लेकीस पत्र ❤️

मुळ लेखक – चार्ली चॅप्लीन
मराठी अनुवाद – पृथ्वीराज तौर

प्रिय मुली,
ही रात्रीची वेळ आहे.
नाताळची रात्र.
माझ्या या घरातील सगळी लूटूपूटूची भांडणं झोपली आहेत.
तुझे भाऊ-बहीन झोपेच्या कुशीत शिरले आहेत.
तुझी आईही झोपी गेलीय.
पण मी अजुनही जागा आहे.
खोलीत मंद प्रकाश साकळतोय.
तू किती दूर आहेस माझ्यापासून पण विश्वास ठेव, ज्यादिवशी तुझा चेहरा माझ्या डोळ्यांपुढं तरळणार नाही, त्या दिवशी आंधळं होऊन जाण्याची माझी इच्छा असेल.
तुझा फोटो तिथं टेबलवर आहे आणि इथं ह्रदयातही.
पण तू कूठं आहेस?
तिथं, स्वप्नांसारख्या पॅरिस शहरात!
तू चॅम्प्स एलीसिसच्या भव्य रंगमंचावर नृत्य करत असशील.
रात्रीच्या या शांततेत मला तुझ्या पावलांचा आवाज येकू येतोय.
हिवाळ्यातील आकाशात असणाऱ्या चांदण्यांची चमक, मी तुझ्या डोळ्यांत पाहू शकतो.
असं लावण्य, असं सुंदर नृत्य, तू तारा होऊन अशीच चमकत रहा.
पण
जेव्हा प्रेक्षकांचा उत्साह आणि त्यांनी वाहिलेली स्तूतीसुमनं यांची नशा येऊ लागेल आणि त्यांनी भेटीदाखल दिलेल्या फुलांचा सुगंध तुझ्या डोक्यात शिरु लागेल
तेव्हा
गुपचूप एखाद्या कोपऱ्यात बसून तू माझं हे पत्र वाच.
आणि आपल्या ह्रदयाचा आवाज ऐक.
मी तुझा बाप आहे जिरल्डाइन,
मी चार्ली, चार्ली चॅप्लीन.
तुला आठवतं का?
जेव्हा तू खूप लहान होतीस तेव्हा तुझ्या उशाशी बसून मी तुला ‘झोपणाऱ्या परी’ची गोष्ट ऐकवायचो.
पोरी, मी तुझ्या स्वप्नांचा साक्षीदार आहे.
मी तुझं भविष्य पाहिलं आहे…
रंगमंचावर नृत्य करणारी एक मुलगी, जणू आभाळातून उडणारी एखादी परी.
लोकांच्या टाळ्यांच्या आवाजात मला हे शब्द ऐकू येतात, ‘या मुलीला बघीतलत का, ती एका म्हाताऱ्या विदूषकाची मुलगी आहे. तुम्हाला आठवतं का त्याचं नाव चार्ली होतं.’
हो! मी चार्ली आहे!! एक म्हातारा विदूषक!!!
आणि आता तुझी वेळ आहे.
मी फाटून जीर्ण झालेल्या पॅंटमध्ये नाचायचो.
आणि माझी राजकुमारी! तू सूंदर रेशमी पोषाखात नृत्य करतेस.
हे नृत्य, या टाळ्या, तुला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जातील.
उंच जा, खूप उंच जा – पण लक्षात ठेव की तुझी पावलं नेहमीच जमिनीवर असली पाहिजेत.
तू लोकांचं जगणं जवळून बघायला हवं –
छोट्या छोट्या गल्यांमध्ये, बाजारांमध्ये नाचणाऱ्या नर्तकांना तू जवळून बघ, ते गोठवणाऱ्या थंडीत भूकेनं तडफडताहेत.
मी ही त्यांच्यातलाच होतो, जिरल्डाइन!
त्या जादूच्या रात्री जेव्हा मी तुला अंगाई म्हणवून झोपी घालत असे
आणि तू झोपेच्या डोहात उतरत जायचीस
तेव्हा मी जागा असे, टक्क जागा.
मी तुझा चेहरा बघायचो, तुझ्या काळजाचे ठोके ऐकायचो.
