लग्न

एकेकाळी माझे लग्न झालेले नव्हते आणि मी एकटा राहात होतो.
मला घरात बूट घालून वावरायला काहीही प्रॉब्लेम नव्हता. मी तेच बूट घालून सर्वत्र वावर करत होतो. मग मी लग्न केले. बूट दाराबाहेरच काढायचे असतात हे अमोघ ज्ञान मला प्राप्त झाले.
आंघोळ करून आलो की मी टॉवेल बेडवर टाकायचो, संध्याकाळी घरी परत आलो की तो टॉवेल वाळलेला असायचा. बेडला पण गारगार वाटत असणार. पण मग मी लग्न केले आणि टॉवेलने दोरी धरली ( म्हातारीने खाट धरली अश्या टोनमध्ये वाचावे ) आणि बेडच्या नशिबातला गारठा नष्ट झाला.
एकेकाळी जेंव्हा मी एकटा राहायचो तेंव्हा फ्रीजला माहीत नव्हते की त्याच्या अतिशील कप्यात मैदा, रवा वगरे पण ठेवातात. काल का परवा मी अतिशील कप्प्याला एकांतात रडतांना ऐकले. काय झाले म्हणून विचारावे तर तो म्हणाला तुझ्या बायकोने मला गरम मसाला सांभाळायला दिला आहे रे. त्याचे सांत्वन करायला लागलो तर अवघा फ्रीज रडायला लागला. का रे बाबा काय झाले असे मी म्हणायचं अवकाश, त्याने बिस्किटाचे पुढे माझ्यावर फेकले आणि म्हणाला, लग्न करायच्या आधी ठेवायचा का कधी बिस्किटे फ्रीजमध्ये.
एकेकाळी माझे लग्न झालेले नव्हते. मी गावभर चतकोर चड्डीत फिरायचो. माझ्याकडे कोणीही वाईट नजरेने बघत नसे किंवा शिट्टी मारत नसे. पण मग मी लग्न केले आणि स्वतःच्या घरातल्या हॉलमध्ये देखील चतकोर चड्डीत येणे माझ्यासाठी खून करण्या इतका मोठा गुन्हा झाला. दूध भाजी आणायला देखील मी फुल पॅन्टमध्ये जाऊ लागलो. माझी आग उगलती जालीम जवानी झाकायला बायकोने डोक्यावर मफलर टाकायचे अनेक प्रयत्न केले आहेत पण उन्हाने माझी बाजू लढवत मला सांभाळून घेतले आहे.
एकेकाळी माझे लग्न झाले नव्हते आणि माझ्याकडे सहा पांढरे शर्ट आणि सहा निळ्या जीन्स होत्या. आता लग्न झाल्यावर माझ्याकडे फ्लोरोसंट ग्रीन, रेड, पिंक, ब्ल्यू, मरून, येलो रंगाचे पण शर्ट आहेत.
एकेकाळी माझे लग्न झाले नव्हते आणि गाय म्हैस बकरी वगरे माझ्यासाठी साधे प्राणी होते, दूध देणारे. लग्न झाले आणि इईईईई म्हशीचे दूध कोणी पिते का असा शोध मला लागला. गाईचे दूध म्हणजे अमृताचा प्याला असे समजून मी नाक बंद करून प्यायला लागलो.
एकेकाळी माझे लग्न झाले नव्हते. मी भसकन माझ्या मित्राच्या घरी जात असे, त्यांच्या किचनमध्ये घुसून कोणत्याही डब्यात हात घालत असे. सोफ्यावर मांडी घालून फतकल मारत असे, रात्री बे रात्री टीव्हीवर काहीतरी बघत काकू चहा टाका न असे सांगत असे. मग माझे लग्न झाले. आता मी मित्राच्या घरी जातो, टेबलावर मस्त चकल्या असतात, घट्ट दही असते पण माझ्या गब्बरने माझे हात छाटलेले असल्याने त्या चकल्या मला उचलता येत नाही, टीव्हीवर आपल्याला हवे ते चॅनेल लावता येत नाही आणि जीभ छाटलेली असल्याने काकू चहा टाका असे सांगता येत नाही.
एकेकाळी मी अलग्न होतो, गर्लफ्रेंड होती. गर्लफ्रेंड भारी होती. बोल्ड होती, मॉडर्न होती, पण मग आम्ही घोडचूक केली. लग्न केले. का तर म्हणे आग आणि लोणी एकत्र न जळता राहू शकत नाही. गर्लफ्रेंड बायको झाली आणि घरात लोकशाही जाऊन हिटलरशाही आली.
आता मी वाघावर स्वार झालो आहे. उतरलो की माझी शिकार होणार हे पक्के आहे !!!!
😀😀😀😀😀
Sundar story
khup ch chan