प्रेम कुणावर करावं? तर सगळ्यात आधी ‘स्वत:वर’ करावं!
हळदीच्या अंगानं कालच उंबरा ओलांडून सासरी आलेली गीता! एकीकडे नव्या आयुष्याची गुलाबी स्वप्नं रंगवण्यात दंग तर दुसरीकडे जबाबदारीच्या जाणिवेनं धास्तावलेली. आईबाबांची एकुलती एक लाडकी मुलगी होती. शिक्षणात हुशार, शिवाय खेळ आणि इतर अनेक छंदात चिक्कार गती असलेली. त्यामुळे घरातली कामं, स्वयंपाक याची फारशी सवय नव्हती तिला. हे सगळं शिकायला कधी वेळच नाही मिळाला.
आता लग्न करून सासरी आल्यावर हे सगळं कसं निभावणार आपल्याच्यानं, याचं चांगलंच टेन्शन आलं होतं तिला. तशी सासरची मंडळी प्रेमळ होती आणि समजूतदारही, पण ताण होताच. शिवाय मुलगी सासरी जायची म्हणून आईनं आणि माहेरच्या जुन्या जाणत्या माणसांनी केलेला खंडीभर उपदेश. सासू-सासर्याचं मन जिंकून घे. घरातल्या जबाबदाऱ्या स्वत:हून अंगावर घे. सगळं घर जागं व्हायच्या आधी उठत जा. वगैरे वगैरे.
आज सकाळी ती जागी झाली ते याच सगळ्याचं ओझं डोक्यावर घेऊन. सगळं घर अजून साखरझोपेत असताना तिनं उठून चहा केला, नास्ता रांधला आणि घर हळूहळू जागं झालं तसतसं सगळ्यांची खातीरदारी करण्यात ती गुंतून गेली. सासूनं तोंड भरून केलेलं कौतुक तिला सुखावून गेलं. नवर्याच्या डोळ्यातही तेच कौतुक पाहून तर तिच्या अंगावर मूठभर मास चढलं. अशा रीतीने गीताचा नवा संसार सुरू झाला.
घरच्या माणसांच्या पसंतीची पावती मिळवण्यासाठी कष्ट करण्यात ती गुंतून गेली. तिचं कौतुक करताना सासूला तर शब्द कमी पडायला लागले. गीताही खुश होतीच; पण तिच्या आवडीच्या गोष्टी करायला मात्र तिला अजिबात वेळ मिळेना.
असेच काही महिने गेले. गीताला आता एक उत्तम पगाराची नोकरी लागली. मग एक-दीड वर्षानं तिला बाळ झालं. आता गीताचं आयुष्य खूपच बिझी झालं. शिवाय घरातल्या अनेक जबाबदाऱ्या तिनं अंगावर घेतल्या होत्या. घरच्या माणसांकडून कौतुक करून घेण्याची नशाच होती ती! घरातल्या कुणाचं माझ्यावाचून पान हलत नाही, याचा काहीसा गर्वच तिला व्हायला लागला होता. त्यामुळे ती प्रचंड कष्ट ओढायची.
पण हळूहळू गीता चिडचिडी व्हायला लागली. तिचा राग नवर्यावर आणि बाळावर सतत निघायला लागला. ती कधीही आनंदी, उत्साही दिसत नाही म्हणून नवरा वैतागू लागला.
मग भांडणं सुरू झाली. एक गुण्यागोविंदानं सुरू झालेल्या संसाराची घडी आता अशी उसवायला लागली.
वाचताना असं वाटलं ना की आपलीच कहाणी?.. का होतं हे असं?
“किती काम करतेस रोज आणि सगळं कसं परफेक्ट. ‘यू आर अ सुपरवुमन’ या लोकांनी केलेल्या कौतुकाचं व्यसनच लागतं जणू. आपल्या या सुपरवुमनच्या प्रतिमेत बायका स्वत:च इतक्या अडकतात, की माणूस म्हणून जगायलाच विसरतात. प्रत्येकीला एक उत्तम आई व्हायचं असतं, उत्तम बायको, उत्तम सून, मुलगी आणि शिवाय ऑफिसमध्येही उत्तम नोकरदार आणि सहकारी. ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकातलं एक वाक्य मला फार आवडतं. ‘लग्न झाल्यावर नव्या नवरीनं तेवढंच चांगलं वागावं जितकं आयुष्यभर वागायला जमेल’ किती खरं आहे हे! कौतुक करून घेण्यासाठी माणूस एक-दोन दिवस जास्त कष्ट करू शकतो, स्वभाव नसला तरी गोड गोड वागू शकतो.
आयुष्यभर कसं वागणार असं? त्याचा ताण यायला लागतो. शरीरावरही. मनावरही.
शिवाय बाकीच्या जबाबदाऱ्या वाढतात, वय वाढतं, तशी तब्येत ढासळते (कारण तिच्याकडे लक्ष द्यायला वेळच झालेला नसतो). आपण सगळ्यांसाठी राबराब राबतोय तरी आपल्याला काय आवडतं हे कुणाच्या खिजगणतीतही नाही, असे विचार सतत मनात यायला लागतात. या सगळ्याचं कारण आहे स्वत:साठी वेळ दिला की त्याचा बायकांना येणारा गिल्ट!
स्वत:वर पैसे किंवा वेळ खर्च करणं हा गुन्हा आहे या समजातून आपण बायका कधी बाहेर येणार आहोत? जो माणूस आधी स्वत:ला खुश ठेवतो तो आणि तोच दुसऱ्यालाही आनंदात ठेऊ शकतो हे आम्हाला कधी कळणार? स्वत:चं मन मारून, आवडणाऱ्या गोष्टी सतत स्वत:ला नाकारून, स्वत:च्या आनंदाचे बळी देऊन त्यावर जर आपण दुसर्याच्या आनंदाचे इमले बांधत राहिलो तर ते कधी ना कधी ढासळणारच. मग भले ती दुसरी व्यक्ती म्हणजे अगदी तुमच्या पोटचं मूल असेल किंवा तुमचा नवरा.
स्वत:वर जरासं प्रेम करायला शिकूया! मला, माझ्या मनाला, माझ्या शरीराला काय हवंय ते ओळखायला शिकू या! स्वत:च्या इच्छा, आकांक्षा, आवाडी-निवडी यांचा जरा आदर करूया! तुमचं शरीर जर अलीकडे थकायला लागलंय जरासं तर स्वत:ला आरोग्यपूर्ण ठेवणं ही आधी तुमची जबाबदारी नाही का? ती जर तुम्हालाच समजली नाही तर इतरांना कशी कळेल? आणि तुम्ही स्वत:ला जर आरोग्यपूर्ण ठेवलं तर तुम्ही घरातल्या इतर जबाबदाऱ्या जास्त चांगल्या पद्धतीनं आणि आनंदानंही पार पाडू शकाल असं वाटत नाही का?
तर सांगा आता आपल्या या गीतानं आता काय करायला हवं?
तर सगळ्यात आधी ‘सुपरवुमन’ या आपल्या पदवीचा त्याग करायला हवा. आपल्या इतरांनी केलेल्या कौतुकात रमण्यापेक्षा आपल्याला काय हवंय हे आधी समजून घ्यायला हवं. वाढत्या जबाबदार्यांमुळे आणि वाढत्या वयामुळे सगळं पूर्वीसारख्या उत्साहानं करायला जमणार नाही हे समजून घ्यायला हवं. शिवाय स्वत:ला आनंदी ठेवणं ही आपली जबाबदारी आहे हेही समजून घ्यायला हवं. आधी एक तर हे स्वत: समजून घ्यायला हवं आणि मग घरातल्या मंडळींना हे प्रेमानं पण ठामपणे समजावून सांगायला हवं. आणि मग स्वत:ला रोज थोडातरी वेळ द्यायला हवा. त्या वेळात तिनं काहीही करावं. एखादा छंद जोपासावा, व्यायाम करावा, मैत्रिणींना भेटावं किंवा अगदी डोक्यावरून पांघरूण घेऊन ताणून द्यावी.
आपल्यापैकी कितीजणी नियमितपणे मैत्रिणींबरोबर वेळ घालवतात? त्यांच्याबरोबर एखाद्या सोलो ट्रीपला जाणं वगैरे तर दूरच पण वेळ काढून कितीजणी मैत्रिणींना भेटतात? मुलांच्या परीक्षा, पाहुणे, बाई आली नाही, सासू-सासर्यांची आजारपणं, हजार कारणं मधे येतात आणि आपण मैत्निणींना भेटणं टाळत राहातो.
मध्यंतरी एक छान लेख वाचनात आला. ‘ऑक्सिटोसीन’ हे बायकांमधलं ‘लव्ह हॉर्मोन’ आहे. ते स्त्रवलं की बायकांना मस्त वाटतं, त्या खुश असतात. आणि ते सर्वात जास्त कधी स्त्रवतं माहितीये? आपल्या मैत्रिणींच्या सहवासात. मुलाबाळांच्या किंवा प्रियकराच्या सहवासात नाही तर मैत्रिणींच्या सहवासात!
जीवलग मैत्रीणींना भेटून आल्यावर खूप वेळ आपल्याला छान वाटत राहातं, ते शरीरात स्त्रवलेल्या या ‘ऑक्सिटोसीन’मुळे.
मग इतक्या साध्या गोष्टीनं आपल्याला छान वाटणार असेल आणि आपण खुश राहिल्यानं सगळं घर खुश राहाणार असेल तर असे छोटे छोटे आनंद का नाकारायचे आपण स्वत:ला?
माझं एक ऐकाल, आजपासून एक पण करा की, ‘मी सुपरवुमन बनायला जाणार नाही. माझ्यावर प्रेम करायला शिकेन. स्वत:ला खुश ठेवायला शिकेन. स्वत:ला वेळ देईन आणि त्याचा गिल्ट येऊ देणार नाही.’
चला, खुश राहूया! आणि कुसुमाग्रजांच्या कवितेत थोडा बदल करून म्हणूया,
प्रेम कुणावर करावं? तर सगळ्यात आधी ‘स्वत:वर’ करावं!
– डॉ. मृदुला बेळे
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)
अतिशय मार्मिक कहाणी आहे गीताची, आणि आपण सगळेच आज गीता झालोय..!
nice..