सियाचीन: एक अनुभव

चित्रपटगृहामध्ये सुरवातीला जे राष्ट्रगीत दाखवलं जातं त्यात सियाचीनमध्ये भारतीय लष्कर प्रचंड थंडीत राष्ट्रध्वज उभारतानाची फिल्म आपल्यापैकी प्रत्येकानं बघितली असेल. ही फिल्म बघताना मला तर दरवेळी भरून येतं. इतक्या प्रचंड थंडीत आपले जवान केवळ आपल्या रक्षणासाठी तिथे असतात. अशी कुठली उर्मी असते की ते हे करत असतात?

सरकारी कर्मचा-यांच्या कामचुकारपणाबद्दल आपण नेहमीच बोलत असतो. मग यांच्यात असं काय वेगळं असतं? मला माहीत आहे की असे काही लोक आहेत जे म्हणतील की, ते त्यांची नोकरी करत असतात. पण जवान त्याहूनही अधिक काही करत असतात.

आमच्या काॅलनीचा एक सभासद आणि कथाकार अरविंद गोखले यांचा नातू सुशांत गोखले हा सैन्यात मेजर आहे. तो आसाम रेजिमेंटमध्ये इन्फंट्री म्हणजे पायदळात आहे. सुशांतनं काही वर्षांपूर्वी सियाचीनमध्ये काम केलं. आपल्या या अनुभवांबद्दल तो काल आमच्याशी बोलला. त्याचे हे अनुभव जितके अनोखे आणि थरारक आहेत तितकेच ते अभिमान वाटावे असे आहेत.

पाकव्याप्त काश्मीर आणि भारताच्या ताब्यातल्या काश्मीरमधल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरार सियाचीन ग्लेशियर किंवा हिमनदी आहे. सियाचीन हा जगातला सगळ्यात थंड, उंच आणि अत्यंत कठीण असा एकमेव प्रदेश आहे जिथे सैन्य आहे. सुशांतचं पोस्टिंग सियाचीनमधल्या तुरतुक या भागात होतं. सियाचीन हे गुलाबाच्या एका प्रकाराचं नाव आहे. या भागात तो मुबलक आढळतो म्हणून या भागाचं नाव सियाचीन पडलं आहे.

जेव्हा या भागात पोस्टिंग होतं तेव्हा सैनिकांना कठोर प्रशिक्षण घ्यावं लागतं. कारण एकतर इतक्या उंचीवरच्या विरळ ऑक्सिजनशी शरीराला जुळवून घ्यावं लागतं. शिवाय इथे ज्या ज्या अडचणी येऊ शकतात त्यातून तुम्हालाच मार्ग काढायचा असतो. म्हणून सैनिकांचं 9000, 12000 आणि 15000 फुटांवर वेगवेगळं प्रशिक्षण घ्यावं लागतं. या हवेत तंदुरूस्त राहण्यासाठी शरीराला तयार करावं लागतं, तितकं कणखर बनवावं लागतं. या सगळ्या कठोर प्रशिक्षणात उत्तीर्ण झालात तरच तुम्हाला वर चढायला परवानगी मिळते.

इथे लष्कराची जी ठाणी आहेत ती डोंगराच्या टोकांवर आहेत. तिथे हेलिपॅड किंवा धावपट्टी नाही. त्यामुळे पाठीवर सर्व लागणारं सामान घेऊन मजल दरमजल करत सैनिकांना चढून जावं लागतं. चढताना अचानक हिमनदीच्या घळीत अडकलात तर बाहेर काढणं सोपं जावं म्हणून सहा सहा जण दोरीनं एकत्र बांधून घेऊन चालतात. अचानक हिमवादळात अडकलात तर त्यातून बाहेर पडण्यासाठी अत्यंत कठोर परिश्रम करावे लागतात. बर्फात वर चढताना कधीकधी पायवाट दिसत नाही तेव्हा जंगली कुत्री त्यांना वाट दाखवतात. इथे वीज नाही. त्यामुळे इंधन म्हणून केरोसिनचा वापर करावा लागतो. वर्षांनुवर्षं अशा वापरामुळे तिथे केरोसिनचे जे ड्रम्स साठले आहेत त्यासाठी श्रमदान करून ते परत आणावे लागतात. हे सगळं वजन पाठीवर उचलावं लागतं.

जेव्हा हे सगळे वर पोस्टवर पोचतात त्यानंतरचं त्यांचं आयुष्य फार कठीण असतं. प्यायला लागणारं पाणी बर्फाचा एक एरिया निश्चित करून तिथून तो बर्फ खणून आणून, ते वितळवून मिळवावं लागतं. या एरियात बरोबरच्या कुत्र्यांना जाऊ द्यायचं नसतं. कित्येकदा पाकिस्तानी सैनिकांचा आणि आपल्या जवानांचा हा एरिया एकच असतो! इथे किमान दोन महिन्यांचं पोस्टिंग असतं. त्या काळात पोट सांभाळायचं असतं. कारण जराही काही बिघडलं तरी ते आजारपण मोठं होऊ शकतं. त्यामुळे खाणंपिणं सांभाळून करावं लागतं. थंडीमुळे हाय कॅलरी अन्न खावं लागतं. सुका मेवा खावा लागतो. किचन आहे ते बर्फावर केरोसिनचा धूर राहिल्यानं काळंभोर झालेलं असतं.

सुशांत म्हणाला एरवी आपण अशा स्वयंपाक घरात तयार झालेलं अन्न खाणार नाही पण इथे पर्याय नाही. बहुतेकदा टिन्ड फूड खावं लागतं. नाहीतर पोळ्या आणि सुकवलेल्या भाज्यांनी बनवलेली भाजी आणि आमटी भात हे जेवण. मॅगी महिन्यातून एखाद्यावेळी कारण त्यात प्रिझर्वेटीव्ज असतात. त्या दिवसाची जवान आतुरतेनं वाट बघतात. एकत्र येऊन जेवतात.

रोज फक्त 4 तास जनरेटरनं वीज पुरवठा. त्या काळात सगळ्या बॅट-या चार्ज करायच्या. राहण्याची खोली अगदी लहान. एक बेड, स्लिपिंग बॅग, खोली गरम ठेवणारं उपकरण, टीव्ही! इतकंच. टाटा स्कायचं रिसेप्शन तिथेही उत्तम येतं हाच काय तो विरंगुळा. संध्याकाळी भजनं करायची, सकाळ संध्याकाळ प्रत्येकाचं हेल्थ चेकप इतकंच रूटीन. कुणी आजारी पडलंच तर उचलून त्याला खाली न्यावं लागतं. जेव्हा हिवाळा सुरू होतो तेव्हा कडाक्याच्या थंडीत (एरवी मायनस 20 आणि वारा असेल तर चिल फॅक्टरमुळे त्याचा परिणाम मायनस 50 इतका जाणवतो. काहीही करायचं असेल तर रात्री 12 ते 4 यावेळेत करायचं कारण त्या काळात बर्फ कडक असतो. ऊन पडलं की तो मऊ होतो आणि घसरून गाडलं जाण्याची शक्यता असते.

सर्व रसद गुरखा पोर्टर खालून चढून घेऊन येतात. शिवाय रात्री चढताना टाॅर्चचा वापर मना आहे कारण शत्रूचा हल्ला होण्याची शक्यता असते. नखं कापतानाही पूर्वसंमती घ्यावी लागते. कारण लहानशी जखम झाली तरी इथे रक्त लवकर थांबत नाही. जितके दिवस इथे असता तितके दिवस आंघोळ नाही. एकच दिलासा म्हणजे सरकारनं फोन लाईन्स टाकलेल्या आहेत त्यामुळे STD काॅल करता येतात.

लिहिण्यासारखं अजून खूप आहे. पण हे आयुष्य बघितल्यावर आपल्या समस्या किती क्षुल्लक आहेत हे कळतं आणि आपण खजील होतो.

सरकार या भागातल्या जवानांना जे कपडे, बूट, गरम कपडे आदी पुरवतं ते उत्तम दर्जाचं असतं असं सुशांतनं वारंवार सांगितलं.

मला त्याचं अजून एक वाक्य लक्षात राहिलंय, सुरूवातीला त्यांनी त्याच्या तुकडीतल्या एका जवानाचा फोटो दाखवला. तो म्हणाला की, हे जवान नसतील तर आम्ही काहीही करू शकत नाही. भारतीय लष्करात 13 लाख कर्मचारी आहेत आणि मी त्यापैकी एक आहे. माझ्यासारखेच किती तरी आहेत त्यामुळे मी विशेष काही करत नाही असं सुशांतनं सांगितलं.

सुशांतनं आता कमांडोचं प्रशिक्षण पूर्ण केलं असून तो सध्या मेजर या पदावर सिमला इथं पोस्टेड आहे.

~ सायली राजाध्यक्ष

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: