देव कसं काम करतो..

काश्मीर घाटातून एक मेजर त्याची तुकडी घेऊन पायी चालला होता. हिमवर्षावाने वाहने जाऊच शकत नव्हती. एव्हाना त्या तुकडीला चाल करून पाच-सहा तास झाले होते. पौर्णिमेची मध्यरात्र होती.

मेजरला चहाची तलफ आली. पण वाटेतली सर्वच दुकानं बंद.

परमेश्वरा! आता चहा-बिस्किटे तरी मिळू देत रे….!

मनातल्या मनात देवाचा धावा तो मेजर करत होता. कच्चा शिधा शिजवायची ही सोय नव्हती.

दोन किमी पुढे गेल्यावर एक टपरी दिसली. अर्थात बंद.

“सर्वांनी इथे काही काळ आराम करा”

मेजरच्या हुकुमासरशी सर्वांनी आपापलं समान खाली टाकलं.

“साहेब आत चहाची किटली….!”

पण दुकान बंद होतं. मनात विचार चालू होते. दुकान तोडून काही घेणं ही सरळसरळ चोरी. मेजर शांत होता. तो सर्वांची तोंडं बघत असतानाच आतला आवाज आला ‘तोड कुलूप’

“तोडा रे कुलूप”

एकाच झटक्यात कुलूप निखळलं.

आत वीस पेले, चहाचं समान, मसाला, आलं, किटली, स्टोव्ह आणि चाळीस-पन्नास पार्ले जी.

एका सैनिकाने भरपूर आलं घालून चहा बनवला. सर्वांनी चहा प्यायला, बिस्किटे खाल्ली. दोन थर्मास चहा आणि बाटल्यात पाणी भरून घेतलं.

“सर्व सामान धुवून आवरून ठेवा”

आदेशानुसार कामं होइपर्यंत मेजरने हिशेब केला.

₹२०००.०० मालकाला दिसतील असे ठेवले. त्यात तोडलेल्या कुलुपाचीही किंमत होती.

मजल-दरमजल करत तुकडी मुक्कामी पोचली. आता तीन महिने तिथेच ठाण मांडून राहायचं होतं.

तीन महिने पूर्ण झाले. तुकडीने सरस कामगिरी बजावली होती. यथावकाश त्यांची बदली तुकडी आली आणि हे परतीच्या प्रवासाला निघाले.

पुन्हा तीच टपरी. संध्याकाळ असल्याने उघडी होती. एक वृद्ध मालक ग्राहकाची वाट पहात होता. तुकडी दाखल झाली. तो आनंदला.

“जी साब”

“पचास चाय”

“अभी देता हू!”

“धंदा कैसे चल रहा है?”

“भगवान ने ठीक ठाक रखा है साब। भगवान सबका ख्याल रखता है।”

“जब भगवान खयाल रख रहा है तो तू इतना गरीब कैसे? तेरी गरीबी बता रही है के भगवान है ही नही” एक नास्तिक सैनिक थोडासा चिडूनच बोलला.

“नही साहब! भगवान है और वो पुकारने पर मदद भी करता है। मी पटवून देऊ शकतो”

“ते कसं?” मेजरने विचारलं.

“तीन महिन्यापूर्वी पौर्णिमेच्या दिवशी अतिरेक्यांनी माझ्या मुलाला उचललं होतं. त्याला काही विचारायला. पण माझ्या मुलालाच ते माहीत नव्हतं. साहेब! मारून मारून मुलाला अर्धमेला करून ते निघून गेले. मला दुपारीच निरोप मिळाला. लगेच टपरी बंद करून मी गावी गेलो. नेहमी टपरी बंद केली की समान बरोबर नेतो पण त्यादिवशी शंभर चहाचं समान आणि तेवढीच बिस्किटे तशीच ठेवून मी निघालो.”

पोराला दवाखान्यात भरती केलं. होता नव्हता तो पैसा खर्च केला पंधरा दिवसांनी पोरगा हाताशी आला. पण एक पै खिशात नव्हती. डोक्यावर ₹१००० चं कर्ज. टपरीकडे येताना सतत देवाला प्रार्थना केली की ₹११००चा तरी धंदा होऊ दे म्हणून. पण पाहतो तो काय! टपरीचं कुलूप तुटलेले.

रडत रडत मी आत शिरलो आणि दुसरा धक्का बसला. चहाचं सामान निम्मं झालेलं, बिस्किटे संपलेली, सर्व वस्तू स्वच्छ धुवून आवरलेल्या आणि साहेब, एका डब्याखाली ₹२००० होते हो. देवाने माझं ऐकलं साहेब.”

एव्हाना सर्वांना तो कोणत्या प्रसंगाबद्दल बोलतोय ते लक्षात आलं. मेजरने सैनिकांना नजरेनेच गप्प राहायला सांगितलं.

मेजरने विचारलं, “यात देवाचा संबंध काय?”

साहेब! टपरीला कुलूप होतं. कित्येक लोक सरळ पुढे निघून गेले असतील. पण कोणी तरी खरंच गरजू आला असावा आणि देवाने त्याला कुलूप तोडायची बुद्धी दिली असावी. नाहीतर असं कसं घडलं असतं? आणि तो खरंच गरजू होता म्हणूनच पैसेही ठेवून गेला. अगदी ₹१००० चं सामान घेऊन ₹२००० ठेवून गेला”

बोलता बोलता वृद्ध हमसू लागला..

“देव आहे साहेब! देव आहे”

“किती झाले?”

“पन्नास चहा आणि पन्नास नानकटाईचे ₹७५०.०० झाले.”

मेजरला त्या रात्रीची काकुळतीची भूक आठवली. चहासाठी केलेला देवाचा धावा आठवला आणि कुलूप तोडणंही आठवलं. पाकिटातून पैसे काढून त्या वृद्धाला देत म्हणाला,

“देव आहे बाबा! देव आहे.”
From
Army Diary

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)

One thought on “देव कसं काम करतो..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: