चर्चा तर होणारच…!

चौका-चौकांतले भाऊ, दादा, नाना अन् अण्णा एकत्र आले. घरातला साधा ‘फॅन’ दुरुस्त करायची त्यांची ऐपत नसली तरी त्यांनी गल्लीबोळात आपापला ‘फॅन क्लब’ स्थापन केला. त्यानंतर फ्लेक्सवरच्या चित्रविचित्र साहित्याचं जागतिक संमेलनही त्यांनी भरवलं. या अकल्पित घटनेची खबरबात देवाधिराजांपर्यंत पोहोचताच सारा दरबार अवाक् होऊन एकसुरात उद्गारला, ‘..चर्चा तर होणारच!

पृथ्वीतलावरून कसला तरी ‘खाटऽऽ खूटऽऽ’ आवाज येऊ लागला म्हणून देवाधिराज इंद्रदेवांनी तत्काळ नारदमुनींना पाचारण केलं. मात्र, एखादी घटना घडून गेल्यानंतर जेवढय़ा वेळेत पोलीस घटनास्थळी पोहोचतील, त्याहीपेक्षा जास्त कालावधी नारदमुनींना दरबारात प्रकट होण्यासाठी लागला.

‘हे काय मुनी? मी जर भू-तलावर सत्तेत असतो, तर सीबीआय अधिकारीसुद्धा तुमच्यापेक्षा लवकर माझ्या दिमतीला हजर झाले असते नां!’ कपाळावरच्या आठय़ा दिसू न देण्याचा प्रयत्न करत देवाधिराज बोलले. त्यांच्या चेहर्यातवरचे हावभाव पाहून नारदमुनींना क्षणभर ‘उद्धव’ची आठवण झाली. ‘राज’चं नाव निघालं, की ते- सुद्धा असाच चेहरा करतात म्हणे.‘वाटेत खूप अडथळे लागले महाराज. म्हणून उशीर झाला!’ वातावरणातला तणाव दूर करण्याच्या हेतूनं हातातली वीणा हळुवारपणे वाजवत नारदमुनी उत्तरले.
‘पण कसले अडथळे मुनी? रस्त्यातले खड्डे अजून दुरुस्त झाले नाहीत का?’ देवाधिराजांनी विचारलं.
‘छे छे महाराज. काल-परवाच्या अवकाळी पावसामुळं प्रशासनाला पुन्हा एकदा निमित्त मिळालं बघा. रस्ते दुरुस्तीचं काम पुढं ढकलण्याचं.’
‘मग चौका-चौकांत ‘काम चालू, रस्ता बंद’च्या पाट्या टांगून ठेवल्या गेल्या आहेत, त्याचं काय?’
‘मी त्यात थोडीशी दुरुस्ती करून आलोय देवाधिराज. ‘काम बंद अन् रस्ताही बंद’ असं रंगवून आलोय पाटीवर.’ नारदमुनींच्या बुद्धिचातुर्यावर देवाधिराज पुरते खूश झाले.

‘असो. असो. पण, मला सांगा.. हा ‘खाटऽऽ खूट’ आवाज कसला येतोय भू-तलावरून मुनी?’ देवांनी मूळ विषयाला हात घातला.
‘तो आवाज म्हणता होय? तो चौका-चौकांतल्या ‘भाऊ’च्या कार्यकर्त्यांनी उभारलेल्या मंडपांचा आवाज आहे महाराज.’ मुनी बोलले.
‘अरे बाप रे..! आता कोणता उत्सव आला परत?’ गेल्या दोन महिन्यांत झालेली रस्त्यांची चाळण डोळ्यांसमोर तरळताच देवाधिराज पुरते दचकले.
‘उत्सव नव्हे.. अखिल भारतीय एफडीबी साहित्य संमेलनाची जोरात तयारी चाललीय ना महाराज.’ मुनींनी अधिक माहिती पुरवली.
‘मला बुडित बँकांमधला एफ्डी माहीत होता. बुडणार्याा शेतकर्यां चा एफडीआयही पाठ झाला होता.. पण हा एफडीबी काय प्रकार आहे बुवा?’ मोबाईलमध्ये जणू एखादं नवीन अँप्लिकेशन सापडावं, त्या उत्सुकतेनं देवाधिराजांनी विचारलं.
एफडीबी म्हणजे फ्लेक्स डिजिटल बोर्ड !’ इति नारदमुनी.
‘ऑ? आता फ्लेक्सचा अन् साहित्याचा काय संबंध?’ देवाधिराजांना एकावर एक आश्चार्याचे धक्के बसत होते.
‘होय महाराज. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.. परंतु आपण तरी काय करणार? विषय गंभीर; पण भाऊ खंबीर!’ अत्यंत निर्विकारपणे मुनी उत्तरताच दरबारात भलताच आ वासला गेला.
‘आता हा भाऊ कोण?.. अन् तो का खंबीर आहे?’ देवाधिराज अधिकच अस्वस्थ.
‘कारण महाराज.. प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहे!’ मुनींचा पुढचा डायलॉग ऐकताच दरवाजात पुन्हा चुळबूळ वाढली.
‘अरे पण .. या भाऊला कुणी विचारलं नाही का? तो असा का वागतोय?’ आता कुबेर पुढं सरसावले.
‘देवा..आता भाऊला कोण विचारणार? कारण त्याचा म्हणे कुणीच नाद नाय करायचा!’ डोळे मिटलेल्या नारदमुनींची धीरगंभीर आवाजातली भन्नाट डायलॉगबाजी काही संपायला तयारच नव्हती. आता मात्र दरबारातल्या कुबेरांची सहनशीलता संपू लागली होती ! त्यांच्या डोळ्यांत संताप एकवटू लागला होता. पण, हाय.. मुनींची ‘कॅसेट’ तशीच सुरूच राहिली.

बघता काय रागानं.? मैदान मारलंय वाघानं!’ मुनींचं हे पुढचं वाक्य ऐकल्यानंतर मात्र देवाधिराज सतर्क बनले. मुनींच्या वाणीतून आत्तापर्यंत बाहेर पडलेल्या या सार्या! वाक्यांमागं काहीतरी वेगळा इतिहास लपल्याची त्यांना जाणीव झाली. भू-तलावर काहीतरी अकल्पित घडत असल्याची त्यांना अनुभूतीही आली.
..म्हणून त्यांनी ‘भाऊ अन् वाघ’ या जगावेगळ्या भाषेतच पुढचा संवाद साधण्यावर भर दिला. ‘पण काय हो मुनी.. वाघानं मैदान मारल्यावर आजूबाजूच्या लोकांची प्रतिक्रिया काय?’ देवाधिराजांनी विचारताच मुनींनी तत्काळ जाहीर केलं, ‘एकच फाईट.. वातावरण टाईट.
‘एक से एक भन्नाट डायलॉगबाजी’ ऐकून इतर देवांनाही आता मुनींच्या संवादात अधिक रस वाटू लागला. एकाने गंभीरपणे पुढचा प्रश्न विचारला, ‘मग भेदरलेले बघे घाबरून पळाले असतील की !’
‘होय तर .. एक घाव शंभर तुकडे. अर्धे इकडे अर्धे तिकडे

‘काय म्हणता काय? परंतु याचा महिला वर्गाला काही त्रास?’ इतका वेळ पाठीमागं कुठंतरी उभारलेल्या अप्सरेनं पुढं सरसावून विचारलं. कदाचित ‘महिला हक्क अन् अधिकार’ याची जाणीव तिलाही झाली असावी.
‘छे छे. मुलींचा दावा आहे.. भाऊ छावा आहे.’ मुनींचे चौकार-षटकार सुरूच होते. हळूहळू सावरत चाललेला दरबार पुन:-पुन्हा बुचकळ्यात पडत होता.
‘ऑ? पाच मिनिटांपूर्वी तर तुमचा भाऊ वाघ होता. मग आता लगेच ‘छावा’ कसा काय झाला?’ कुबेरांना आतून संताप-संताप होत होता.
‘त्यात काय विशेष, आली लहर केला कहर!’ मुनींच्या या संवादफेकीनंतर मात्र अनेकांचा संयम तुटला. सहनशीलतेचा बांध फुटला.
‘मुनी.. तुमची ही चित्रविचित्र साहित्यिक भाषा आमच्या शिरपेचावरून चाललीय. आता तरी सांगा, कोण आहे हा भाऊ?..अन् आमच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचं धाडस या भाऊमध्ये आलं तरी कुठून?’ देवाधिराजही आता भलतेच गंभीर होत चालले होते.
भाऊंची डेअरिंग कालपण, आजपण अन् उद्यापण. महाराज.. भू-तलावरचे हे आधुनिक भाऊ खूप मोठ्ठे आहेत. जसं प्राचीनकाळी साधुसंतांनी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री आपापली परंपरा निर्माण केली होती; तसंच हे भाऊही आजकाल चौका-चौकांत स्वत:ची आगळी-वेगळी संस्कृती निर्माण करू लागलेत. जगावेगळ्या साहित्याची निर्मिती करू लागलेत.’ अखेर नारदमुनींनी मेन पत्ता ओपन करताच सार्यांथच्याच नजरेसमोर गल्लीबोळातले ‘फ्लेक्सबोर्ड’ झळकू लागले. आत्तापर्यंत मुनींनी ऐकविलेल्या प्रत्येक संवादामागचे रहस्यही उलगडत गेले.
‘पण काय हो मुनी.. या भाऊंचे कार्यकर्ते एफडीबी साहित्यिक संमेलन भरवताहेत म्हणता.. पण याचा खर्च नेमका करतोय कोण?’ युगानुयुगे जमाखर्चाच्याच राड्यात अडकलेल्या कुबेरांनी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा वाटणारा अचूक प्रश्न विचारला.

नारदमुनी गालातल्या गालात हसले. घसा खाकरून मिस्कीलपणे उत्तरले, ‘बोर्डावर जरी शुभेच्छुक म्हणून गल्लीबोळातल्या डझनभर लेकरा-बाळांचे फोटो असले, तरी याचा सारा खर्च वरच्या फोटोतला भाऊच करत असतो.
खालची नावं केवळ नावालाच असतात. अगदी तस्संच! आता या आधुनिक संमेलनाचा खर्चही हेच भाऊ करताहेत महाराज!’ हे ऐकताच मात्र अवघा दरबार दिलखुलास हसला. एक सुरात अन् एक दमात बोलला, ‘होऊ दे खर्च.. चर्चा तर होणारच!

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/Newspapers)

One thought on “चर्चा तर होणारच…!

  1. He Kay , swatah ch kahi liha ki. Changal wachayach mhanun follow karato, nahitar paper nasata wachala ka. Ajun 8 divas ghya. Suchat nahi mhanun bhalat salat kuthunahi uchun kahi taku naka.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: