Ctrl Z
एका ज्येष्ठ नागरिकास कम्प्युटर शिकणे आहे.
इच्छुक तरुणांनी संपर्क साधावा. फोन: XXXXXX

वृत्तपत्राच्या आतल्या पानावरील या छोट्याश्या चौकटीने माझे लक्ष वेधले. सुट्टीची सकाळ होती. चहाचा कप बाजूला ठेवत मी पेपरची घडी नीट केली. तीच चौकट पुन्हा एकदा डोळ्याखालून घातली. नजर त्या चौकटीवर होती पण मनात निरनिराळे विचार येत होते. नक्की काय प्रकार असेल? फोन करावा का? इतक्या म्हातारपणी कम्प्युटर शिकून काय करणार हे आजोबा / आजी ? की आपला नंबर काबीज करण्यासाठी ‘मार्केटिंग’वाल्यांची ही एक नवी युक्ती?….फोन करून तर बघूया…म्हणत मोबाईल उचलला. नंबर फिरवला. दुसऱ्या हाताने चहाचा कप उचलला आणि एक घोट घेतला. गरम चहा थंड होण्याइतपत आपण विचार करत होतो, हे लक्षात येईस्तोवर समोरून एका आजोबांचा (हे माझं गृहीतक !) खणखणीत आवाज आला.
‘नमस्कार…सबनीस बोलतोय !’
‘नमस्कार काका ! ‘कम्प्युटर शिकणे आहे’ ही जाहिरात तुम्हीच…’
‘हो हो ! बोला बोला…तुम्हाला जमेल मला शिकवायला?’
‘तुम्हाला काय शिकायचंय त्यावर सांगू शकेन.’
‘इंटरनेट, इमेल, आणि तुमचं काय असतं ते…सोशल मिडिया वगैरे !’
‘इतकंच ना ! अहो, शिकवायचंय काय त्यात ! एक दिवसाचं काम आहे ते !’ मार्क झुकरबर्ग देखील इतक्या आत्मविश्वासाने बोलत नसेल.
‘वा वा ! माझा पत्ता लिहून घ्या. आज संध्याकाळी ५ वाजता जमेल?’
‘सबनीस’ अशी दारावर पाटी. मी बेल वाजवली.
दार उघडणारी अनोळखी व्यक्ती कशी दिसत असेल, याची उत्सुकता मला नेहमीच असते. फोनवरचा आवाज ऐकून, किंवा एखादं नाव ऐकून अनेकदा आपण मनातल्या मनात एक चेहरा तयार केलेला असतो. दरवाजा उघडला. सबनीस बऱ्यापैकी ‘सबनीसां’सारखे दिसत होते. हसून ‘या’ म्हणत त्यांनी मला घरात घेतलं. घर अपेक्षेहून मोठं होतं. घरातल्या प्रत्येक वस्तूवर श्रीमंतीची मोहर होती.
‘माफ करा. आज सकाळी तुमचं नाव विचारायचंच विसरलो.’ हातून काहीतरी अपराध घडल्याच्या अविर्भावात सबनीस म्हणाले.
मी माझं नाव सांगितलं. ते उगाचंच ‘व्वा’ म्हणाले.
‘माझी मुलगी लग्न होऊन अमेरिकेला असते. तिच्याशी संपर्कात राहण्यासाठी हे सगळं शिकणं जरुरी वाटलं.’ थेट विषयाला हात घालत सबनीस म्हणाले.
‘ओके…. सुरु करू या ?’….
‘ओके’ वर क्लिक करू का?’
‘अहो, करा ना ! मला काय विचारताय?’
‘तसं नाही हो..उगीच आपण कशावर तरी क्लिक करायचो आणि कम्प्युटर बिघडून जायचा !’
‘काका, तुम्हाला एक ‘थंबरूल’ सांगून ठेवतो. कम्प्युटरवर काही ठराविक गोष्टी करताना आपण चुकलोय असं वाटलं की ही ‘कंट्रोल की’ आणि ही ‘झेड की’ एकत्र दाबायची. याला ‘कंट्रोल झेड’ म्हणतात. या दोन्ही कीज एकत्र दाबल्यावर आपण केलेली चूक सुधारून आधी होतो त्या जागेवर परत जातो. थोडक्यात ‘अन-डू’ करायचं. किंवा कम्प्युटर काय काय सांगतोय, काय विचारतोय याकडे लक्ष ठेवायचं. तुम्हाला एखाद्या कृतीबद्दल आत्मविश्वास नसेल तर कम्प्युटर विचारेल तेव्हा ‘cancel’ म्हणायचं. अहो काका, बिनधास्त खेळा त्या कम्प्युटरशी. काही होत नाही त्याला. तुम्ही कितीही बिघडवायचा प्रयत्न केलात तरी तो बिघडत नाही. फार सज्जन माणूस आहे तो ! हां, म्हणजे तुम्हीच त्या लॅपटॉपवर एक हातोडा घातलात…तरच काय तो बिघडेल…’
‘हा आमच्या वयाचा दोष. हे प्रॉब्लेम्स तुम्हाला आत्ता नाही कळणार. आता बिअरसुद्धा फुंकून पितो आम्ही !’ सबनीस जोरात हसले.
दर रविवारी संध्याकाळी पाच वाजता मी सबनीस काकांकडे जात असे. इमेल, यु ट्यूब, वगैरे गोष्टी पाहून सबनीस काकांना अलिबाबाची गुहा सापडल्याचा आनंद झाला होता. नाही म्हणायला अधूनमधून ते फेसबुकवर दिसत. तीन-साडेतीन महिन्यात सबनीस काका बऱ्यापैकी पारंगत झाले होते. मला बरं वाटलं. फक्त एक गोष्ट मनातून जात नव्हती. माझे दहा-बारा रविवार मी त्यांच्यासाठी खर्च केले होते.एक औपचरिकता म्हणून तरी, काकांनी माझी ‘फी’ विचारायला हवी होती. अर्थात मी ‘फी’ घेणार नव्हतो..पण तरी……
शेवटी मी तो विषय मनातून काढून टाकला आणि माझ्या उद्योगाला लागलो.
एक दिवस इनबॉक्समध्ये बघतो तर चक्क सबनीस काकांचा इमेल. खास माझ्यासाठी लिहिलेला.
प्रिय मित्रा,
सबनीस काकांचा इमेल ! तोही चक्क मराठीत ! माझा मराठीतील इमेल पाहून तू कदाचित चक्रावून गेला असशील.
माझ्या डायरीतील नोंदीनुसार ‘मराठी टायपिंग आणि इमेल’चा धडा बरोब्बर एक वर्षापूर्वी याच तारखेला झाला होता. या विद्यार्थ्याने केलेली प्रगती ‘बरी’ या वर्गात मोडत असेल तरी मला खूप आनंद होईल. तेव्हा कृपया मास्तरांनी त्यांचे मार्क आणि अभिप्राय कळवला तर या पामरास खूप आनंद होईल. असो.
गेले सहा महिने तुझे ‘सबनीस काका’ त्यांच्या मुलीकडे – म्हणजे अमेरिकेत – राहायला आले आहेत. आता भारतात परत कधी येईन माहित नाही. माझी कम्प्युटरमधली प्रगती पाहून माझी मुलगी आणि जावई इतके खूष झाले की विचारू नकोस. मी लगेच माझ्या ‘कम्प्युटर गुरुजींचं’ नाव सांगितलं. असो. तुला thanks वगैरे म्हणून आपल्या मैत्रीमधील अंतर कमी करू इच्छित नाही. पण या मैत्रीचा दाखला देत आहे, तर आज काही गोष्टी अगदी मनमोकळेपणाने सांगणार आहे. त्यावेळी सांगायचा कधी धीर झाला नव्हता. तू समजून घेशील अशी आशा आहे.
मी मूळात एक निवृत्त सरकारी अधिकारी. अतिशय नावाजलेल्या सरकारी कंपनीतून सर्वोच्च पदावरून निवृत्त झालो. संपूर्ण कारकिर्दीत एकही काळा पैसा कमावला नाही, हे मी गौरवाने सांगू शकतो. ऑफिसमध्ये माझी प्रतिमा जितकी स्वच्छ तितकीच एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून नावाजलेली. हळहळू त्या शिस्तीची मला एक नशा येऊ लागली. सरकारी कचेऱ्या म्हणजे काय, याची तुला कल्पना असेलच. इथे तर शिस्तीच्या बाबतीत आनंदच होता. वेळेची शिस्त, कामातली शिस्त यांच्या नावाखाली मी लोकांना किड्यामुंगीप्रमाणे वागवू लागलो. पदोपदी त्यांचा अपमान करू लागलो. माणसं मला घाबरतात याची मला आतून एक ‘किक’ मिळत असे. लोकांवर तोंडसुख घेतल्याशिवाय माझा दिवस सरत नसे. ‘माझंच चारित्र्य काय ते स्वच्छ’ या समजुतीने माझ्यातला अहंकार दिवसेंदिवस फुलत होता. याची सावली अर्थातच माझ्या वैयक्तिक आयुष्यावर पडत होती. मी जगापासून लांब गेलो होतो. अतिशय काटेकोर आणि शिस्तबद्ध आयुष्य जगताना मी माझ्या ऑफिसमधील, घरातील, सोसायटीतील किती लोकांना दुखावलं याची गणती नव्हती. मी निवृत्त झाल्यावर ऑफिसमधील लोकांनी म्हणे, पेढे वाटले होते. मला त्याचाही एक विकृत आनंद झाला होता. मी हसणं विसरलो होतो. कपाळावरील आठी हा मला दागिना वाटत होता. माणसांची मला गरज नाही, माझ्या कर्तुत्वाच्या आणि पैशाच्या बळावर मला हवी ती कामं मी करून घेऊ शकत होतो, याची एक घमेंड आली होती.
हे सगळं घडत असताना, नियती नावाची एक गोष्ट मात्र स्वस्थ बसली नव्हती. एका रात्री माझ्या बायकोला हार्टअॅटॅक आला. मी गांगरून गेलो. काही लोकांना फोन केले. माझ्या भीतीपोटी काही माणसं जमली. आम्ही बायकोला हॉस्पिटलमध्ये हलवलं. ती त्यातून बरी झाली. पण नंतर तिची पुढची देखभाल करायला माणसं मिळेनात. कुणी चौकशीसाठी देखील फिरकले नाहीत. आम्ही दोघे एकटे पडलो. मी रोज रात्री बाथरूम बंद करून ओक्साबोक्शी रडत असे. आपण रडतोय आणि खांद्यावर थोपटायला कुणी नसणं हे किती भयानक असतं याचा अनुभव दोन महिने घेतला. बायको गेली आणि होता तोही आधार गेला. ज्या माणसांचा मी एकेकाळी तिरस्कार करत होतो, तीच माणसं आता मला जवळ हवी होती. ज्यांना मी माझ्या वागण्याने दुखावलं त्यापैकी काही लोकांचा पत्ता शोधून त्यांना भेटून आलो. त्यांना हात जोडून ‘सॉरी’ म्हणून आलो. काहींनी माफ केलं, काहींनी नाही. पण तरी बरंच ओझं कमी झालं. घरी बसून वेळ जाईना. मग सुचलं ‘कम्प्युटर शिकूया, स्वयंपाक शिकूया.’ पेपरला जाहिरात दिली की लोकांचे फोन येत. काही माणसं भेटून जात. तितकंच बरं वाटे. तू कम्प्युटर शिकावलास. चैत्राली नावाच्या एका मुलीने स्वयंपाक शिकवला. त्या निमित्ताने मला माणसं भेटत होती.
माणूस हा समुहात राहणारा प्राणी. तो जोवर समुहात आहे, तोवर त्याला माणसांची किंमत कळत नाही. ती कळण्यासाठी प्रत्येकाने एकटं राहून बघावं असं थोडीच आहे? इतरांच्या चुकांमधून काही शिकता येईल की नाही? निदान माझ्या चुकांमधून तरी….?
भरपूर माणसं जोड. त्यांना धरून ठेव. ज्याच्या घरात भरपूर वस्तू, तो श्रीमंत असं पूर्वी वाटायचं. आता वाटतं, ज्याच्या घराबाहेर भरपूर पाहुण्यांच्या चपला..तो खरा श्रीमंत ! आता तुझ्यासारखे असे निवडकच मित्र आहेत. खूप छान वाटतं.
कुछ लोग एक रोज़ जो बिछड जाते है, वो हजारों के आने से मिलते नहीं |
उम्रभर चाहे कोई पुकारा करे उनका नाम…वो फिर नहीं आते ! त्या दिवशी तुझ्या ‘युट्यूब’वर किशोरच्या तोंडी या ओळी ऐकल्या आणि…. असो !
तुझी ‘फी’ द्यायची बाकी आहे ते लक्षात आहे. मी अमेरिकेहून आलो की आपण भेटूच.
संपर्कात राहा. जमेल तेव्हा मेल कर.
तुझा
सबनीस काका
मी बराच वेळ त्या इमेलकडे बघत बसलो. त्या दिवशी जाहिरातीच्या चौकटीकडे बघत बसलो होतो, अगदी तसाच.
आपल्या सर्वांच्या आयुष्यातून हरवलेला ‘Ctrl Z’, सबनीस काकांना गवसला.
सबनीस काका, मला माझी फी मिळाली !
~ नवीन काळे
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)