आपणच आपला करावा विचार

आपणच आपला करावा विचार

फेव्हिक्विकची एक जुनी जाहिरात पाहत होतो. एका तळ्याकाठी मासे पकडायला आलेला एक अवखळ, चंचल खेडवळ माणूस आणि एक उच्चशिक्षित,शिष्ट माणूस यांच्यातला प्रसंग दाखवणारी ती जाहिरात.
एका साध्या काठीला फेव्हिक्विकचे चार थेंब लावून दोन मिनिटांत मासे पकडणारा तो खेडवळ माणूस पाहिला की, त्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक वाटल्यावाचून राहत नाही.

स्मार्ट वर्क करण्याचं कसब ही तशी सोपी गोष्ट नाही. पण, बहुतेकांना तेच जमत नसतं. लिहिता येणं आणि शैलीदार लेखन करणं यांत जसा फरक आहे, तसाच फरक काम करण्याच्या पद्धतीतही दिसून येतो.
साक्षरतेच्या दृष्टीकोनातून अशिक्षित माणसं व्यवहारज्ञानाच्या बाबतीत मात्र पुष्कळ चतुर निघतात, हे सत्य तर कुणीच नाकारू शकणार नाही.

लिहिता-वाचता न येणाऱ्या माणसांनीच रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग असे दुर्गम आणि अजिंक्य किल्ले उभारले, पुष्करणी बांधल्या, बारा-बारा मोटांच्या विहिरी बांधल्या. तीन-तीनशे वर्षे ऊन, वारा, पाऊस, समुद्राच्या लाटा यांना अखंड तोंड देत उभी असणारी बांधकामं करणारी माणसं साक्षर नव्हती, पण चतुर मात्र नक्कीच होती.
आता मात्र परिस्थिती उलटी फिरली आहे. पुस्तकी साक्षरता आली खरी, पण व्यवहारातलं चातुर्य मात्र गमावलं.

देवगिरी किल्ल्यावर अमुक एका ठिकाणी टाळी वाजवली की तमुक ठिकाणी तो आवाज कसा पोहोचतो, याचं कोडं आजही भल्याभल्यांना उलगडलेलं नाही. अजिंठ्याची चित्रं आणि त्यांचे रंग, कोणार्क-हंपी ची शिल्पकला, काडेपेटी एवढ्या डबीत मावणारी अख्खी नऊवारी अस्सल रेशमी साडी, तांब्या-पितळेच्या नक्षीदार वस्तू पाहिल्या की, भारतीय बुद्धिमत्तेचं मनोज्ञ दर्शन घडतं.

कोल्हापूरचा देवीचा किरणोत्सव आजही तोंडात बोटं घालायला लावतो. ते मंदिर घडवणारे शिल्पकार कोणत्या महाविद्यालयातून शिकलेले होते? सालारजंग वस्तुसंग्रहालयासारखी ठिकाणं पालकांनी आवर्जून पहावीत आणि डोळसपणे आपल्या मुलांना दाखवावीत अशी आहेत. कारण, ती केवळ कला-कुसर नाही, तर भारतीय बुद्धिमत्तेचा तो आविष्कार आहे. केरळीयन पंचकर्म आणि अभ्यंग ज्यांनी विकसित केलं, त्यांच्या बुद्धिमत्तेचा आवाका आपण लक्षात घेतला पाहिजे. पंचांग ही आपल्या खगोलशास्त्रीय बुद्धिमत्तेची पावतीच आहे. आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर सर्वसंगपरित्याग करायला शिकवणारी आपली संस्कृती आज सबंध जगाच्या दृष्टीनं अभ्यासाचा विषय आहे. हीच तर आपल्या बुद्धिमत्तेची कमाल आहे.
कोणत्याही विद्यापीठाच्या पदवीच्या प्रमाणपत्रापेक्षा व्यवहारातलं प्राविण्य हे कैक पटींनी अवगत करायला कठीण असतं. म्हणूनच, ते दुर्मिळ असतं.

“येरागबाळ्याचे काम नोहे” असं जगद्गुरू संत तुकोबारायांनी म्हटलं आहे, त्यांचा गर्भितार्थ आपण समजून घेतला तर बेरोजगारीसारखी समस्या आपल्याला भेडसावणार नाही. दुसऱ्याचं अंधानुकरण न करता ज्यानं-त्यानं स्वत:चा वकुब ओळखावा, मग जीवघेणी स्पर्धा, त्यातून उद्भवणाऱ्या समस्या यांचा त्रासच नाहीसा होईल, हेच तुकोबाराय सांगत असावेत.
आपण मात्र ते समजून न घेता, केवळ ‘घोका आणि ओका’च्या स्पर्धा भरवत बसलो आहोत.

अर्जुन, एकलव्याचा वारसा सांगणारा आपला देश आज तिरंदाजीमध्ये जागतिक स्तरावर स्वत:चं कर्तृत्व का सिद्ध करू शकत नाही? बहिर्जी नाईकांसारखी अत्यंत विलक्षण बुद्धिमत्तेची माणसं आपल्याकडे होती, त्यांच्या बुद्धिमत्तेचा वारसा घडवणारं जगातलं सर्वोत्कृष्ट हेरखातं आपण का विकसित करू शकलो नाही?

आपल्याकडच्या पालकांनाच आपला खरा बौद्धिक वारसा पुन्हा एकदा सांगण्याची वेळ आली आहे. आपला बौद्धिक परंपरेचा इतिहास आपण पार विसरून गेलो, हीच आपली मोठी घोडचूक झाली आहे.

रामानुजन, भास्कराचार्य, जगदीशचंद्र बोस, रविंद्रनाथ टागोर, राजा रविवर्मा यांच्यावरचे माहितीपट घराघरातून दाखवण्याऐवजी आपण घराघरातून विवाहबाह्य संबंध आणि पाताळयंत्री सासू-सुनांच्या सिरीयल्स दाखवायला लागलो, तिथंच आपण चुकलो. न्यायमूर्ती रामशास्त्री किंवा चाणक्य यांच्या गुणांना मनावर बिंबवणारे उत्तम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले सिनेमे आम्ही केलेच नाहीत, आम्ही सैराट, शाळा, टाईमपास, फॅंड्री यांच्यातच रमलो, तिथंच आपण चुकलो.
कौटिल्याचं अर्थशास्त्र आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत पोचवता आलं असतं. ते केलं असतं, तर शेतकऱ्याला कर्जबाजारीपणही आलं नसतं आणि त्यानं आत्महत्याही केली नसती. आपण ते केलंच नाही.
शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाचा चौरंग केला, खंडोजी खोपड्याचे हात-पाय कलम केले, त्यांच्या कठोर शिस्तीचं आणि नैतिकतेचं महत्व आपण आपल्या मुलांना नीट शिकवलं का? ते शिकवलं असतं तर निर्भया किंवा कोपर्डी प्रकरण झालं असतं का? आपण ते केलंच नाही.
मग, आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या पिढीला उत्तमरित्या घडवण्यासाठी आपण नेमकं केलं तरी काय? एक पालक म्हणून आपण आपली जबाबदारी नीट ओळखली आहे का?

गेलेली वेळ पुन्हा परत येईल का? येणार नाही.
डोळ्याला उघडपणे दिसणारी वस्तुस्थिती आणि आपला भूतकाळ यांचं नातं जोडण्याचा थोडासा तरी प्रयत्न करूया. आपल्याला ते प्रयत्नांनी जमेल.
व्यवहारात चतुर, प्रामाणिक, तत्वनिष्ठ आणि शिस्तप्रियता या चार गोष्टींचा अंगिकारच आपल्या देशाला जागतिक महासत्ता बनवेल…

~मयुरेश डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख,
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Forwarded)

2 thoughts on “आपणच आपला करावा विचार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: