ओळख राशींची – मीन
आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,
मेष
वृषभ
मिथुन
कर्क
सिंह
कन्या
तूळ
वृश्चिक
धनू
मकर
कुंभ
मीन

मीन ही राशीचक्रातील शेवटची बारावी रास आहे. ही बहुप्रसव, द्विस्वभाव व स्त्री रास आहे. गुरू या ग्रहाच्या अमलाखालील ही रास आहे. देवाधर्माची, साधुसंतांची, ऋषिमुनींची अत्यंत मनोभावे, उत्कटतेने, श्रद्धेने पूजाअर्चा करणा-यांची ही रास आहे. भावनाप्रधानता व भावुकता ही आपल्या राशीची वैशिष्टय़े आहेत.
विरुद्ध दिशेला तोंड असलेले दोन मासे हे मीन राशीचे प्रतीक आहेत. म्हणून ही राशी द्विस्वभाव आहे. परस्परविरोधी माशांची तोंडे असल्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हा अत्यंत गुंतागुंतीचा बनलेला असतो. ही द्विस्वभाव राशी असल्यामुळे आशा-निराशा, यश-अपयश व विविध विचारांची उलटसुलट आंदोलने आपल्या मनात सतत सालू असतात. दोन लंबकांमध्ये आपले मन सतत हेलकावे खात असते. मुक्या प्राण्यांविषयी, गोरगरिबांविषयी, दीनदुबळय़ांविषयी आपल्या मनात एक प्रकारची कणव असते, दया असते. भूतदयेने प्रेरित होऊन अनाथ लोकांना मदत करण्यात आपला पुढाकार असतो. आपल्यापैकी अनेकांच्या चेह-यावर सात्त्विक तेज असते. प्रसन्नपणा असतो, शांतपणा असतो. चेह-यावर उदात्ततेची व भव्यतेची झाक असते. आपण अधिक भावनाप्रधान व हळवे आहात. दयाळू, मायाळू व ममताळू आहात. वृत्तीने प्रेमळ आहात. भांडणतंटा न करता सर्वाशी जुळवून घेऊन गोडीगुलाबीने राहण्याचा आपला स्वभाव असतो. आपण आदर्शवादी असता. परमेश्वराच्या गूढ शक्तीबद्दल आपल्या मनात खूप आकर्षण असते. त्यामुळे धर्मग्रंथ, पुराणे, गूढशात्रे, जप-तप, व्रतवैकल्ये, पूजा-अर्चा, मंत्र-तंत्र, तंत्र-विधी याकडे आपला विशेष ओढा असतो. साहित्य, संगीत, पोथ्या-पुराणे, कीर्तन, भजन, प्रवचन यांची आपणास विशेष आवड असते. आपण आत्यंतिक भावनाप्रधान असल्यामुळे कोणत्याही प्रश्नाचा निर्णय विचारापेक्षा भावनेनेच घेण्याचा आपला स्वभाव असतो. मेंदूपेक्षा हृदयाचेच वर्चस्व आपल्यावर अधिक असते. इतर राशींच्या पेक्षा आपल्याकडे कोमलपणा, मवाळपणा, नाजूकपणा, हळवेपणा अधिक आहे. कन्या, मिथुन व कुंभ किंवा मेष, सिंह व वृश्चिक राशीप्रमाणे बेडर व साहसीही नव्हे, अशी आपली रास आहे.
आपल्या राशीत नम्रता आहे. विनयशीलता, शालिनता, सभ्यता व सुसंस्कृतता आहे. आपल्याकडे मनाचा निर्मळपणा, प्रांजळपणा व निष्कपटपणा आहे. दया, क्षमा, शांती व भूतदया यांनी प्रेरित होऊन व ‘याची देही याचि डोळा’ परमेश्वराला प्राप्त करून घेणा-या संत तुकारामांची ही रास आहे तर देशासाठी, स्वातंत्र्यासाठी सर्व ऐहिक सुखाचे बलिदान करणा-या लो. टिळकांची ही रास आहे. आपल्यापैकी अनेकजण साधू, संत, आचार्य, गुरू, तपस्वी, ऋषिमुनी यांच्या शोधात असतात. अनेकांना मनापासून मदत करण्याच्या आपल्या सवयीमुळे आपला मित्र परिवार खूप मोठा असतो. उच्च, सुसंस्कृत, निर्मळ, स्वभावामुळे आपले सर्वत्र स्वागत होत असते. बहुतेक अनेक मध्यमवर्गातील पापभीरू, बुद्धिमान व सुशिक्षित वर्ग या राशीच्या अमलाखाली येतो. शासकीय खात्यातील कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, दलाल, हिशेब तपासनीस, प्रवचनकार, पुरोहित, कीर्तनकार, न्याय खात्यात व हॉस्पिटलमधील कामगार, प्रवासी कंपन्यातील कर्मचारी, शेअर ब्रोकर, दूध – मिठाई, शीतपेये यावर उपजीविका करणा-या व्यक्ती यांचा या राशीत अंतर्भाव होतो.
मीन या राशीमध्ये पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा व रेवती ही तीन नक्षत्र येतात. पूर्वा भाद्रपदा नक्षत्रातील शेवटचे एक चरण, उत्तरा भाद्रपदा नक्षत्रातील चारही चरण व रेवती नक्षत्रातील चारणी चरणांचा समावेश मीन राशीमध्ये होतो.
मीन रास व पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – विद्वान, धनी, धार्मिक प्रवृत्तीचे, मधुर भाषी, सरळ व सौम्य, सात्त्विक, व्यवहारकुशल, काही प्रमाणात भयभीत, मानसिक व्याधीनेयुक्त, पोटाचे विकार असलेले.
मीन रास व उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात जन्मलेल्या जातकांची वैशिष्टय़े – न्यायप्रिय, मेहनती, त्यागी, महत्त्वाकांक्षी, ध्यान व योगात रस असणारे, श्रद्धाळू, सुसंगत व तर्कशुद्ध बोलणारे, शत्रूंवर विजय प्राप्त करणारे, धनधान्य संपन्न.
मीन रास व रेवती नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – उत्तम स्मरणशक्ती असणारे, नशीबवान, सत्यप्रिय, न्यायी, परोपकारी, कुशाग्रबुद्धी, भाग्यशाली, कायदे जाणणारे, सत्त्वगुणी, उत्तम आरोग्य लाभलेले, काही वेळा मानसिक विकार.
नक्षत्रानुसार अक्षर
पूर्वा भाद्रपदा नक्षत्र – दी
उत्तरा भाद्रपदा नक्षत्र – दू, झा, ज्ञा, था
रेवती नक्षत्र – दे, दो, चा, ची
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)