिक संस्थेत अध्यक्ष, संचालक किंवा एखाद्या संस्थेला वाहून घेणारे अशी ब-याच धनू व्यक्तींची स्थिती असते. समाजाचा आपल्या मार्गदर्शनावर, सल्ल्यावर, उपदेशावर विश्वास असतो. समाजाचे मार्गदर्शक, आधारस्तंभ व दीपस्तंभ या दृष्टीने आपणाकडे पाहिले जाते. गरीब, दीनदुबळय़ांविषयी सहानुभूती, सर्वसामान्यांविषयी अपार करुणा, लोकहितासाठी दक्ष असे आपले स्वरूप असते. यामुळे सामाजिक संस्था, हॉस्पिटल, धार्मिक संस्था, प्राण्यांसाठी काम करणा-या संस्था, गोशाळा, वेगवेगळे धार्मिक मठ या ठिकाणी धनू व्यक्ती आजन्म निस्वार्थीपणे काम करत असतात.

उदार, निष्कपटी, निर्मळ व सरळ स्वभावामुळे धनू व्यक्ती या मैत्रीला अत्यंत योग्य असतात. व्यापार, व्यवसाय, बँका याही क्षेत्रात धनू व्यक्ती सचोटीने व प्रामाणिकपणामुळे काम करण्याने पुढे येतात. छोटय़ा छोटय़ा व्यवसायामध्ये धनू व्यक्तींचे मन रमणार नाही. कायदा, न्याय, औषधे, प्रकाशन संस्था, शिक्षण क्षेत्र यामध्ये धनू व्यक्ती अधिक दिसून येतील. धनू राशीच्या स्त्रिया या आचरणाच्या संदर्भात अत्यंत विशुद्ध अशा असतात. चारित्र्यसंपन्न असतात. आजन्म ब्रह्मचारी राहणा-या स्त्री-पुरुषांमध्ये धनू व्यक्ती अधिक आढळून येतील. अनेक धनू व्यक्तींकडे अंतज्र्ञान असते. काही व्यक्ती साक्षात्कारी असतात. भविष्यवादी असतात. उपासना, योगसाधना, सन्यस्थवृत्ती यामुळे काही धनू व्यक्तींना सिद्धी प्राप्त होऊ शकते.

सामान्यत: धनू व्यक्ती आरोग्याच्या संदर्भात नशीबवान असतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक व भव्य असते. वागणे धिरोदत्त असते. धनू व्यक्तींची छाप समाजावर तत्काळ पडते. पोकळ डामडौलापासून व छानछौकीपासून धनू व्यक्ती लांब असतात. नवीन कल्पना, मूलगामी विचार हे धनू व्यक्तींकडे असतात. परंपरा, इतिहास, रूढी, संस्कृती याविषयी धनू व्यक्तींच्या मनात आदर असतो. क्रीडा क्षेत्रातही धनू व्यक्ती आघाडीवर असतात. काही धनू व्यक्ती प्रवचनकार असतात, कीर्तनकार असतात, व्याख्याते असतात, न्यायाधीशपदी असतात. कायदा व सुव्यवस्था या संदर्भात धनू व्यक्ती काटेकोर असतात.

धनू या राशीमध्ये मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा ही तीन नक्षत्र येतात. मूळ नक्षत्रातील चारही चरण, पूर्वाषाढा नक्षत्रातील चारही चरण व उत्तराषाढा नक्षत्रातील पहिल्या चरणाचा समावेश धनू राशीमध्ये होतो.

धनू रास व मूळ नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – सशक्त, दणकट, बलवान, धाडसी, परोपकारी, काहीवेळा उताविळपणा असल्यामुळे घेतलेले
निर्णय चुकण्याची शक्यता असते. एखाद्याला वाईट तर एखाद्याला उच्च पदावर पोहोचवणारे, घमेंडखोर, काहीवेळा आळशी, स्वत:च्या मनाप्रमाणे वागणारे.

धनू रास व पूर्वाषाढा नक्षत्रात जन्मलेल्या जातकांची वैशिष्टय़े – उच्च विचारसरणी, मनमोकळेपणा, ऐश्वर्यसंपन्न, भौतिक सुख भोगणारे, अभिमानी, सहनशील, कार्यकुशल, चतुर, स्वकार्यदक्ष, महत्त्वाकांक्षी, ख्यातीवान.

धनू रास व उत्तराषाढा नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – आदर्शवादी, महत्त्वाकांक्षी, शिक्षणाची आवड असणारे, बुद्धिमानी, उत्तम स्मरणशक्ती, तीव्र इच्छाशक्ती, शांत स्वभावाचे पण कधीकधी अत्यंत रागीट होणारे, आत्मविश्वास, शिस्तप्रिय.

नक्षत्रानुसार अक्षरज्ञान
मूळ नक्षत्र – ये, यो, भा, भी
पूर्वाषाढा नक्षत्र – भू, भा, हा, ढा
उत्तराषाढा नक्षत्र – भे

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: