१०० रुपयांची नोट

चौथीत असेन मी. दुकाना जवळ तिथुन जात असताना १०० रुपयांची नोट सापडली. भित भीत उचलली, आणि खिशात ठेवली. पण खर्च कसे करायचे कारण त्या वेळी २५ पैशात मुठभर गोळ्या मिळायच्या.

आठ दहा दिवस पैसे तसेच ठेवले. नंतर माझ्या आजोळी यात्रा होती तिकडे गेलो होतो. मावसभाऊ लहान होता त्याला पैसे सुट्टे करायला सांगितले तो एका दुकानात गेला आणि सुट्टे करुन आला. दुकानदाराने विस विसच्या पाच नोटा दिल्या घाईघाईत, आता तर प्रश्न गंभीर बनला होता. यात्रेत कसेबसे १५रुपये खर्च केले तेही दोघात.
नंतर गावाला आलो खिशात ८५रु शिल्लक. काय करायचे ते लक्षात येत नव्हते. घरी सांगितले तर आतापर्यंत का बोलला नाही म्हणून मार पडणार. दुसर्या दिवसापासुन माझ्या मित्रांची अक्षरशः चंगळ सुरू झाली होती. तरीही किती पैसे माझ्या कडे आहेत ते सांगता येत नव्हते. कारण कुणी फुटले तर आपण फुटेस्तोवर मार खाणार याची हमी. रोज कुल्फी काय आणि चॉकलेट काय, मज्जाच मज्जा. पण घरात आलो कि हळुहळु चालायला लागायचे कारण खिशातील चिल्लर वाजायची फार मोठी भिती होती.
आठ दहा दिवसात कसेबसे विस रुपये खर्च केले. खिशात अजुनही पासष्ट रुपये बाकी. आता तर मित्रांवरही खर्च करता येईना. कारण आत्ता सारखा पॉकेटमनीचा फंडा त्या वेळी नव्हता.
नशिबाने साथ दिली. शाळेत सरांनी फीचे २० रुपये आणायला सांगितले. सगळ्यात अगोदर मी भरले. सरांनी थोडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. कारण इतक्या लवकर फीचे पैसे घरुन कधिच मिळत नव्हते. आता ४५रुपये शिल्लक होते. अर्धा पडाव जिंकलो होतो, कारण विस पंचवीस दिवसात ५५रु खर्च करण्यात यशस्वी झालो होतो. पुढच्या विसेक दिवसात हा याचा प्रश्न सुटणार याची खात्री पटली होती.
पण नशिबात वेगळंच लिहिले होते. झाले असे, माझे वडील एका वर्गमित्राच्या घरी बसले होते, आणि तो रडुन घरी सांगत होता, “फीचे पैसे सगळ्यांनी भरले. मला सर बोलतात.” नशिब बलवत्तर तो ‘अ’ तुकडीत होता आणि मी ‘ब’ तुकडीत.
वडील घरी आले. मला फि बद्दल विचारले. मी बोललो, “तुम्ही रागावणार म्हणून मी नाही मागीतले.” वडीलांनी २२रुपये दिले. २०रू फिचे २रुपये खाऊसाठी. मी खाऊचे पैसे नको नको म्हणत होते तरी मिळालेच.
अक्षरशः वैतागून गेलो होतो पैशांनी भंडावून सोडले होते मला. मी खर्च करायला पहात होतो आणि ते परत परत येत होते.
माणूस अडचणीत सापडला तरच देव आठवतो. मलाही तो आठवला. तडक मंदिर गाठले. मारुतीरायापुढे दहा रुपये आणि लिंगा पुढे १० रुपये ठेवले आणी कळवळून प्रार्थना केली, “देवा, काही कर पण संपव हे पैसे, परत कधिच नाही उचलणार पैसे सापडले तरीही.” नंतर कसेबसे बाकीचे पैसे संपवले आजही ती वेळ आठवली तर हसु येतं. आज कितीही पैसा आला तरी पुरत नाही. तेव्हा मात्र संपता संपत नव्हते.
कोणीतरी बरोबर म्हटलंय. लहानपणी आईवडिलांच्या पैशावर सगळ्या गरजा भागायच्या आणि आज स्वताच्या पैशात पोटसुध्दा कसेबसे भरते…..!!!

कोणाच्या तरी लेखणीतुन
अतिशय मनोरंजक व त्या काळच्या परिस्थितीस अनुसरून सत्यघटना….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: