हनुमानाचे कार्य आणि वैशिष्ट्ये :
१) सर्वशक्तीमान
जन्मतःच मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले, अशी जी कथा आहे, यातून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) मारुति हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या तत्त्वांत वायूतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा जास्त सूक्ष्म, म्हणजे जास्त शक्तीमान आहे.
२) भुते आणि मारुति : –
सगळ्या देवतांमध्ये केवळ मारुतीला वाईट शक्ती त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते मारुतीला काही करू शकले नाहीत. म्हणूनच मारुतीला ‘भुतांचा स्वामी’ म्हटले जाते. भुताने कोणाला पछाडले, तर त्या व्यक्तीला मारुतीच्या देवळात नेतात किंवा मारुतिस्तोत्रे म्हणतात. याने त्रास न गेल्यास पछाडलेल्या व्यक्तीवरून नारळ उतरवून तो मारुतीच्या देवळात नेऊन फोडतात. व्यक्तीवरून नारळ उतरवल्याने व्यक्तीतील वाईट शक्ती नारळात येते आणि तो नारळ मारुतीच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी शक्ती मारुतीच्या सामर्थ्याने नष्ट होते. त्यानंतर तो नारळ विसर्जित करतात.
३) महापराक्रमी : –
राम-रावण युद्धात ब्रह्मास्त्रामुळे राम, लक्ष्मण, सुग्रीव इत्यादी वीर निश्चेष्ट झाले असता जांबवंताने हनुमानाच्या पराक्रमाचे असे वर्णन केले – ‘वानरश्रेष्ठ हनुमान जिवंत आहे ना ? हा वीर जिवंत असता सर्व सैन्याचा जरी वध झाला, तरी तो न झाल्यासारखाच आहे; परंतु जर हनुमानाने प्राणत्याग केला, तर आम्ही जिवंत असूनही मृततुल्यच आहोत.’ हनुमानाने जंबु-माली, अक्ष, धूम्राक्ष, निकुंभ इत्यादी बलाढ्य विरांचा नाश केला. त्याने रावणालाही मूर्च्छित केले. समुद्रउड्डाण, लंकादहन, द्रोणागिरि आणणे इत्यादी घटना या हनुमंताच्या शौर्याच्या प्रतीक आहेत.
४) बुद्धीमान :-
मारुतिरायाला सर्व व्याकरणसूत्रे ठाऊक होती. त्याला अकरावा व्याकरणकार मानले जाते. तो एवढा बुद्धीमान कसा ? मित्रांनो, जे भक्ती करतात, त्यांची बुद्धी सात्त्विक होते. आजपासून आपणही मारुतिसारखी भक्ती करून बुद्धीमान होऊया !
५) भक्त: –
दास्यभक्तीचे एक सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून अद्याप मारुतीच्या रामभक्तीचेच उदाहरण देतात. तो आपल्या प्रभूंकरता प्राण अर्पण करण्यासाठी सदैव सिद्ध असे. त्यांच्या सेवेपुढे त्याला शिवत्व आणि ब्रह्मत्व यांची इच्छाही कवडीमोल वाटत असे. हनुमान म्हणजे सेवक आणि सैनिक यांचे मिश्रण ! हनुमान म्हणजे भक्ती आणि शक्ती यांचा संगम !
६) अखंड सावधता आणि साधना : –
युद्ध चालू असतांनाही मारुति थोडा वेळ बाजूला जाऊन ध्यानस्थ बसत असे; पण तेव्हासुद्धा तो सावध असे. त्याची शेपटी गदेवर असायची.
७) मानसशास्त्रात निपुण आणि राजकारणपटू :-
अनेक प्रसंगी सुग्रीवादी वानरच काय, पण रामानेही याचा समादेश (सल्ला) मानला आहे. रावणाला सोडून आलेल्या बिभीषणाला आपल्या पक्षात घेऊ नये, असे इतर सेनानींचे मत असता मारुतीने ‘त्याला घ्यावे’, असे सांगितले आणि रामाने ते मान्य केले. लंकेत सीतेच्या प्रथम भेटीच्या वेळी तिच्या मनात स्वतःविषयी विश्वास निर्माण करणे, शत्रूपक्षाला नामोहरम करण्यासाठी लंकादहन करणे, स्वतःच्या (रामाच्या) आगमनाविषयी भरताला काय वाटते, ते पहाण्यासाठी रामाने त्यालाच पाठवणे, यावरून त्याची बुद्धीमत्ता आणि मानसशास्त्रातील निपुणता दिसून येते. लंकादहनानेही त्याने रावणाच्या प्रजेचा रावणाच्या सामर्थ्यावरील विश्वास डळमळीत केला.
८) जितेंद्रिय : –
मारुतीचे आपल्या इंद्रियांवर नियंत्रण होते. तो सीतेच्या शोधासाठी लंकेत गेला. तेथे त्याने राक्षस कुलातील अनेक स्त्रिया पाहिल्या; पण एकाही स्त्रीविषयी त्याच्या मनात कोणताच वाईट विचार क्षणभरसुद्धा आला नाही; कारण त्याने आपल्या सर्व विकारांवर नियंत्रण मिळवले होते. मित्रांनो, देवाची भक्ती करणारा खरा भक्तच आपल्या विकारांवर, म्हणजेच वाईट विचारांवर नियंत्रण मिळवतो. तो विकारांच्या आहारी जात नाही. आज आपण पुष्कळ शिक्षण घेतो; पण आपले विकार जात नाहीत. याचे कारण आपण देवभक्त नाही.
९) संगीतशास्त्राचा प्रवर्तक : –
मारुतीला संगीत-शास्त्राचा एक प्रमुख प्रवर्तक मानलेले आहे. यामागे त्याचा रुद्राशी असलेला संबंध साहाय्यभूत असावा. त्याला रुद्राचा अवतार मानतात. रुद्र हे शिवाचे एक रूप आहे. मारुति हा शिवाचा अवतार असला, तरी रामाच्या उपासनेने त्याच्यातील विष्णुतत्त्व जास्त झाले आहे. शिवाच्या डमरूतून नाद निर्माण झाला; म्हणून शिवाला संगीताचा कर्ता समजतात. मारुतीच्या अंगच्या गायनी कलेमुळे समर्थ रामदासस्वामींनी त्याला ‘संगीतज्ञानमहंता’ असे संबोधले आहे.
१०) नवसाला पावणारा : –
हा नवसाला पावणारा देव आहे, या श्रद्धेमुळे व्रत किंवा नवस म्हणून कित्येक स्त्रीपुरुष मारुतीला प्रतिदिन ठराविक प्रदक्षिणा घालतात. ‘लग्न न होणार्या कुमारिकेने ब्रह्मचारी मारुतीची उपासना करावी’, असे जे सांगितले जाते, त्याचे काही जणांना आश्चर्य वाटते. ‘कुमारिकेच्या मनात ‘बलदंड पुरुष नवरा म्हणून मिळावा’, अशी इच्छा असते आणि म्हणून ती मारुतीची उपासना करते’, असेही काही जण चुकीचे सांगतात; पण त्याची खरी कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
११) चिरंजीव : – प्रत्येक वेळी प्रभु श्रीराम अवतार घेतात, तेव्हा ते तेच असतात; मात्र मारुति प्रत्येक अवतारी निराळा असतो. मारुति सप्तचिरंजिवांपैकी एक असला, तरी सप्तचिरंजीव चार युगांचा शेवट झाला की, मोक्षाला जातात आणि त्यांचे स्थान अतिशय उन्नत असे सात जण घेतात.