एका लग्नाची गोष्ट

लग्नाला गेलो होतो. बायकोकडच्या नातलगांकडचं लग्न होतं. तिच्या माहेरच्यांकडे जाताना मी साधे कपडे घातले तर ते तिला चालत नाही. ती मला चांगलेचुंगले कपडे घालून नटवून नेते. तस्मात तिच्याबरोबर लग्नाला जाताना मी शेरवानी परिधान केली होती.
कार्यालयात प्रवेश केल्यावर दारातल्या मुलीने कागदाची सुबक पुडी दिली. पुडीत अक्षता होत्या. मी पुडी उघडली, अक्षता हातात घेतल्या आणि माझ्या व बायकोच्या पुडीचे कागद खिशात कोंबले. मंगलाष्टके संपली. चारसहा मुली हातात उपस्थितांना पेढे वाटू लागल्या. आम्ही पेढे तोंडात टाकले आणि वरचे कागद मी खिशात कोंबले. सर्वजण माझ्यासारखे नव्हते. वधूवरांचे अभिनंदन करायला आम्ही स्टेजकडे निघालो. वाटेत सर्वत्र पायांखाली अक्षतांच्या आणि पेढ्यांच्या कागदाचे कपटे पडलेले होते. तेवढ्यात माईकवरून घोषणा झाली – “उपस्थितांना उभय परिवारांतर्फे नम्र विनंती. भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. दुसरी महत्त्वाची विनंती. सर्वांनी कृपया आपापल्या जवळील अक्षतांचे आणि पेढ्यांच्या पुड्यांचे कागद जपून ठेवावेत. त्या कागदांवर नंबर छापलेले आहेत. पाचच मिनिटात त्यातून तीन लकी नंबर्स काढून त्यांना वधूवरांतर्फे खास पारितोषिके दिली जाणार आहेत.”
ही घोषणा ऐकल्यावर तुंबळ धुमश्चक्री उडाली. आपापल्या तुंदिलतनू आणि त्यावर ल्यालेले जडशीळ पोषाख सावरीत अनेकजण-अनेकजणी खाली वाकण्याचे आणि जमिनीवर दिसतील ते कागद उचलण्याचे प्रयास करू लागले-लागल्या. थोडा वेळ गोंधळ झाला. पण लवकरच हॉल बऱ्यापैकी स्वच्छ झाला. पाच मिनिटांनी माईकवरून लकी नंबर्स घोषित झाले. आणि अहो आश्चर्यम्. माझ्या खिशातल्या नंबरला पहिला पुरस्कार मिळाला होता. माझा आनंद फार टिकला नाही. पहिला पुरस्कार म्हणून साडी मिळाली होती. ती बायकोने बळकावली. घरी आल्यावर आमचा संवाद झडला.
“कागद खाली न टाकता खिशात ठेवायची माझी सवय कामी आली.”
“माझ्या माहेरच्या माणसांनी ही अभिनव कल्पना राबवली आणि पाहुण्यांकडून हॉल स्वच्छ करून घेतला. त्याचं तुम्हाला कौतुकच नाही.”
“तुझ्या भावाला विचार. ही सगळी आयडिया त्याला मीच सुचवली होती. पेढा खाल्ल्यावर मी लगेच त्याला कागदावरचा नंबर एसएमएस केला होता. म्हणून तुला साडी मिळाली.”
“अच्छा. म्हणजे ही साडी दादाने दिली. आता तुम्ही मला एक साडी घ्या. बरेच दिवस झाले, घेतली नाही.”
मी कपाळावर हात मारून घेतला.
~ विजय तरवडे
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)