ओळख राशींची – मकर
आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,
मेष
वृषभ
मिथुन
कर्क
सिंह
कन्या
तूळ
वृश्चिक
धनू
मकर
कुंभ
मीन
मकर ही राशी चक्रातील दहावी रास आहे. ‘खालील अर्धा भाग मगरीसारखा अगर सुसरीसारखा तर वरील अर्धा भाग हरिणासारखा’ हे या राशीचे प्रतीक आहे. मगर व हरिण यांचे संयुक्त रूप असलेली ही रास आहे. ‘शनी’ या ग्रहाचा या राशीवर अंमल आहे. ही अर्थतत्त्वाची व बहुप्रसव रास आहे. तसेच ही चर, स्थिर रास आहे. राशी चक्रामध्ये गुरू व शनी यांच्या राशी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मकर राशीचे स्वामित्व या राशीवर असल्यामुळे आपण शनीप्रधान लोक आहात. शनीचे मुख्य कारकत्व म्हणजे जबाबदारीची व कर्तव्याची जाणीव. अव्याहतपणे, चिकाटीने व अखंडपणे काम करणे हे आपले वैशिष्टय़ असते. आपल्याकडे मोठय़ा प्रमाणावर चिकाटी असते. शनीचा मुख्य गुणधर्म म्हणजे कायद्याचे पालन करणे. कायदा व न्याय या संदर्भात आपण विशेष जागरूक असता. मकर व्यक्ती या अत्यंत काटकसरी, हिशेबी व व्यवहार जाणणा-या असल्यामुळे प्रपंचात व संसारात त्या यशस्वी होतात.

न्याय व अन्याय या बाबतीत तडजोड न करण्याची आपली वृत्ती आहे. कडक शिस्त, व्यवहारीपणा, आर्थिकबाबतीत विशेष जागरूक हे आपले वैशिष्टय़ आहे. शनीकडे संयम आहे, शिस्त आहे, सहनशीलता आहे. विवेक आहे, विचार आहे. व्यवहारचातुर्य आहे. समाजापासून दूर राहण्याची आपली प्रवृत्ती आहे. एकांतवासाकडे आपला अधिक कल आहे. आत्मसंयमन ही आपली शक्ती आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी लागणारे आत्मसंयमन व स्वयंशासन हे आपल्याकडे विशेषत्वाने असते. प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकणे, विचारपूर्वक टाकणे, प्रत्येक विषयाचा साधकबाधक विचार करणे हे आपले वैशिष्टय़ असते. आपल्याकडे प्रामाणिकपणा आहे, न्यायीपणा आहे, कोणत्याही कार्याची, संस्थेची जबाबदारी उचलण्याची आपली मानसिक तयारी असते.
शनी हा लोकशाहीचा पुरस्कर्ता ग्रह आहे. कामगारांवर, शेतक-यांवर, दीन दलितांवर प्रेम करणारा व समाजाकरिता झिजण्याची प्रवृत्ती असलेला हा ग्रह आहे. आपल्याला तत्त्वज्ञानाची आवड आहे. ध्यानधारणा, चिंतन, मनन, व्रतवैकल्य, सन्यस्थ वृत्ती, वैराग्य हे शनीचे महत्त्वाचे कारकत्त्व आहे. कोणतेही कष्ट करण्याची आपली मानसिक तयारी असते. काबाडकष्टाला न कंटाळणारी आपली रास आहे. परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी जी प्रचंड व न थकता, न दमता, न कंटाळता चिकाटीने काम करण्याची जी सवय लागते, ती मकर राशीच्या विद्यार्थ्यांकडे असते. कोणत्याही कामात लवकर न कंटाळणे, न थकणे व दीर्घकाळ काम करणे हे आपले वैशिष्टय़ असते. मोठमोठय़ा संस्थेमध्ये गुप्तपणे काम करणारे लोक लागतात. मोठमोठय़ा संशोधन संस्थेमध्ये किंवा मोठमोठय़ा कार्पोरेट संस्थांमध्ये उच्च अधिका-यांकडे गोपनीयता पाळण्याची मानसिकता असावी लागते अशी मानसिकता आपल्याकडे असते.
भावनेबरोबर वाहून जाणे, मनोविश्वात वावरणे, काल्पनिक जगात वावरणे हे आपल्या स्वभावात बसत नाही. प्रत्येक गोष्टीचा खोल विचार करण्याचा आपला स्वभाव आहे. आपण पुराणमतवादी आहात, सनातनी आहात. जुन्या रूढी व परंपरा, इतिहास यावर आपला विश्वास असतो. आपल्याकडे शुक्रप्रधान व्यक्तींच्या सारखी भोगलालसा नसते, ऐषारामी वृत्ती नसते, विषयासक्ती नसते, चंचलता नसते. केवळ उपभोगासाठी आपला जन्म नाही तर आपणाला काही विशिष्ट कर्तव्य करावयाचे आहे, ध्येय प्राप्त करावयाचे आहे या जाणिवेने आपण काम करत असता. कोणत्याही संस्थेत रचनात्मक, विधायक व सामाजिक काम आपण ध्येयवादीपणाने करू शकता. लोक आपल्याबद्दल काय म्हणतात याकडे लक्ष न देण्याचा आपला स्वभाव आहे. एखादे काम आवडीचे निवडावे व ते काम निष्ठेने व श्रद्धेने करावे हा आपला स्वभाव आहे. भूतकाळात कल्पनाराज्यात, दिवास्वप्नात न रमता वर्तमानकाळात व्यवहार करण्याची आपली प्रवृत्ती असल्यामुळे मकर राशीचे स्त्री-पुरुष संसारात, प्रपंचात व आर्थिक क्षेत्रात यशस्वी होतात.
मकर या राशीमध्ये उत्तराषाढा, श्रवण व धनिष्ठा ही तीन नक्षत्र येतात. उत्तराषाढा नक्षत्रातील शेवटचे तीन चरण, श्रवण नक्षत्रातील चारही चरण व धनिष्ठा नक्षत्रातील पहिल्या तीन चरणांचा समावेश मकर राशीमध्ये होतो.
मकर रास व उत्तराषाढा नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – तेजस्वी, अभिमानी, धनी, विनम्र, सर्वप्रिय, कार्यात सफलता मिळविणारे, लवकर क्रोधित होणारे पण, लवकर शांत देखील होणारे, चांगल्या कामात सहभाग असणारे.
मकर रास व श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या जातकांची वैशिष्टय़े – धार्मिक, विनम्र, सुसंस्कृत, विद्वान, स्वार्थी, चंचल स्वभाव, आज्ञाधारक, थोडासा हट्टी, एकनिश्चयी, कष्टाळू, ईश्वरभक्त, साधूसंतांची सेवा करणारे, प्रामाणिक, काहीवेळा अशांत मन.
मकर रास व धनिष्ठा नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – धनवान, आशावादी, साहसी, संगीतप्रिय, वरून कठोर पण आतून कोमल, हजरजबाबी.
नक्षत्रानुसार अक्षरज्ञान
उत्तराषाढा नक्षत्र – भो, जा, जी
श्रवण नक्षत्र – खी, खू, खे, खो
धनिष्ठा नक्षत्र – गा, गी
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)