आणि विचार करायचो, ‘चार्ली ! ही पोरगी तुला कधी ओळखू शकेल का?’
तुला माझ्याबद्दल फारशी माहिती नाहिय, जिरल्डाइन!
मी तुला हजारो गोष्टी ऐकवल्या, पण ‘त्याची’ गोष्ट कधीच सांगितली नाही.
ही कहाणीही तितकीच ऐकण्यासारखी आहे.
ही त्या भुकेल्या विदूषकाची गोष्ट आहे, जो लंडनच्या गरिब वस्त्यांमध्ये नाचत- गाणं म्हणत पोटापुरतं मिळवायचा.
ही माझी गोष्ट्य.
मला ठाऊक आहे पोटाची भूक म्हणतात, ती काय असते.
मला माहितय ‘डोक्यावर छत नसणे’ या शब्दांचा अर्थ काय आहे.
मदतीसाठी तुमच्याकडे फेकलेल्या नाण्यांतून आपल्या स्वाभीमानाची चाळण होतांना मी अनुभवली आहे. आणि तरिही मी जिवंत आहे.
असो, ही गोष्ट इथेच सोडू.
तुझ्याबद्दलच बोलणं जास्त उचीत राहिल, जिरल्डाइन.
तुझ्या नावानंतर माझं नाव येतं…… चॅप्लीन.
या नाव घेऊन मी चाळीस पेक्षा जास्त वर्षे लोकांचं मनोरंजन केलं आहे.
पण हसण्यापेक्षा मी जास्त रडलो आहे.
ज्या जगात तू राहातेस तिथं नाच-गाण्याव्यतिरीक्त काहीच नाहीय.
अर्ध्या रात्रीनंतर जेव्हा तू थिएटरच्या बाहेर येशील
तेव्हा तू तुझ्या समृद्ध आणि संपन्न चाहत्यांना विसरू शकतेस.
पण
ज्या टॅक्सीत बसून तू घरी जाशील, त्या टॅक्सी ड्रायव्हरला हे विचारायला विसरू नकोस की त्याची बायको कशी आहे?
जर ती गर्भार असेल तर जन्म घेणाऱ्या बाळासाठी, त्याच्या कपड्यांसाठी आणि औषधासाठी त्याच्याकडे पैसे आहेत काय?
त्याच्या खिशात थोडे अधिकचे पैसे टाकायला विसरू नकोस.
मी तुझ्या खर्चासाठी तुझ्या बॅंक खात्यावर काही रक्कम भरली आहे,
खर्च करताना नेहमी विचार कर.
कधी कधी बसमधून प्रवास कर,
छोट्या छोट्या रस्त्यानं प्रवास कर,
कधी कधी पायाखाली शहराचे रस्ते तुडव.
लोकांकडं ध्यान देऊन बघ.
अनाथांप्रति दया ठेव.
आणि दिवसातून एकदा तरी स्वतःला हे नक्की सांग की, ‘मी सुद्धा त्यांच्या सारखीच आहे.’
हो, तू ही त्यांच्यातलीच एक आहेस पोरी.
कोणत्याही कलावंताला त्याचे पंख देण्याअगोदर कला त्याच्या पावलांना रक्ताळवत असते.
जेव्हा तुला एखाद्या दिवशी असं वाटेल की तू तुझ्या प्रेक्षकांपेक्षा मोठी आहेस तर त्याच दिवशी
रंगमंच सोडून पळ काढ.
टॅक्सी पकड आणि पॅरिसच्या कुठल्याही गल्लीबोळात जा.
मला माहितीय तिथं तुला तुझ्यासारख्या कितीतरी नर्तकी भेटतील –
तुझ्यापेक्षाही जास्त सूंदर आणि प्रतिभासंपन्न.
अंतर फक्त ऐवढचंय की त्यांच्याजवळ थियटरचा झगमगाट नाही,
त्यांच्याजवळ चमचम करणारा उजेड नाही.
ते चंद्रप्रकाश हाच त्यांचा सर्च लाईट आहे.
जर तुला वाटलं की यातील एखादी जरी तुझ्यापेक्षा चांगलं नृत्य करतेय तर नृत्य करणं सोडून दे.
नेहमीच कुणी ना कूणी अधीक चांगलं असतं, हे लक्षात घे.
सतत पूढे जात राहाणं आणि सतत शिकत राहाणं म्हणजेच तर कला आहे.
मी मरून जाईल, तू जिवंत राहशील.
मला वाटतं तुला कधीही गरीबीचा स्पर्श होऊ नये.
या पत्रासोबत मी तुला चेकबूकही पाठवतोय, म्हणजे तुला मनासारखा खर्च करता येईल.
पण दोन नाणी खर्च केल्यानंतर हा विचार कर की तुझ्या हातात असणारं तिसरं नाणं तुझं नाहीय –
ते त्या अनोळखी माणसाचं आहे, ज्याची त्याला खूप खूप गरज आहे.
असा माणूस तू सहज शोधू शकतेस, फक्त आजूबाजुला चौकस नजर टाकली पाहिजे.
मी पैशांबद्दल बोलतोय कारण मला पैश्यांची राक्षसी शक्ती परिचीतय.
होऊ शकतं एखाद्या दिवशी कुणी राजकुमार तुझ्यावर भाळेल!
बाहेरचं रंगीन जग पाहून आपलं सुंदर काळीज कुणाला देऊ नकोस.
लक्षात घे जगातला सगळ्यात मौल्यवान हिरा हा सूर्य आहे, जो सगळ्यांसाठी प्रकाशतो.
आणि हो, जेव्हा एखाद्यावर प्रेम करशील तेव्हा काळजाच्या देठापासून प्रेम कर.
मी तुझ्या आईला याबद्दल तुला पत्र लिहायला सांगितलं आहे,
प्रेमाच्या बाबतीत तिला माझ्यापेक्षा जरा जास्त कळतं.
मला हे ठाऊक आहे की बाप आणि त्याच्या लेकरांत नेहमीच एक तणाव असतो.
पण विश्वास ठेव
मला फार आज्ञाधारक मुलंही आवडत नाहीत.
मला वाटतं या नाताळच्या रात्री एखादा चमत्कार व्हावा, म्हणजे मला तुला जे सांगायचंय ते तुला नीट समजून येईल.
चार्ली आता म्हातारा झालाय जिरल्डाइन.
कधी ना कधी, शोकमग्न काळ्या कपड्यात तुला माझ्या कबरीवर यावं लागेल.
मी तुला विचलित करू इच्छीत नाही
पण वेळोवेळी स्वतःला आरशात बघ, तुला माझंच प्रतिबींब त्यात दिसेल.
तुझ्या धमण्यात माझंच तर रक्त वाहतय.
जेव्हा माझ्या धमण्यातील रक्त गोठून जाईल तेव्हा तुझ्या धमण्यांतून वाहणारं रक्त तुला माझी आठवण करून देईल.
हे लक्षात ठेव की तुझा बाप कुणी देवदूत नव्हता, कूणी महात्मा नव्हता, तर तो नेहमीच एक चांगला माणूस होण्यासाठी धडपडत राहिला.
तू ही असाच प्रयत्न करावास, ही माझी इच्छा आहे.
खूप सगळ्या प्रेमासह..

चार्ली..

(चार्ली चॅप्लीन यांनी आपल्या मुलीला जिरल्डाइन ला हे पत्र लिहिले आहे. जिरल्डाइन या एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ‘डॉ. झिवागो’ या कादंबरीवरील त्याच शिर्षकाच्या चित्रपटातील त्यांचा अभिनय संस्मरणीय आहे. अनुवादक डॉ. पृथ्वीराज तौर हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक आहेत.)

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

One thought on “लेकीस पत्र ❤️

Leave a Reply to hemanta/s krishnakumar sunderrao pradhanshivajinagar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: