ओळख राशींची – कुंभ
आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,
मेष
वृषभ
मिथुन
कर्क
सिंह
कन्या
तूळ
वृश्चिक
धनू
मकर
कुंभ
मीन

कुंभ ही राशीचक्रातील अकरावी रास आहे. ‘खांद्यावर घागर घेऊन पाण्याच्या शोधार्थ निघालेला व विचारात पडलेला पुरुष’ हे या राशीचे प्रतीक आहे. पाश्चिमात्त्यांच्या मते घागरीतील पाणी ओतत असलेला मानव हे या राशीचे प्रतीक आहे. ‘कुंभ’ याचा अर्थ घडा व तो ज्ञानाचा घडा आहे. ज्ञानरूपी पाण्याचा शोध घेणारी अशी ही रास आहे. शनी या ग्रहाच्या स्वामित्वाखालील ही रास आहे. उच्च प्रतीची ज्ञानलालसा हे या राशीचे वैशिष्टय़ आहे. ज्ञानाचा सतत शोध व प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाणे. प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करणे हे आपल्या राशीचे वैशिष्टय़ आहे. आपल्यावर उच्च ध्येयाचे, थोर विचारांचे व तत्त्वज्ञानाचे संस्कार झालेले असतात. संशोधन कार्यात, शास्त्रीय संशोधनात कुंभ व्यक्ती विशेष आढळून येतात. प्रामाणिकपणा हे कुंभ राशीचे विशेष वैशिष्टय़ आहे.
कोणतेही काम मनापासून करायचे ही आपली वृत्ती असते. मानवतेची पूजा करणारी ही रास आहे. जनसामान्यांवर प्रेम करणारी ही रास आहे. या राशीचे वैशिष्टय़ म्हणजे एका बाजूला ही रास परंपरेची पूजक असलेली रास आहे. आध्यात्मिक वृत्तीची ही रास आहे. ईश्वरावर श्रद्धा असलेली ही रास आहे तर दुस-या बाजूला आपल्याला विज्ञानाची आवड आहे, संशोधनाची आवड आहे. एका बाजूला आपण श्रद्धावान आहात तर दुस-या बाजूला प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करून आपण निर्णय घेत असता. मानवतेवर, ध्येयावर व देशावर निष्ठा असणारी आपली रास आहे. जीवनाकडे गंभीरपणाने पाहणारी आपली रास आहे.
मैत्रीला आपली रास अत्यंत चांगली असते. आपल्याकडे प्रामाणिकपणा असतो, सुस्वभावीपणा असतो. आपले अंत:करण उदार असते. दिलदारपणे कोणालाही संकटात मदत करण्याची आपली प्रवृत्ती असते. आपल्याकडे संयम आहे, विवेक आहे. प्राध्यापक, लेखक, शात्रज्ञ, संशोधक, पत्रकार, डॉक्टर्स, समीक्षक या क्षेत्रात कुंभ व्यक्ती अधिक आढळून येतात. सॉलिसिटर, अॅडव्होकेट, न्यायाधीश, विधी व न्याय या विषयावर लेखन करणा-या कुंभ व्यक्ती अधिक असतात. कायद्याच्या ज्ञानासाठी लागणारा चौफेरपणा, खोलपणा, एकाग्रता, प्रत्येक गोष्टीत तपशिलाचा अभ्यास करण्याची वृत्ती यामुळे कायद्याच्या क्षेत्रात कुंभ व्यक्ती यशस्वी होतात.
उच्च संशोधन, अंतराळ क्षेत्र व संशोधनाची विविध क्षेत्रे यामध्ये कुंभ व्यक्ती अधिक आढळून येतील. कुंभ व्यक्ती सवंग लोकप्रियतेच्या आहारी जाणार नाहीत. एकांतात आपल्या आवडीचे कार्य करणे, निष्ठेने व श्रद्धेने संशोधन करणे हे कुंभ व्यक्तींना अधिक आवडत असते. संपत्ती, पैसा यापेक्षा बौद्धिक गोष्टींना आपण विशेष प्राधान्य देत असता. शनीचा या राशीवर अंमल असल्यामुळे शनीचे अनेक चांगले गुण या राशीत असतात. या राशीमध्ये स्वार्थ फार कमी आहे. संकुचितपणा, स्वार्थी वृत्ती या गोष्टी कुंभ राशीकडे कमी असतात. कुंभ व्यक्ती प्रत्येक गोष्टीचा स्वत: निर्णय घेत असतात. इतरांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडत नाही. एका दृष्टीने कुंभ व्यक्ती स्वयंभू असतात. विषयवासना, इंद्रीयजन्य सुखे, ऐषाराम या गोष्टींचा कुंभ व्यक्तींना तिटकारा असतो.
मनापासून प्रेम करणे, नि:स्वार्थी प्रेम करणे यामुळे आपला मित्र परिवार खूप मोठा असतो. आपले प्रेमसंबंध हे अधिक टिकाऊ असतात. आपली मते इतरांवर न लादण्याचा आपला स्वभाव असतो. आपण लोकशाहीवादी असता. प्रत्येकाचा दृष्टिकोन समजावून घेण्याकडे आपला कल असतो.
कुंभ या राशीमध्ये धनिष्ठा, शततारका व पूर्वा भाद्रपदा ही तीन नक्षत्र येतात. धनिष्ठा नक्षत्रातील शेवटची दोन चरणे, शततारका नक्षत्रातील चारही चरण व पूर्वा भाद्रपदा नक्षत्रातील शेवटच्या तीन चरणांचा समावेश कुंभ राशीमध्ये होतो.
कुंभ रास व धनिष्ठा नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – अनेक मार्गानी धनार्जन करून सुखी राहणारे, महत्त्वाकांक्षी, साहसी, धनामध्ये वृद्धी करणारे, संगीताची आवड असणारे वाक्शक्तीयुक्त, हजरजबाबी, अफाट बुद्धिमत्ता.
कुंभ रास व शततारका नक्षत्रात जन्मलेल्या जातकांची वैशिष्टय़े – वर्तमानाला जास्त महत्त्व देणारे, महत्त्वाकांक्षी, चिकित्सक, चौकस, कर्तृत्त्ववान, स्वतंत्र, जास्त विचार करणारे, काहीवेळा धरसोड वृत्ती, मदिरापान करणारे.
कुंभ रास व पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – स्नेहपूर्ण, विद्याव्यासंगी, भावुक, प्रगल्भता लाभलेले, मृदू, धनवान, सदाचारी, आध्यात्मिक वृत्ती, ज्योतिषशात्राची आवड.
नक्षत्रानुसार अक्षरज्ञान
धनिष्ठा नक्षत्र – गू, गे
शततारका नक्षत्र – गो, सा, सी, सू
पूर्वा भाद्रपदा नक्षत्र – से, सो, दा
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)